प्रतिनिधी/जळगांव
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, कष्ट करावेच लागतात. मी आज तीन राज्यांचा विपणन प्रमुख म्हणून काम पाहत असलो तरी आजही माझ्या कामाची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून होते. अनेकदा रात्रीचे आठ तर काही अकरा वाजेपर्यंत काम सुरु असते. परंतु या क्षेत्रात माझी सुरुवात एका पेस्टीसाईड कंपनीत जाहिरात पोस्टर लावणे अर्थात पोस्टर बॉय पासून झाली. आजही हा प्रवास निरंतर सुरु असल्याचे प्रतिपादन सिनवूड अॅग्रो ली. चे स्टेट हेड गजानन बावनकर यांनी त्यांचा आजवरचा जीवन प्रवास उलगतांना केले. निम्मित होते अॅग्रोवर्ल्डच्या मुख्यालयास त्यांनी दिलेल्या भेटीचे.
तीन राज्याचे मार्केटिंग हेड असलेल्या श्री. बावनकर यांनी अल्पावधीत मार्केटिंग क्षेत्रात नाव कमाविले आहे. लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या कंपन्यांना देखील त्यांनी नव्याने ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. फक्त १२ वी पास असणाऱ्या श्री. बावनकर यांनी अनेक MBA असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना या क्षेत्रात त्यांच्या तालमीत तयार केले. त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. अनेकदा महिन्यातील किमान २० – २५ दिवस ते कार्यालयीन कामानिमित्ताने घराबाहेर असतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकडे त्यांचा भर असतो. अर्थात मी घराबाहेर असतांना घरची संपूर्ण जबाबदारी एम.एस्सी. असलेली माझी अर्धांगिनी सौ. प्रिती समर्थपणे पार पाडत असल्यामुळेच मी निश्चिंत मनाने पूर्णवेळ बाहेर काम करू शकतो, हे सांगण्यासही ते विसरले नाही.
यावेळी बोलतांना त्यांनी त्यांचे कारकीर्दीमधील सुरुवातीचे बरेच अनुभव कथन केले. जिद्दीने आणि सातत्याने काम केले तर यश नक्कीच मिळते हे यशाचे सूत्र त्यांनी यावेळी अॅग्रोवर्ल्डच्या उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही दिले. अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी श्री. बावनकर यांचे स्वागत केले.