प्रतिनिधी/औरंगाबाद
नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला तरीही राज्यात हव्या त्या प्रमाणात थंडीचे आगमन झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यातच तापमानात वाढ झाली असून, परिणामी आता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १९,२०,व २१ नोव्हेबर या कालावधीत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान राज्यात बुधवारी नाशिक येथे सर्वात कमी १७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण कोकण व गोव्यातही काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १९,२०,व २१ नोव्हेबर या कालावधीत तुरळक ठिकाणी पाऊसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वारे व अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील हालचालीमुळे राज्यात या कालावधीत पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
जम्मू-काश्मीर आणि आसपासच्या भागात पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील एकाकी जागी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी कर्नाटकात एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरीलप्रमाणे वातावरणामुळे लवकरच राज्यात कडाक्याच्या थंडीचे संकेत आहेत.