नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीकडे
गुलाब लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी महिना ७० ते ८० हजार रु अर्थार्जन
विविध उत्पन्नाचे स्रोत तयार केले
रेशीम,मशरूम व दुग्धव्यवसायात अतिरक्त उत्पन्न
शेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नाची जोखीम नको म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात. परंतु आव्हाणे येथील समाधान पाटील हे असे एक नाव आहे त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून शेतीमध्ये आपली कारकीर्द घडविली. त्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख तयार केली असून पॉलीहाउस मधील डच गुलाब लागवड करून त्यांनी नविन उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. त्यामाध्यमातून ते महिना ७० ते ८० हजाराचे उत्पन्न मिळवित आहेत.
फुले हे शब्दांच्या पलीकडच्या भावना व्यक्त करतात. त्यामुळेच कवी असो वा शायर तो फुलांचा सहारा आपल्या काव्यपंक्ती मध्ये घेतोच आणि त्या रचना या फुलांचा राजा असलेल्या गुलाबाशिवाय पूर्ण होत नाहीच .
तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता,
तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता
हि कुण्या कवीने लिहिलेली रचना असो अथवा
काटें तो आने ही थे हमारे नसीब में
हमने यार भी तो गुलाब जैसा चुना थाI
वरील मैत्रीवरील शायरी असो या
रचना फुलांचा राजा असलेल्या गुलाबाच्या अस्तित्वाशिवाय पूर्ण होतच नाही.
त्याचप्रमाणे विविध प्रकारची नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील शेती करणाऱ्या समाधान
पाटील यांची शेती व त्यांचे अर्थकारण हे गुलाब शेतीशिवाय पूर्ण होतच नाही.
जळगांव पासून हाकेच्या अंतरावर
असलेल्या आव्हाणे येथील रहिवाशी असलेल्या समाधान पाटील यांनी वयाच्या १७ व्या
वर्षी वडील वारल्यामुळे घराची जबाबदारी सांभाळली. घराची जबाबदारी सांभाळीत
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आई, लहान भाऊ व बहिण यांची जबाबदारी सांभाळत त्यांनी
जवळपास १७ वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीत काम केल्यानंतर स्वतःची शेती कसायचा धाडशी
निर्णय घेतला. जळगांव रेल्वे स्टेशन पासून साधारणपणे ३ किमी अंतरावर समाधान पाटील
यांची आव्हाणे शिवारात ८ एकर शेतजमीन आहे. (वडिलोपार्जित ४ एकर व स्वअर्जीत ४ ) कृषी
विषयक सल्ल्यासाठी शासनाच्या कृषी खात्याशी समन्वय असलेल्या समाधान पाटलांनी
आपल्या २० गुंठे क्षेत्रावर त्यांनी शासनाच्या योजनेतून पॉलीहाउस उभारले आहे.
शेतीमध्ये पारंपारिक पिकासह रेशीम शेती, मशरूम, दुध व्यवसाय, सेंद्रिय मेहरूण बोर
अशा विविध शेतीपूरक व्यवसाय सांभाळून आपली शेतीमधील प्रयोगशीलता जपली आहे.
लागवड पूर्व तयारी व खत व्यवस्थापन
गुलाब लागवड करण्यापूर्वी पाटील यांना पॉलीहाउसमध्ये २ वर्ष सिमला मिरचीचे पिक घेतले होते. पॉलीहाउस मध्ये पिक घेण्याचा अनुभव गाठीशी घेत त्यांनी डच गुलाब लागवड करण्याचा निर्णय घेतला. समाधान पाटील यांनी मार्च २०१९ मध्ये गुलाब लागवड केली. त्यासाठी पुणे येथील नर्सरी मधून १० रु प्रमाणे १८ हजार रोपे खरेदी केली. लागवडी पर्यंत हा खर्च २० रु. पर्यंत गेला. रोपे आणल्यानंतर त्यांनी २ दिवस ते पॉली हाउसच्या वातावरणात सेट व्हयायला वेळ दिला. लागवड करण्यापूर्वी त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात ३ ट्राली शेणखत आणि बेसल डोस म्हणून एक बॅग DAP खत दिले. १.५ फुट X १.५ फुट अंतरावर लागवड केली. प्रत्येक १५ दिवसांनी अडीच किलो विद्राव्य खते दिली जातात. त्यात प्रामुख्याने १९:१९:१९ चा समावेश असतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी फुलांची गरज ओळखून १३:००:४५, ००:५०:३४ या खतांची मात्रा दिली जाते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर देखील केला जातो. फुलांची गुणवत्ता व टिकाऊ क्षमता वाढविण्यासाठी जीवामृताचा देखील वापर पाटील करतात.
लागवडीनंतर १ महिना पर्यंत साधारण वाढ होऊ दिली नंतर मात्र येणारी लहान लहान फुले काढून फेकली. योग्य व सारख्या फुल प्राप्तीसाठी फवारणी व खताचे वरीलप्रमाणे नियोजन केले. ऑक्टोबर महिन्यात व नंतर येणारे सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेंडिंग केली त्यानंतर ४५ दिवसांनी फुले काढणीला सुरुवात होते.
चौकट
बेंडिंग – रोपांची अनियंत्रित वाढ झाल्यास अन्नद्रव्ये पुरेसे न मिळाल्याने फुलांची संख्या एकसारखी भेटत नाही. त्यासाठी सक्षमपणे वाढणाऱ्या ठरविक फांद्यांना अन्नपुरवठा होण्यासाठी गरज नसलेल्या फांद्यांना बेंड (वाकविले) जाते. व अन्नद्रव्ये पुरवठा हा गरज असलेल्या भागाकडे वळविला जातो. त्यामुळे मोठी व टवटवीत फुले मिळतात.
कीड नियंत्रण व पाणी व्यवस्थापन
समाधान पाटील यांच्या शेतात पाणी कमी असल्यामुळे त्यांनी शेतात दोन बोअर केल्या आहेत. त्याचे पाणी ठिबक संचाने गरजेप्रमाणे दिले जाते. ठिबक संचामुळे गुलाबाला विद्राव्य खते देणे सोपे जाते आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे गेले.
रस शोषणाऱ्या किडी व अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या तर रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या गरजेनुसार आठवड्याला वा पंधरा दिवसाला फवारण्या घेऊन कलमे जोमदार वाढवली. पुढे दर दोन महिन्याला छाटणी करून फुटवे वाढवली. सुमारे सहा महिन्यांनंतर टपोरे गुलाब मिळू लागले. सुरवातीला एका कलमापासून दररोज एखादे फूल मिळे. छाटणी, खते, कीडनाशके फवारणी, ठिबक सिंचन, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांतून कलमांचे पोषण झाले. सशक्त फुटवे आल्याने पुढे दर दिवशी दोन-तीन फुले मिळू लागली. वर्षातील किमान दोनशे दिवस फुले मिळत राहिली.
गुलाबावर सर्वात जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे या किडींच्या रोगराईसाठी काटेकोरपणे व्यवस्थापन करावे लागते. यात थोडे जर शेड्यूल चुकले तरी फुलाच्या एकसमान फुलान्यावर व त्यांच्या आकारावर परिणाम होतो. या सर्व बुरशीनाशक किडींच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे रासायनिक बुरशीनाशकामध्ये ब्लू कॉपर, अॅट्राकॉल, कॉम्पिशस अॅलेट यांचा वापर करतात. लागवडीच्या ८ दिवसानंतर ब्लू कॉपर या बुरशीनाशकाची ड्रीन्चींग केली. यामुळे फुलझाडाच्या मुळ्या कुजत नाही व रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते. रसशोषण करणाऱ्या किडीमध्ये फुलकिडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे मावा, तुडतुडे याचा देखील प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी प्राईड, प्रोफोनोफॉस, सायप्रामेथीन या औषधाची फवारणी शिफारशी नुसार केली जाते.
रोजगार निर्मिती
समाधान पाटलांच्या विविध शेतीपूरक व्यवसाय व गुलाब शेतीसाठी काही सहकारी मदतीसाठी ठेवले आहे. गुलाब शेती ही वर्षभर सतत उत्पादन देणारे असल्याने फुलशेतीत लागवडीपासून ते फुल तोडणीसाठी सतत मजुरांची गरज असते. त्यासाठी पाटील यांनी कायमस्वरूपी तीन महिला व एक पुरुष मजूर आपल्या मदतीसाठी घेतले आहे. त्यांच्याद्वारे लागवड, निंदणी, बेंडिंग, फुलांची तोडणी व पॅकेजिंग अशी विविध कामे केली जातात. महिला मजूर सकाळी प्रथम २ वाजेपर्यंत फुलतोडणी करून नंतर निंदणी किंवा बेंडिंग करून घेतली जाते.
आर्थिक ताळेबंद
भारतात वर्षभर सणवार असल्याने तशी फुलांना वर्षभर मागणी असते. तरी पाटील यांनी लागवड केलेल्या गुलाबाला कार्तिकी एकादशीनंतर सुरुवात झाल्याने त्यानंतर येणारे लग्न संभारंभ, धार्मिक कार्यक्रम, सांकृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे व इतर सोहळे यामुळे वर्षभर मागणी राहिली. फुले शक्यतो सुरत, मुंबई, नागपूर, इंदौर या बाजारपेठेत पाठविली जातात.
जळगांव हे मार्केट जवळ असल्याने पाटील यांनी सुरवातीला स्वतः तोडणी व पॅकिंग करून दररोज विक्रेत्यांना पुरवत. हंगाम नसलेल्या काळातही ६० ते १५० रु. प्रति बंच याप्रमाणे दर मिळाला. याप्रमाणे खर्च वजा जाता महिन्याला ७० ते ८० हजार याप्रमाणे उत्पन्न मिळाले. वर्षातले दोनशे दिवस कलमांना प्रति कलम सरासरी २० ते २४ फुले हमखास मिळतात. फुल शेतीचापूर्वानुभव नसताना निरीक्षण, कष्ट व अभ्यासातून त्यांनी गुलाब लागवड यशस्वी केली आहे.
शेतीपूरक व्यवसाय
पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये विविधता जपली आहे.
विविध पिकाबरोबरच त्यांनी रेशीम शेती, दुग्ध व्यवसाय,गांडूळ खत निर्मिती, कंपोस्ट
खत निर्मिती, मशरूम उत्पादन याद्वारे शेतीमध्ये उत्पन्नाचे विविध मार्ग तयार केले
आहे. या मालाची विक्री ते स्वतः शहरात करतात त्यामुळे वेगेळे मार्केट शोधावे लागले
नाही. पारंपारिक शेतीकडून आधुनिकीकरण हे समाधान पाटील यांच्या शेतीचे वैशिष्ट्य
आहे. नवीन पिकं , जोडव्यवसाय, शेतामधील विजेची गरज सौरउर्जेच्या माध्यमातून भागविणे.
सतत प्रयोगशीलता यासारख्या माध्यमातून त्यांनी सतत आपल्या प्रगतीचा आलेख उंचाविला
आहे.
व्हेलेंटाइन डे साठी बर्याच जणांनी
आत्तापासून तयारी सुरु केली आहे. दरवर्षी 14
फेब्रुवारीला येणार्या व्हॅलेंटाइन डे ला प्रेमीयुगलांकडून गुलाबाच्या फुलांना
मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांचे भावही वधारलेले असतात. महाग असली तरी त्या
दिवशी ती खरेदी केली जातात. त्यामुळे ४५ दिवस आधीच
पाटील यांनीदेखील फुलांचे नियोजन केला आहे. आता त्यांच्या संपूर्ण क्षेत्रावरील
रोपांना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.
समाधान पाटील
आव्हाणे , जळगांव
७५८८०१०९७९