विदर्भात पाऊस तर मध्य महाराष्ट्रात वाढणार तापमानाचा पारा
राज्यात मकरसंक्रांत नंतर सातत्याने हवामानात बदल होत असल्याने रब्बीच्या पिकांना त्या हवामानाचा फटका बसला असून मागील आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात एका बाजूला कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात तफावत जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी पावसाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी उन्हाचे चटके बसत आहे. त्यामुळे सतत बदलत्या परीस्थितीत शेतकऱ्यांच्या बरोबरच सामान्य नागरिक देखील त्रस्त झाले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज ( १९ मार्च २०२०) पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले असून तापमानाचा पारा वाढला आहे. दरम्यान उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाला, पूर्वमोसमी पावसाने जोरदार दणका दिला. गारपिटीसह आलेल्या पावसाने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा पिके भुईसपाट केली आहेत.

बंगालच्या उपसागराच्या केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकर वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरुन बाष्प पुरवठा होत आहे. यातच मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने बदल होत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात वाढ झाली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वच ठिकाणी रात्री आणि दिवसातील तापमानात घट झाली. उत्तरेकडून थंड हवेचे प्रवाह सुरू झाल्याने सर्वत्र थंडी जाणवत होती. दरम्यान मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्याला अजून या वातावरणाचा फटका बसू शकतो.