मुंबई (प्रतिनिधी) – भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. भारताचे दूध उत्पादन गेल्या सहा वर्षांत 35.61% ने वाढून 2019-20 मध्ये 198.4 दशलक्ष टन झाले आहे, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
देशातील दुग्ध उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 दशलक्ष टन वरून 2019-20 मध्ये 198.4 दशलक्ष टन झाले. 2018-19 च्या तुलनेत, सरकारी आकडेवारीनुसार यात 5.70 टक्के वाढ झाली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) द्वारे आयोजित दुधाच्या मागणीवरील अभ्यासानुसार, 2030 ची अखिल भारतीय स्तरावर अंदाजे मागणी दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी 266.5 दशलक्ष मेट्रिक टन आहे.
पशुधनाची उत्पादकता वाढीसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू
पशुधनाची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे, असे त्यात म्हटले आहे. 2014-15 दरम्यान दुग्ध उत्पादनाचा वार्षिक विकास दर 6.27 टक्के होता, त्यानंतर सातत्याने वाढ झाली. 2019-20 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दूध उत्पादनात 5.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरडोई उपलब्धता वाढली…
दुधाची दरडोई उपलब्धता 1950-51 मध्ये 130 ग्रॅम/दिवसावरून 2012-13 मध्ये 299 ग्रॅम/दिवस झाली. 2019-20 मध्ये दुधाची दरडोई उपलब्धता 407 ग्रॅम प्रतिदिन होती. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि पंजाब, महाराष्ट्र ही प्रमुख दूध उत्पादक राज्ये आहेत.
आव्हाने व संधी
* भारतात श्वेतक्रांतीमुळे दूध उत्पादकता आणि प्रक्रिया पायाभूत सुविधा वाढल्या आहेत परंतु अजूनही अनेक अल्पभूधारक दुग्धउत्पादक पारंपारिक ज्ञान आणि पद्धतींनीच पशुपालन व्यवसाय करीत आहेत.
* पशुधनातील संसर्गजन्य आणि सांसर्गिक रोगांचे प्रमाण अजूनही जास्त आहे आणि दुग्धजन्य प्राण्यांचे पुनरुत्पादक आरोग्य खराब आहे.
• लसीकरण आणि इतर रोग नियंत्रण कार्यक्रमाला अधिक बळकटी आणि वेग येऊन प्रतिजैविकांचा वापर नियमित करण्यावर भर द्यावा.
* एकूण उत्पादीत दुधापैकी सुमारे 80% दुध अजूनही पारंपारिक दुग्ध क्षेत्राद्वारे हाताळले जाते. ज्यात जास्त ज्ञान आणि क्षमता नाही. यामुळे दुधाचे उत्पादन, दर्जा खालावतो व मानवी आरोग्यास धोकाही निर्माण होतो.
* आसाम, ईशान्य भारतातील ILRI चे संशोधन असे सुचविते की प्रत्येक क्षेत्र / ठिकाणी सहकारी प्रणाली अधिक प्रभावी व्हायला हवी.
* विक्री केलेल्या दुधाची जीवाणूजन्य गुणवत्ता आणि प्रतिजैविक अवशेष स्वीकार्य नाहीत परिणामी दूध उत्पादनात अव्वल असूनही निर्यातीत भारत खूप मागे आहे. सरकार व पशुपालकांनी स्वच्छ व दर्जेदार दूध उत्पादन हेच ध्येय अंगिकारायला हवे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत म्हणजे दुग्ध व्यवसाय होय . भविष्यात चांगले दिवस या व्यवसायाला येत आसतील तर ते शेतकरीराज्याचे भाग्यच समजावे .