पुणे (प्रतिनिधी) – हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरातून मान्सून परतला आहे. 1975 नंतर देशात पहिल्यांच इतके दिवस मान्सून थांबला आहे.
वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही, काही राज्यात अद्याप नैऋत्य मोसमी वारे सक्रिय आहेत. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
डॉ. के. एस. होसाळीकर यांचेही ट्वीट..
गेले काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.
यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. 6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून सुरू झालेल्य पावसाने राज्यात थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले आहे.
राज्यात कोरड्या हवामानाची नोंद
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात कोणताही इशारा दिलेला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा देखील घसरला असून थंडीची चाहूल सुरू झाली आहे.