कोकण म्हटला की आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने भातशेती, आंब्याची आमराई, नारळ, फणसाची झाडे, काजूच्या बागा, कोकम, करवंद, जांभूळ किंवा इतर वेलवर्गीय भाज्या व इतर फळपिके हीच नावे प्रामुख्याने येतात. परंतु कालानुरूप आता शेतीत बदल होत असून शेतीत येणारी युवा व प्रयोगशील पिढी आता नवनवीन व्यावसायिक पिकांना आपल्या शेतीत स्थान देत आहेत. असाच काहीसा नवीन प्रयोग कोकणातील शैलेश भस्मे या ४८ वर्षीय प्रयोगशील शेतकऱ्याने केला आहे. कोकणात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेऊन त्यांनी त्यावर आधारित प्रकिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नाच्या नवीन वाटा निर्माण केल्या आहेत. स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून त्यांनी या रब्बी हंगामामध्ये सुमारे साडे सात लाखांची आर्थिक उलाढाल केली असून असून सुमारे सतरा लाखांची नफ्यासह उलाढाल अपेक्षीत आहे.
शैलेश भस्मे हे साडवली (देवरुख) तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील रहिवाशी. कोणतीही शेतीची कौटुंबिक पार्श्वभूमी नसतांना फक्त लहानपासून शेतीची आवड जोपासण्यासाठी त्यांनी शेती सुरु केली. त्यामध्ये भविष्यात किती आर्थिक फायदा होईल हे सुरवातीलाच डोळ्यापुढे न ठेवता सातत्याने शेतीत निरनिराळे प्रयोग करत आहेत. स्वतःच्या प्रयोगावर विश्वास ठेवून, इतरांच्या प्रेरणेने, अभ्यासपूर्वक अनुभवातून कोकणच्या लालमातीमध्ये त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी सह्याद्री अॅग्रो या शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमातून व्यवसायिक शेती निर्माण करून आजूबाजूच्या परिसरामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
व्यावसायिक ते प्रयोगशील शेतकरी
देवरुख शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून शैलेश भस्मे क्लिनिकल लॅब्रोड्रॉरी व्यवसाय करत आहेत. आपल्या अंगी असणारी आवड जोपासण्यासाठी घरची स्वमालकीची शेती नसतांनाही गेल्या आठ ते दहा वर्षापासून ते भाडेतत्वावर शेती करत आहेत. भाडेतत्वावर असलेल्या शेतीतील निरनिराळे प्रयोग करत असतात. त्याच्या या प्रयोगांनी स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून शेतीव्यवसाय मधला एक यशस्वी टप्पा पार केला आहे. त्यांनी व्यावसायिक ते प्रयोगशील शेतकरी असाही टप्पा पूर्ण केला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मित्रांच्या प्रेरणेतून साकारली स्ट्रॉबेरी शेती
साडवली गावच्या जवळच असणारे कोसुंब येथील श्री. प्रशांत जाधव व श्री. केदारी गेल्या पंधरा वर्षांपासून निरनिराळे व्यावसायिक शेती प्रयोग करत आहेत. शैलेश यांनी शेती करण्याची आपली आवड या दोघांपासून प्रेरणा घेत त्यांचा अनुभव व मार्गदर्शन व सहकार्याने जोपासली आहे. स्ट्रॉबेरी या पिकाविषयी कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण व माहिती न घेता त्यांनी मित्रांच्या सहकार्याने आपणही स्ट्रॉबेरी शेती करूया असा निर्णय पक्का केला आणि त्यांच्याच प्रेरणेतून स्ट्रॉबेरी शेतीचे स्वप्न साकारले.
भाडेतत्वावर जागा घेऊन केली स्ट्रॉबेरी शेती.
शैलेश भस्मे त्यांनी साडवली गावातील मुख्य रस्त्यालगत एकूण तीन एकरची जागा भाडेतत्त्वावर घेऊन त्यातील दीड एकर जागेवर पूर्णपणे व्यावसायिक स्ट्रॉबेरीची लागवड केली. उर्वरित दीड एकर जागेवर इतर शेती उत्पन्न घेतले आहे. यामध्ये मिरची, कलिंगड, पालेभाज्या इत्यादींचा समावेश आहे.
जमिनीची प्रतवारी व माती परीक्षण
शेती केलेले ठिकाण हे समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे येथे थंड हवा चांगल्या प्रकारे उपलब्ध होते. कोकणची लालमाती, येथील 35 ते 36 डिग्री सेल्सिअस असणारे तापमान याचा सहसा स्ट्रॉबेरी उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वास शैलेश भस्मे यांना होता. सांगली येथील एका माती परीक्षण करणाऱ्या कंपनीकडून त्यांनी नियोजित स्ट्रॉबेरी शेतीच्या जागेचे माती परीक्षण करून घेतले. जेणेकरून शेतीचे खत व्यवस्थापन करणे सोपे जाईल.
स्ट्रॉबेरीच्या रोपांची व जातीची निवड
स्ट्रॉबेरीची पंढरी समजल्या जाणाऱ्या सातारा येथील महाबळेश्वर तसेच आजूबाजूच्या परीसरा मधून स्ट्रॉबेरीच्या रोपांची आयात करण्यात आली. स्ट्रॉबेरीच्या आढळून येणाऱ्या अनेक जाती मधून थंड हवामानामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी व कमीत-कमी कालावधीत उत्पादनास तयार होणारी विंटर डॉन या जातीची निवड करून एकूण तीस हजार स्ट्रॉबेरीची रोपे लागवडी करता आणण्यात आली.
स्ट्रॉबेरी व्यवस्थापन
स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड ही मल्चिंग पद्धतीने करून सुमारे दहा दिवसांमध्ये दहा ते बारा मनुष्यबळाच्या मदतीने रोपांच्या लागवडीचे काम पूर्ण करण्यात आले. नंतर गरजेप्रमाणे खत फवारणी करून मशागत करण्यात आली. या सर्व कामासाठी चार ते पाच पूर्णवेळ मनुष्यबळाची आवश्यकता लागते. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था शैलेश भस्मे यांनी गावातील वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या माध्यमातून केली. ऑक्टो्बर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करण्यात आली. पाण्याबरोबरच या पिकाला लागणारे खत व कीडरोगनियंत्रण मित्रांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पूर्ण केले. साधारणत: पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या लागवड आणि मशागतीच्या कालावधीनंतर स्ट्रॉबेरी विक्री योग्य बनते.
एकूण आर्थिक उलाढाल व नफ्याचे प्रमाण
शैलेश भस्मे यांनी स्ट्रॉबेरी शेतीमध्ये आजवर सात ते साडे सात लाखांची आर्थिक उलाढाल केली आहे. यामध्ये एप्रिल ते मे महिना अखेरीस १६ ते १७ टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन अपेक्षित आहे. सरासरी स्ट्रॉबेरीच्या प्रती किलोमागे रूपये १०० इतका बाजारभाव जरी मिळाला तर अंदाजे १६ ते १७ लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे असे ते सांगतात.
स्ट्रॉबेरी विक्री व मार्केटिंग व्यवस्था
स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे १० ते २० टक्के स्ट्रॉबेरीची स्थानिक बाजारपेठ व पर्यटकांच्या माध्यमातून किरकोळ विक्री होते. उर्वरित ७० ते ८० टक्के स्ट्रॉबेरी उत्पादनाचे शैलेश भस्मे यांनी खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी उभारलेल्या सह्याद्री ॲग्रो या फळ-प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून बायप्रॉडक्ट बनविले जातात. यामध्ये स्ट्रॉबेरीपासून सिरप, क्रश, जेली, पोळी, रेडी टू ड्रिंक सरबत, जाम, स्ट्रॉबेरी कॅण्डी इत्यादींची समावेश होतो.
स्थानिक रोजगार निर्मिती
स्ट्रॉबेरी शेती लागवडीच्या सुरवातीच्या काळामध्ये दहा ते बारा मजूर पूर्णवेळ कामासाठी लागले होते. पण पुढील काळात मशागत व इतर कामांसाठी चार ते पाच स्थानिक महिला/पुरुष यांना पूर्णवेळ या स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रतिक्रिया
सकारात्मक मानसिकता ठेवून शेतीत प्रयोग करावेत.
आजकाल नवीन पिढी शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. तर काही शेतकरी अजूनही पारंपारिक शेतीत अडकून पडले आहेत. त्यांनीही नवीन पिकांना नाही स्वीकारले तरी, आहे त्याच पिकांवर प्रकिया करून विक्री केली तर नक्कीच त्यांना अधिकचे पैसे मिळतील. नवीन पिकांसह नवीन तंत्रामुळे शेतीत आत बदल घडत आहेत. समोर आलेल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता आपली मानसिकता सकारात्मक ठेवून कोणतीही गोष्ट केली असता त्याला हमखास यश मिळते.
श्री. शैलेश भस्मे,
साडवली (देवरुख) तालुका – संगमेश्वर,
जिल्हा – रत्नागिरी. ९०२१८५८५८० / ९४२२९९९८४