भारतात २००२-०३ मध्ये बोंडअळीस प्रतिकारक असणाऱ्या बीटी कापसाला व्यापारी तत्त्वावर संमती मिळाली. या संकरित वाणांची लागवड सुमारे ९५ टक्क्यापर्यंत पोचली. त्यामुळे कपाशीला अमेरिकन बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी या तीन प्रकारच्या बोंडअळ्यांपासून संरक्षण मिळू लागले. या कपाशीवरही बोंडअळीचा (मुख्यतः गुलाबी बोंडअळी) प्रादुर्भाव दिसू लागला. गतवर्षी महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत बीटी कपाशी पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. मागील दोन वर्षांत अमेरिकन बोंडअळी ‘बोलगार्ड २’ मध्ये गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
यामुळे वाढला बोंडअळीचा प्रभाव
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असतांना व रात्रीचे तापमान ११ ते १४.५ से. असतांना सामान्यत: गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व दिवसाचे सरासरी तापमान ३५ से असल्याने ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या आळीस अटकाव झाला होता, किंतु आता वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कशी ओळखावी बोंडअळी ?
* अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येतात.
* अंडी अवस्था सुमारे ३ ते ५ दिवस राहते व या पक्र झालेल्या अड्यांतून सफेद रंगाची १ मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़ते.
* पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते,
* अळी अवस्था सुमारे ८ ते २१ दिवसांच्या दरम्यान असते.
* कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे ८ ते १० मि.मी. लांब असते तसेच कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात.
* पतंगाची लांबी सुमारे ८ ते ९ मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात व पाठीमागील पंख
* पतंगावस्था सुमारे ५ ते ३१ दिवस राहते.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीला फुलावर असतो. त्यामुळे फुले पूर्ण उमलत नाहीत. ती अर्धवट उमललेल्या अवस्थेत गळून पडतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरते. हे छिद्र बंद होते. कोवळ्या बोंडातील सर्वच भाग ती खाऊन टाकते, तर जुन्या बोंडातील ३-४ बिया ही अळी खाते. एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भाव झालेली फुले म्हणजेच ‘डोमकळी’सारखी दिसतात. परिपूर्ण बोंडामध्ये लहानसे छिद्र दिसून येते. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ९० दिवसांनी येतो. मात्र, ऑगस्ट महिन्यात (पेरणीनंतर ६० दिवसांनी) गैरबीटीमध्ये काही प्रमाणात दिसून येतो.
उपाययोजना
* कापूस पिकात किमान दोन फेरोमन सापळे लाऊन त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1,500 पीपीएम 25 मिली/10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
* गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्के पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे प्रोफेनोफॉस 40 टक्के+सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1+ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 12.50 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50+सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
* डिसेंबर 2020 नंतर कापूस पिक पुर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन किडीचे जीवनच्रक खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे विभागीय आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
स्रोत: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा मोह टाळावा.
यावर्षी पाऊसमान अतिशय चांगला झाला असला, तरी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने कापसाच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. जवळपास दोन वेचण्या या पावसामुळे खराब झाल्या असून, आता जरी कापूस चांगल्या स्थितीत दिसत असला (हिरवी कैरी व बोंडे) तरी त्यामध्ये नक्कीच बोंडअळीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा मोह न करता वेचणीनंतर लवकर कापसाचे पिक नष्ट करून त्याऐवजी रब्बीच्या इतर पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून उत्पन्नही मिळेल व पुढील वर्षीच्या हंगामासाठी बोंडअळीची साखळी देखील नष्ट होईल
संजीव पाटील,
कापूस पैदासकार , मा. फुले राहुरी कृषी विद्यापीठ