मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. पिकांची जोपासना करण्यासाठीदेखील यंदा शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे एकूणच कृषी उत्पादन सुद्धा वाढेल अशी आशा आहे. मात्र, आता महावितरण कंपनीने शेतीला होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत नुकताच नवीन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.
महावितरणचा निर्णय दरवर्षीची अडचण
यंदाच नाही तर दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितणकडून हा निर्णय घेतला जातो. सिंगल फेज योजनेमुळे गावातील विद्युत पुरवठा हा सुरळीत होतो. पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा असतानाही अडचणी निर्माण होणार आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढले तर कृषीपंपाचा वापरही वाढणार आहे.
दिवसभरात मिळणार फक्त 8 तास वीज
खरीप हंगामात पाऊस असल्याने वीजेची आवश्यकता फारशी भासत नाही. पावसामुळे पिकांनाही पाणी मिळते. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवूकीच्या पाण्यावरच करावी लागते. यातच सध्या वाढत्या ऊनामुळे पेरणी करण्यापूर्वी आणि पेरल्यानंतरही पाणी द्यावे लागणार आहे. आतापर्यंत 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, महावितरणने 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच वीज पुरवठा केला जाणार आहे.
यामुळे घेण्यात आला निर्णय
महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिकचे भरणे कसे होईल याचे नियोजन करावे लागणार आहे. काळाच्या ओघात सिंचनासाठी आता स्प्रिक्लर, ठिबकचा वापर वाढलेला आहे. मात्र, शेतकरी अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करीत असला तरी वीज ही गरजेची आहेच. पण कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे.
शासनाने दखल घेण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामात कृषी मालाचे मोठे नुकसान सोसावे लागल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्धतेमुळे रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, आता फक्त 8 तासच व तोही सुरळीत पुरवठा होत नसल्याने यंदा महाविरणच्या निर्णयामुळे रब्बीच्या उत्पादनात घट होण्याची भिती आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन कृषी पंपांना 10 तास व सलग वीज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.