पिंपळगाव बसवंत येथील ‘ग्रीनझोन ऍग्रोकेम प्रा.लि.’या कंपनीच्या वतीने उभारलेल्या ‘बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्रा’च्या माध्यमातून, मधमाशी पालनाचा प्रचार आणि प्रसार करून तिचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात येतो.
या वर्षीही ‘बसवंत मधुक्रांती-२०२१’ या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन दि. २२ आणि २३ डिसेंबर दरम्यान ‘बसवंत मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र’, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमचे समन्वयक डॉ भास्कर गायकवाड यांनी दिली.
मधमाशीच्या विविध जाती, त्यांची कार्यशैली, त्यांचे संवर्धन करण्याच्या पध्दती, मधमाशीद्वारे पीक उत्पादनात वाढ, मधमाशीकडून मिळणारे विविध पदार्थ आणि त्यांचा मानवी आरोग्य सुधारण्यासाठी वापर, मधमाशी पालनातून रोजगार निर्मिती, मधमाशी पालनासाठी शासकीय अनुदानाच्या विविध योजना, तसेच मधमाशीच्या आदर्श गावाचा कृती कार्यक्रम यासारख्या संवर्गित विषयांचा समावेश या परिसंवादात करण्यात आला आहे.
यावेळी खादी ग्रामोद्योग विभाग तसेच राष्ट्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे यांचे अधिकारी, मधमाशी पालनातील तज्ञ व्यक्ती, डॉक्टर तसेच मधमाशी पालनातील यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.
दरवर्षी प्रमाणेच महाराष्ट्रातील पाच विभागांतील पाच उत्कृष्ट मधपाळ, मधमाशीचा प्रचार- प्रसार करणाऱ्या व्यक्ती तसेच मधमाशी व्यवसायाला सक्षम करणारी संस्था अशा प्रकारचे एकूण सात पुरस्कार ‘मधुक्रांती’ परिसंवादाच्या दरम्यान देण्यात येणार आहेत.
मधमाशी पालन व्यवसायाचा जास्तीत जास्त प्रचार- प्रसार करण्यासाठी दि. २१ ते २६ डिसेंबर या दरम्यान ‘बसवंत हनी बी फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये मधमाश्यांबद्दलची संपूर्ण माहिती, मधमाशी पालनातून मिळणारे विविध पदार्थ, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य, मधमाशीचे मिनिएचर व्हिलेज, मधाची काढणी तसेच त्याचा चवीच्या दृष्टिकोनातून आस्वाद घेणे यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण आणि मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या संकल्पनांचा अनुभव उपस्थितांना घेता येईल.
या साऱ्याचा लाभ घेण्यासाठी, दि. २१ ते २६ डिसेंबर दरम्यान होणारा ‘बसवंत हनी बी फेस्टिवल’ तसेच २२ ते २३ दरम्यान होणाऱ्या ‘बसवंत मधुक्रांती’ राज्यस्तरीय परिसंवादात सहभागी व्हावे, असे आवाहन बसवंत मधमाशी उद्यान यांच्या मार्फत करण्यात आले आहे..
🌻🐝🌻🐝🌻
अधिक माहितीसाठी –
नितीन कराळे..
077740 89517