हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर 15 ते 26 आठवडे (कंद वाढीची सुरुवात) या अवस्थेमध्ये 12 समान हप्त्यांमध्ये 1.125 किलो नत्र, 1.25 किलो स्फुरद व 0.75 किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खातांद्वारे देण्यासाठी 2 किलो 12:61:00, 2.25 किलो युरीया व 1.5 किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.
लागवडीनंतर 27 ते 32 आठवडे (कंद तयार होण्याची अवस्था) या अवस्थेमध्ये ठिबक सिंचनद्वारे 6 समान हप्त्यांमध्ये 1.5 किलो नत्र, 1 किलो स्फुरद व 2 किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी 1.5 किलो 12:61:00, 3किलो युरीया व 4 किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.
करपा व पानावरील ठिपके
(रोगकारक बुरशी: कोलेटोट्रिकम कॅपसिसी अथवा टॅफ्रिना मॅक्युलन्स)
सकाळी पडणारे धुके व दव हे वातावरण रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल असते. ‘कॉलेटोट्रिकम कॅपसिसी’ बुरशीमुळे पानावर अंडाकृती ठिपके पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. ‘टॅफ्रिना मॅक्युलन्स’ या बुरशीमुळे पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके आढळतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.
नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तीव्रता वाढल्यास, बोर्डो मिश्रण 1 टक्का किंवा प्रोपीकोनॅझोल (25 ईसी) 1 मि.लि. किंवा क्लोरथलोनील (75 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरीया इत्यादी देऊ नये. जर युरिया सारखी खते दिली तर पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते. ज्या ठिकाणी पालाश या अन्नद्रव्याची कमतरता असेल, त्या ठिकाणी एकरी 50 किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
पाणी व्यवस्थापन
हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर 12 ते 15 दिवस ठेवावे. शिफारशीत मात्रेपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी पडले तर कंदाची योग्य वाढ होत नाही, प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते. परिणामी विक्री करताना दर कमी मिळतो. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते. त्यामुळे सात महिने पूर्ण झाल्यानंतर हळदीस पाणी देण्याचा कालावधी हळूहळू कमी करत जावे. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी बंद करावे. त्यामुळे पानामधील अन्न कंदामध्ये उतरण्यास मदत होते व हळदीस उतारा चांगला मिळतो.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)