प्रतिनिधी: बंगालच्या उपसागरातील अन्फान चक्रीवादळाच्या प्रभाव संपला असून मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. या पोषक स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे १ जूनला केरळात धडकण्याचा नवीन अंदाज आज (२८ मे रोजी) हवामान विभागाने जाहीर केला. मान्सूनने मालदीवसह अंदमान निकोबारच्या परिसरात हजेरी लावली आहे. यापूर्वी हवामान खात्याने देशात मान्सूनचे आगमन ५ जून रोजी होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र चक्रीवादळाने आपला प्रभाव कमी केल्यानंतर आता अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून पोषक स्थिती तयार झाल्यास १ जून रोजी केरळात मान्सूनचे आगमन निश्चित आहे.
मान्सूनच्या तारखाभारतीय हवामानशास्त्र विभागाने अनेक वर्षांच्या निरीक्षणावरून मान्सून दाखल होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम २० मे च्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. नंतर प्रवास करत तो १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरीत राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मिरसह मान्सून दाखल होतो. मान्सूनला दाखल होण्याला ऑन सेट ऑफ मान्सून असे संबोधतात. दरवर्षी मान्सून या ठरावीक तारखेलाच येतो असे होत नाही. काही वेळा केरळात मान्सून दोन-चार दिवस अगोदर किवा पाच ते सहा दिवस विलंबाने दाखल होतो. यालाच मान्सून यंदा लवकर आला किंवा उशिरा आला असे म्हटले जाते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सूनच्या दृष्टीने देशाचे चार प्रमुख विभाग आणि ३६ उप-विभाग केले आहेत. चार प्रमुख विभाग असे : वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व व ईशान्य भारत आणि दक्षिण भारत. आयएमडीच्या मते देशात सर्वसाधारणपणे सरासरी ८८७.५ मिमी पाऊस पडतो. वायव्य भारत विभा गाची सरासरी ६१५.० मिमी, मध्यभारत विभागाची ९७५.५ मिमी, पूर्व व ईशान्य भारत १४३८.३ मिमी तर दक्षिण भारत विभागाची सरासरी ७१६.१ मिमी मानली आहे. आयएमडीने महिनेवार पावसाची सरासरी ही निश्चित केलेली आहे. त्यानुसार देशात जूनमध्ये सरासरी १६३.६ मिमी, जुलै मध्ये २८९.२ मिमी, ऑगस्ट मध्ये २६१.३ मिमी तर सप्टेंबर मध्ये सरासरी १७३.४ मिमी पाऊस पडतो. विभागवार पुन्हा या पावसाचे वितरण दरवर्षी सरासरी इतकेच राहील हे मात्र निश्चित नाही. महाराष्ट्राचे चार उप-विभाग केले आहेत.
कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. त्यानुसार त्या-त्या उप- भागात पडणाऱ्या पावसाची नोंद केली जाते. अायएमडीने महाराष्ट्रातील उप विभागवार पडणाऱ्या पावसानुसार सरासरी ठरवलेली आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर या काळात कोकण व गोवा उप विभागात सरासरी २९१५ मिमी, मध्य महाराष्ट्रात ७२९ मिमी, मराठवाड्यात ६८३ मिमी तर विदर्भात ९५५ मिमी पाऊस पडतो. यानुसार त्या त्या वर्षी त्या त्या उप विभागात किती पाऊस झाला हे ठरते.
(संकलन : अजय कुलकर्णी)