शहादा : शेतकरी हा मजूर व्यवस्थापनापासून ते हवामान बदलापर्यंतचा अभ्यास करत असतो. त्यांच्यात सहा बिलियन लोकांना खाऊ घालण्याची ताकद असून येणारा काळ हा शेतकऱ्यांचाच असेल, असे प्रतिपादन शहादा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांनी केले. ते अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
अॅग्रोवर्ल्डच्यावतीने शहादा येथील प्रेस मारुती मैदान येथे चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि. १०) माजी कृषी सभापती अभिजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, ओम गायत्री नर्सरीचे अध्यक्ष मधुकर गवळी, आनंद अॅग्रो केअरचे घनश्याम हेमाडे, अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, शेती उत्तम व आधुनिक पद्धतीने केली तर त्याच्यासारखा दुसरा चांगला व्यवसाय नाही. त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन करून येणाऱ्या काळात शहादा तालुक्याला देश नव्हे तर जगाच्या नकाशावर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मधुकर गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्तविक तर वंदना कोर्टिकर यांनी सूत्रसंचालन केले.
युवा शेतकरी, उद्योजकांचा सन्मान
अॅग्रोवर्ल्ड युवा प्रयोगशील शेतकरी पुरस्कारार्थी – किरण हिरालाल पाटील, रमाकांत मंगा पटेल, भरत कांतीलाल पाटील, डॉ. उल्हास विश्वनाथ पाटील, अभय रमेशगिर गोसावी, पानसिंग वाहऱ्या राहसे, अंशुमन गोपाल पाटील, डॉ. संकेत सुनिल पाटील, राहुल बन्सी पाटील, विठोबा रामदास माळी, संदीप ठोबनदास पाटील, वसंत ब्रीजलाल पाटील, मयूर प्रकाश नेरपगार, निलंय गोपाळ पाटील. अॅग्रोवर्ल्ड युवा कृषी उदयोजक पुरस्कारार्थी – कृष्णराव भास्करराव निंबाळकर, राजेंद्र अनपसिंग विसावे, निवृत्ती एम. पाटील, युवराज गंगाराम वाघ, धनश्याम रतीलाल पाटील, रोहन दिगंबर बोरसे, विश्वनाथ दगडू पाटील, गिरीशभाई शरदभाई पटेल, राहुल भगवान वाल्हे, मोहन दशरथ चौधरी. अॅग्रोवर्ल्ड आदर्श कृषी केंद्र संचालक पुरस्कारार्थी – पांडुरंग नागो चौधरी, किशोर लोटन पाटील, कन्हैयालाल भुता पाटील, जगन्नाथ मक्कन पाटील, देविदास आनंदा आहिरे, निलेश शांतिलाल पाटील, विजय पिंताबर चौधरी, आनंद पुरुषोत्तम पाटील, अमित प्रदीप ठक्कर, पुलिंद रमेशचंद्र शहा आदींना सन्मानित करण्यात आले.
पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देवून ड्रोनचे प्रात्यक्षिक, मोफत पाणी तपासणी, मजूर समस्येला पर्यायी पिके व यंत्रे आदींची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले. प्रदर्शनाला मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर सह प्रायोजक म्हणून प्लॅन्टो कृषीतंत्र, निर्मल सिड्स, ओम गायत्री नर्सरी आणि सीका मोटर्स आहेत.