एम.बी.ए. पदवीधारक जरबेराफुल उत्पादक शेतकरी
स्टोरी आऊटलुक
उच्चशिक्षित एम.बी.ए. पदवीधारक शेतकरी
ग्रीन हाऊसमधील यशस्वी फुलशेती
जरबेराचा साई फ्लोरा ब्रँड
वार्षिक उत्पन्न विक्रमी ३१ लाख
एकरी सरासरी १४ लाख फुले
मुख्य पिकाचा खर्च अंतर पिकामधून
उच्च पदवीधारक युवक हे सहसा नोकरी या पेशाला प्राधान्य देतात, किंतु सातारा जिह्यातील म्हसवे येथील फुल उत्पादक युवा शेतकरी सचिन रमेश शेलार हे अपवाद असून त्यांनी आपल्या शेतीच्या माध्यमातून शेतीकडे पाठ फिरविणाऱ्या युवा वर्गासाठी आदर्श तयार केला आहे. ३१ वर्षीय सचिन यांना शेतीचा फारसा अनुभव नसतांनाही त्यांनी फुल शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयाची वार्षिक उलाढाल केली आहे.
एम. बी. ए. पूर्ण झाल्यानंतर पुढील वाटचालीस नोकरीसाठी कृषीक्षेत्र निवडले. सुरवातीस वर्षभर अमर सीडस्् व नंतर २०१० पासून के. एफ. बायोप्लांटस्् प्रा. लि. या नामांकित कंपनीमध्ये नोकरीस सुरवात केली. दोन्ही कंपनी शेती संबंधित असल्याने कामाच्या निमित्ताने नेहमीच शेतकऱ्यांशी संपर्क होता. कामाचे स्वरुप म्हणजे शेतकऱ्यांना फुलशेतीविषयी मार्गदर्शन करणे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे प्रामुख्याने ग्रीन हाऊसमधील यशस्वी फुलशेती करतात. या शेतकऱ्यांशी सतत संपर्कात होते, याकामामुळे त्यांचा फुलशेतीचा सखोल अभ्यास व स्वतःचा अनुभव प्रगल्भ होत गेला.
शेतीची सुरुवात
याकालावधीत त्यांना फुलशेतीबाबत बरीच माहिती व खाचखळगे माहित झाल्याने त्यांनी २०१३ साली म्हसवे गावातील श्री. बाळासाहेब घाडगे यांचे मोडकळीस आलेले १५ गुंठे ग्रीन हाऊस भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतले. शेतीची सुरुवात हि काकडी, कारले, दोडका ही वेलवर्गीय पिके घेण्यापासून केली. तसेच आंतरपिक म्हणून मेथी, कोथिंबीर, पालक या भाज्यांचा समावेश होता. दोन वर्षाचा अनुभव गाठीशी आल्यानंतर याच अनुभवाच्या जोरावर २०१५ मध्ये स्वतःच्या १ एकर क्षेत्रावर ग्रीन हाऊसची उभारणी केली. सुरवातीस एप्रिलच्या २० तारखेला काकडीची लागवड केली. काकडीचे उत्पादन २० मे ते १ जुलैपर्यंत अतिशय गुणवत्तावर्धक मिळाले. तब्बल ४८ टन उत्पादनासहीत सुरवातीस सुमारे ८ लाखांचे उत्पन्न घेतले. एकूण ९ एकर क्षेत्र असलेल्या सचिन यांनी ३ एकर शेतावर ग्रीन हाऊस तयार केले असून त्यात जरबेरा लागवड केली आहे. बाकीच्या शेतावर गुलाब, शेवंती, झेंडू व इतरही फुल पिके घेतली जातात.
जरबेराचा साई फ्लोरा ब्रँड
सुरवातीच्या या
उभारणीच्यावेळी अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत ऑगस्ट २०१५ रोजी जरबेरा या
पिकाची लागवड केली. पुण्यातील के. एफ. बायोप्लान्टमधूनच ही रोपे घेण्यात आली.
लागवडीपासून मार्केटींगपर्यंतचे सर्वच मार्गदर्शन अतिशय अचूक व योग्य वेळेत
मिळाल्यामुळे पहिल्या वर्षी तब्बल १६ लाख फुलांचे विक्रमी उत्पादन मिळाले व ते
आजपर्यंत चालूच आहे. सध्या ३ एकर क्षेत्रावर जरबेरा लागवड आहे हा जरबेरा पुणे,
हैद्राबाद,
बेंगलोर,
बडोदा,
दिल्ली
या मार्केटमध्ये साई फ्लोरा या नावाने ओळखला जात आहे.
उत्पादन व उत्पन्न
बाजारात गुणवत्तापूर्ण
माल असे तरच चांगला भाव मिळतो हे हेरून त्यांनी ग्रीन हाउसकडे काटेकोर लक्ष दिले
आहे. गुणवत्तापूर्ण फुलांसाठी प्रत्येक आठवड्यात ४ वेळा औषध फवारणी केली जाते.
त्यामध्ये २ फवारण्या या कीडप्रतिबंध करण्यासाठी व २ फवारण्या या पिक वाढीसाठी
केल्या जातात. एकरी सरासरी १४ लाख फुले वर्षभराच्या हंगामात मिळतात. त्यापासून ३१
लाखापर्यंत उत्पन्न मिळते. प्रति फुल २.४० पैसे प्रमाणे भाव मिळतो तर यासाठी औषधी मजुरी व वाहतूक धरून १.६०
पैसे प्रति फुल खर्च येतो. या सर्व उत्पन्नामधून बँक कर्ज हप्ते, मजुरी व औषधी
खर्च भागविला जातो. आर्थिकदृष्ट्या जागरूक असणाऱ्या सचिन यांच्याकडे प्रत्येक खर्चाचा
व उत्पन्नाचा लेखाजोखा आहे.
मुख्य पिकाचा खर्च अंतरपिकामधून
सचिन यांनी शेतीचा खर्च कमी करण्यासाठी मुख्य पिकाचा खर्च अंतरपिकामधून काढणे हा पूर्वापारपासून चालत आलेला पर्याय निवडला आहे. जरबेरासोबत स्ट्रॉबेरीसारखी फळे व जिप्सोफिला, कामिनी, साँग ऑफ इंडिया या फिलर मटेरिअलची लागवड केली असून, यामधून मजूर व खते, औषधे यांचा खर्च काढण्याचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे सध्या खुल्या क्षेत्रामध्ये १ एकर गुलाब असून, त्याचेदेखील उत्पादन उत्तमरित्या चालू आहे. तसेच झेंडू, शेवंती या पिकांमधून देखील उत्तम उत्पादन मिळते.
प्रगतीशील शेतकरी म्हणून सन्मानित
या सर्वांमध्ये महत्त्वाचे म्हणजे आर्थिक नियोजन, उत्तम गुणवत्ता, खर्च व उत्पन्न याची सांगड, विविध फुलं- पिक पद्धती, ऑफ सिझन मॅनेजमेंट, कामगारांचे अचूक नियोजन या अन्् इतर अनेक गोष्टींमुळे अल्पावधीमध्ये यश मिळविण्यास सुरवात झाली आहे. प्रामाणिकपणे व मनापासून मातीमध्ये केलेले कष्ट हे नेहमी सफल होतात. याचीच पावती म्हणून नुकतेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा यांच्या वतीने प्रगतीशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले व या यशाची नोंद बँकेने प्रकाशित केलेल्या कृषीविकास यशोगाथा या पुस्तकात केली आहे.
कुटुंबियांची साथ- शेतकरी नवरा असल्याचा अभिमान
सचिन यांच्या शेतीमध्ये सर्व परिवाराचा सहभाग असतो. सचिन म्हणतात, या सर्व यशामध्ये कुटुंबियांचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. माझी शक्ती म्हणजे माझे आई- बाबा. आई दिवसभर आमच्या महिला वर्गासोबत काम करून त्यांचे प्रोत्साहन वाढविते. सर्व खर्च आवक-जावक याचा गेल्या ८ वर्षाचा एक-एक रुपयांचा खर्च देखील तिने व्यवस्थितपणे टिपला आहे. माझे बाबा हे पोलिस दलामध्ये दोन वर्षापूर्वी सहाय्यक फौजदार म्हणून निवृत्त झाले व तेथून खऱ्या अर्थाने मला पुन्हा नविन उमेद मिळाली. कारण सर्व व्यवस्थापन फुलांची काढणी ते पाठवणे व मजुरांचे व्यवस्थापन यामध्ये त्यांनी पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सचिन सांगतात माझी पत्नी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून आज अभिमानाने माझा नवरा शेतकरी असल्याचे सांगते. माझा भाऊदेखील एल. एल. बी. पूर्ण करून जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत येण्याचा प्रयत्न करतो. तसेच माझ्या विवाहित बहिणीने सुरवातीच्या काळामध्ये माझी अतिशय खंबीरपणे साथ दिली. तसेच इतर सर्व नातेवाईक व मित्रांमुळेच आज कदाचित या यशाची सुरवात झालेली आहे.
चौकट
यशप्राप्तीसाठी आवश्यक आहेत ३ महत्त्वाचे आधारस्तंभ- के एफ. बायोप्लांटस््
काही शेतकरी यशस्वी होतात आणि काही अयशस्वी ठरतात. असे का हा प्रश्न बऱ्याच वेळा आम्हाला विचारला जातो. के एफ. बायोप्लांटस्् तर्फे याबद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला. तेव्हा सर्वानुमते एकच उत्तर मिळाले. योग्यवेळी योग्य जागी असणे यातच यशाचे गमक सामावलेले आहे. कुठल्याही व्यवसायाच्या यशाचा कळस हा समर्पित वृत्ती, निर्धार, व एकनिष्ठता या तीन भक्कम पायंवर उभा राहतो.
शेतकऱ्यांचे नाव ः श्री. सचिन रमेश शेलार
रा. म्हसवे, ता. जि. सातारा
संपर्क ः ९८६०६६०१५३