संध्याकाळी राजे आणि बाजी सदरेवर बसले असता न राहवून बाजी म्हणाले,
‘राजे एक विचारू?’
‘विचारा ना! आम्हांला माहीत आहे, तुम्ही काय विचारणार, ते.’
बाजी पुन्हा संभ्रमात पडले. बाजींचं ते विचारग्रस्त रूप पाहून राजे स्मितवदनानं म्हणाले,
‘आम्हांला खरोखरच दृष्टान्त झाला होता का, हेच विचारणार होता ना!’
‘जी!’ बाजींनी सांगितलं.
‘दृष्टान्त वगैरे काही झाला नव्हता. चाणक्य काळापासून राजनीतीत ही गोष्ट आहे. गडाचा खजिना जेव्हा सुरक्षित राखायचा असतो, तेव्हा हीच पद्धत अवलंबली जाते.’
‘कसली पद्धत?’ बाजींनी विचारलं.
‘गडावर अशाच सुरक्षित जागेवर बुरूजाची निवड केली जाते. त्यात मोजक्या माणसांकरवी रात्रीच्या वेळी धन पुरलं जातं. ती माणसं दोनपेक्षा जास्त नसतात. धन पुरून झाल्यानंतर ती माणसं परतत असता त्यांनी काय केलं, हे माहीत नसणाऱ्या मारेकऱ्यांमार्फत त्यांचा वध केला जातो. त्यांची प्रेतं बुरूजाच्या नजीक टाकली जातात. दुसरे दिवशी गडावरची माणसं ती प्रेतं पाहतात. दचकतात. भितात. त्यांचं दफन तिथंच केलं जातं. काही दिवसांनी रात्री-अपरात्री तिथं दिवट्या नाचवल्या जातात आणि त्या बुरूजाचं नाव सैतान बुरूज, वेताळ बुरूज असं पडतं. अंधश्रद्धा बाळगणारे कमी नसतात. त्या बुरूजाच्या कथा तयार होतात. त्या बुरूजाकडं जायला कोणी धजेनासं होतं. त्यामुळे असा बुरूज पाहिला की, आम्हांला त्यातलं धन दिसू लागतं. याचं प्रत्यंतर आम्हांला तोरण्यावर आलं होतं.’
राजांच्या बोलण्यानं बाजीप्रभू प्रसन्नपणे हसले. ते मोकळेपणानं म्हणाले,
‘राजे! बांदलांची दिवाणगिरी केली, पण ही दृष्टी कधी लाभली नाही.’
‘बाजी! अनुभवातून माणसं शिकत असतात. या धनाची आज खूप गरज होती.’
‘गरज?’
‘बाजी! आम्ही फत्तेखानाचा पराभव केला आहे. आदिलशाही आता स्वस्थ बसेल, असं वाटत नाही. आमच्यावर कुठलंही परचक्र येण्याआधी आमच्या बारा मावळचे सारे गड मजबूत करायला हवेत. रोहिड्याचं बांधकाम कुठवर आलं?’
‘त्याची चिंता नसावी.’ बाजींनी सांगितलं, ‘बांदलांनी आपल्या नजरेखाली गडकोट बंदोबस्त करून घेतला आहे.’
‘ठीक!’ राजे समाधानानं म्हणाले. त्याच वेळी त्यांचं लक्ष सदरेबाहेरच्या रस्त्याकडं गेलं.
राजांच्या मुखावर स्मित उमटलं. ते बाजींना म्हणाले,
‘धरणेकरी येताहेत! आम्हांला जावं लागेल.’
बाजींनी रस्त्याकडं पाहिलं. भर उन्हातून सखू सदरेकडं येत होती.
बाजी उद्गारले,
‘पोरगी मोठी धीट आहे.’
‘धीट नव्हे, प्रेमळ आहे. जिथं प्रेम असतं, तिथं रिवाज पाळला जात नाही.’
राजे म्हणाले, त्यात काही खोटं नव्हतं. उन्हातून आलेली सखू राजांना पाहताच म्हणाली,
‘मोहरांचा हंडा मिळाला, म्हणून त्यानं पोट भरतंय? म्या आज तुमच्यासाठी बाजरीची भाकरी, ताजं लोणी आनि तांबडी भाजी केलीया. भाकर थंड झाली, तर…’
‘अग, हो! किती सांगशील? आम्ही चुकलो.’ राजे कौतुकानं म्हणाले.
‘बाजी, ह्या पोरीची आज्ञा आम्हांला मोडता येणार नाही. आम्ही निघालो.’
सखूच्या मागोमाग निघालेल्या राजांना बाजी कौतुकानं पाहत होते.
राजांची राजगडला जायची तयारी चालली होती. गडाखाली राजांचं सामान नेलं गेलं.
विठोजी-गुणाजीला राजे म्हणाले,
‘आम्ही येतो. विठोजी, आता गड तुमच्या ताब्यात. शिबंदी गोळा करा. तुमच्या हाती गड सुरक्षित आहे, याची आम्हांला खात्री आहे.’
विठोजींना काही बोलवत नव्हतं.
राजांनी विचारलं,
‘आणि आमची सखू कुठं आहे?’
‘आतल्या दरवाज्यातून सखू तीरासारखी बाहेर आली आणि तिनं राजांच्या पायावर मस्तक ठेवलं. तिच्या अश्रूंनी राजांचे पाय भिजत होते.
राजे दाटल्या कंठानं सखूला उठवत म्हणाले,
‘ऊठ, सखू! हे काय वेड्यासारखं. पूस ते डोळे. आम्ही सांगतो, तू हाक मारशील, तेव्हा आम्ही तू असशील, तिथं हजर होऊ. यशवंतची काळजी करू नको. आम्ही त्याला जीवमोलानं सांभाळू. आमची सखू आणि तू यांत आम्हांला फरक वाटत नाही.’
राजांनी कमरेचा कसा काढला आणि सखूच्या हातात दिला.
‘मला नगंs’ सखू म्हणाली.
‘पोरांनी वडिलांचं ऐकावं!’ राजे म्हणाले.
‘केलंसा, तेवढं लई झालं; आनि कशाला…’ विठोजी म्हणाला.
‘विठोजी, आम्ही पदरचं थोडंच खर्चतो! देवीनं आम्हांला धन दिलं. ज्या घरात देवावर निष्ठा असते, आणि सुना-मुलींच्या अंगावर दागिने चढतात, त्या घरचं वैभव कधी कमी होत नसतं. ते वाढतच जातं. सखू, आम्ही येतो.’
राजांनी वाड्याबाहेर पाऊल टाकलं. चालत असता ते बाजींना म्हणाले.
‘बाजी, दोन दिवस राहिलो, पण या पोरीनं खूप लळा लावला.’
राजे गडाखाली आले. राजांचं अश्वदळ तयार होतं. राजांचं लक्ष यशवंतकडं गेलं.
‘यशवंत, सखूला सांभाळ.’ बाजींच्याकडं वळून त्यांनी सांगितलं, ‘बाजी, काही लागलं-सवरलं, तर आम्हांला कळवा. या मुलखावर तुमची नजर असू दे. घरची सर्व व्यवस्था करून तुम्ही, फुलाजी, शक्य तो लवकर आम्हांला भेटायला राजगडावर या.’
‘जशी आज्ञा!’ बाजी म्हणाले.
राजे घोड्यावर स्वार झाले. साऱ्यांनी मुजरे केले आणि राजांचं अश्वदळ राजगडाच्या रोखानं जाऊ लागलं.
‘खरंच राजांना धन सापडलं?’ गौतमाईनं विचारलं.
‘झालं!’ बाजी म्हणाले, ‘आम्ही इथवर पोहोचायच्या आत साऱ्या बातम्या आल्या, म्हणायच्या.’
‘बातमी कसली! ज्याच्या त्याच्या तोंडावर हेच हाय.’ सोनाबाईनं सांगितलं.
‘छान!’ बाजी उद्गारले.
‘राजांना देवी प्रसन्न आहे. तिनचं राजांना दृष्टान्त दिला, म्हणे!’ गौतमाई म्हणाल्या.
‘म्हणे, कसलं!’ फुलाजी आवेशानं सांगत होते, ‘आम्ही डोळ्यानं बघितलं, नव्हं! सारे घाबरत होते, पण राजांनी आज्ञा केली, ‘लावा खणती’ आणि काय -मोहरांनी भरलेले हंडे सापडले, हंडे!’
‘अग, बाई!’
‘शिवाजी राजा साधं पोर नाही. देवमाणूस आहे. त्याच्या मागं देवीचं बळ आहे. माणसांची पारख आहे. माणसानं एकदा त्याच्याबरोबर बोलावं आणि कायमचा गुलाम व्हावं, अशी त्याची करामत आहे.’
‘हे मात्र खरं!’ बाजी म्हणाले, ‘आजवर बांदलांची चाकरी केली, पण हे सुख मिळालं नाही. पण या खेपेला राजे कसल्या तरी चिंतेत असावेत, असं वाटतं होतं.’
‘बाजी, खरं?’ फुलाजींनी विचारलं.
‘हो! नाहीतर त्यांनी घरची व्यवस्था करून गडावर भेटीला बोलावलं नसतं.’ बाजी म्हणाले.
‘घोर नाही, तर राजा कसला?’ फुलाजी म्हणाले, ‘तुम्ही गडावर जाऊन या. नंतर आपण राजगडला जाऊ.’
त्या भावांचं बोलणं ऐकून सोनाबाई, गौतमाई चकित झाल्या. सोनाबाई उद्गारली,
‘आपण राजगडला जाणार?’
‘जायलाच हवं!’ बाजी म्हणाले, ‘राजांनी आज्ञा केली नाही, म्हणून काय झालं? ते चिंतेत आहेत, हे माहीत असता थांबून कसं चालेल?’
बाजींचा तो निर्णय ऐकून गौतमाई, सोनाबाई तिथून निघून गेल्या.
बाजी फुलाजींना म्हणाले,
‘मी उद्या सकाळी गडावर जातो. राजांनी शिबंदी वाढवायला सांगितली आहे. मी येईपर्यंत आपण जोखमीची, विश्वासाची माणसं गोळा करा.’
‘माणसांना काय तोटा!’ फुलाजी म्हणाले, ‘त्यांना हाक मारणारा मालक हवा होता. त्याचीच ते वाट बघत होते.’
बाजी काही बोलले नाहीत. ते समाधानानं आपल्या मोठ्या भावाकडं पाहत होते.