पूणे ः पिकांच्या पानांवर पडणार्या नागअळीची समस्या अनेक शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत असते. अंड्यातून बाहेर पडणारी बाल्यावस्थेतील ही अळी पिकांवर सर्वाधिक परिणाम करते. विशेषतः पान आणि खोडाच्या पृष्ठभागाखाली प्रवेश करून आतील हरितलवक खायला सुरूवात करते. नागअळी ही कीड वांगी, शिमला मिरची, बटाटे, काकडी यासह इतरही काही पिकांत आढळून येते. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरवातीपासूनच योग्य काळजी घेऊन काही औषधांच्या फवारणीचे योग्य व्यवस्थापन केले तर या अळींचा प्रादुर्भाव रोखता येतो.
कोणत्याही पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे किंवा पांढरे पट्टे दिसू लागले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते. काळी माशी पानाच्या मागच्या बाजूने एकावेळी २५० पर्यंत अंडी घालते. सुमारे १० दिवसात अंडी उबल्यानंतर त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात. पानांच्या दोन पापुद्र्यामध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते. ही अळी पानातील टिश्यू खात – खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात. दोन- तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन – तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते. साधारणतः १५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भाजीपाला पिकाचा दर्जा बिघडतो. किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते. हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो. पानांच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने बर्याचदा कीटकनाशकांच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.
प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…
असे मिळवावे नियंत्रण
सोयाबीन पिकांवर नागअळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर बॅसिलस थुरिनजीनसिसची फवारणी करावी. लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून कार्बोफुरॉन ३ टक्के सी.जी. देता येते. याशिवाय इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एस.एल.ची देखील फवारणी करतात. टोमॅटोवर प्रादुर्भाव झाल्यास पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६ टक्केच्या दोन फवारण्या कराव्यात किंवा क्लोरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोझाम १७.५ एस.सी.ची जमिनीतून आळवणी करता येते. भुईमुंगासाठी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी., लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी., क्विनालफॉस २५ टक्के ई.सी. फायदेशीर ठरते.