मळणीनंतर भात पेंढा व्यवस्थित पेंढ्या बांधून ठेवावा. जे शेतकरी चार सूत्री पद्धतीने शेती करतात त्यांना सूत्र क्र. 1 अन्वये म्हणजे भात पिकाच्या अवशेषाचा फेरवापर करणे जरुरीचे असते.
यासाठी एकरी 8 क्विंटल भात पेंढा पहिल्या नांगरणीवेळी शेतात गाडणे आवश्यक असते. या प्रमाणात पेंढा राखून ठेवावा. स्वतःसाठी शेती व पशुचाऱ्यासाठी लागणारा भात पेंढा बाजूला ठेवून उर्वरित भात पेंढ्याची विक्री करावी. भात पेंढ्यास चारा, आळिंबी उत्पादनासाठी, पॅकिंगसाठी मोठी मागणी असते.
साठवणुकीत किडींपासून संरक्षण
भातावर साठवणुकीच्या काळात सोडे किडा, खापर किडा, दाणे पोखरणारा किडा, पाखरू, दाण्यावरील पतंग, सुरसा (पतंग), तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडींपासून भाताचे नुकसान टाळण्यासाठी कीड होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक व कीड झाल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी निवारणात्मक उपाययोजना कराव्यात.
• भाताचे साठवणुकीतील किडींपासून संरक्षण करण्यासाठी धान्य योग्य त्या आर्द्रतेपर्यंत चांगल्या प्रकारे वाळवावे.
• नवीन हंगामातील धान्य जुन्या धान्याजवळ साठवू नये.
• धान्य साठविण्याची जागा स्वच्छ असावी.
• कणगी, बॅरल, पत्र्याचे छोटे व मोठे डबे साफसफाई करून घ्यावेत.
• गोदामे स्वच्छ करून भेगा, फटी, छिद्रे चांगली बुजवून घ्यावीत.
हे प्रतिबंधात्मक उपाय करूनही कीड आल्यास खालील उपाययोजना कराव्यात
किडीने प्रादुर्भाव झालेले धान्य उन्हात आणावे. योग्य त्या चाळणीतून चाळून, त्याची उफणणी करावी. उफणणीनंतर हे धान्य उन्हात वाळवावे. यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील किडे दाण्यापासून वेगळे होतील. असे स्वच्छ केलेले धान्य उन्हात पुरेसे वाळवावे. मोठ्या प्रमाणात धान्य साठवणीमध्ये असल्यास, तज्ञांच्या मार्गदर्शनाने व देखरेखीखाली अः ल्युमिनियम फॉस्फाइड या कीटकनाशकाचा वापर करावा. धुरी दिलेले धान्य प्रक्रियेनंतर 15 ते 20 दिवस खाण्यासाठी वापरू नये.
अवशेष व्यवस्थापन
भातपिकाच्या कापणीनंतर शिल्लक अवशेष व पेंढा जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. भातपिकाच्या कापणीनंतरचे अवशेष जाळल्यामुळे तयार होणाऱ्या धुरामुळे हवेतील कार्बन मोनोक्साईड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड या विषारी वायूंचे प्रमाण वाढते. हे विषारी वायू आरोग्यास अत्यंत घातक आहेत.
पेंढा अथवा भातपिकाचे अवशेष न जाळता त्याचे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. हे अवशेष गोळा करून कंपोस्ट खड्डयामध्ये टाकावेत. त्यांचे शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट करावे. रब्बीमध्ये शेतीतील ज्या क्षेत्रामध्ये विश्रांती देण्याचे नियोजन आहे, तिथे पहिल्या नांगरटीवेळी हे अवशेष गाडावेत. यामुळे जमिनीच्या जैविक गुणधर्मामध्ये वाढ होऊन तिचा पोत सुधारतो.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇