जळगाव – जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम हा होतोच.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून…🥭
खालील व्हिडिओ पहा..

दूध उत्पादन, प्रजननावरही परिणाम..
जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम हा होतोच. वाढत्या तापमानामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चारा खातात आणि संध्याकाळी चरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते. उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो. त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते.
प्रजननामध्ये या अडचणींचा सामना..
उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे असे उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.

चारा व पाण्याचे व्यवस्थापन..
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 30 टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे.

अशी घ्या आरोग्याची काळजी..
उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावल्याने जनावरे आजारी पडणार नाहीत.















