कपाशीच्या जागी रब्बीतील कमी कालावधीची पिके घेण्याचा सल्ला.
.
डॉ. सुहास दिवसे (कृषी आयुक्त, महाराष्ट्र शासन, पुणे)
पुणे (प्रतिनिधी) –
राज्यात सुमारे ४४ लाख हेक्टरहून अधिक कापूस या प्रमुख पिकाची लागवड होते. जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे कापसावरील किडीसुद्धा प्रबळ झाल्या आहेत. आपण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण करीत आहोत. त्यात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या किडींचे जीवनचक्र नष्ट करणे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदड (दुबार) घेणे टाळावे आणि त्याठिकाणी रब्बीतील कमी कालावधीची पिके घ्यावी. जेणेकरून पीक बदल झाल्याने पुढील हंगामात किडींचे संक्रमण थांबेल, असे आवाहनवजा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलतांना राज्यातील शेतकऱ्यांना दिला.
खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळे राज्यात यंदाचा खरीप हंगाम हा जोरदार असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. या रब्बी हंगामात रब्बीखालील सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून १३ डिसेंबर २०१९ अखेर ३४.४९ लाख हेक्टरवर (६०.५९%) पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात बऱ्यापैकी वाढ होतांना दिसत आहे. काही ठिकाणी अजून पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात जास्त हरबरा व मका लागवड झालेली आहे. खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावला होता. मात्र या अतिरिक्त पावसाचा फायदा हा रब्बी हंगामात होत आहे. हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. तर त्याखालोखाल ज्वारी, गहू, करडई, मका आदी पिकांचा समावेश आहे. खरिपाची पेरणी उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची खरिपातील तूर ही शेतात डोलत आहे. त्यामुळे तुरीकडूनही शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
,
गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी:
.
रब्बीत मुख्यत्वे करून घाटे अळी, गुलाबी बोंड घाटे अळी आणि लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी निरीक्षण करून या किडींचा बंदोबस्त करावा. यातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा पुढील हंगामापर्यंत असतो. त्यामुळे कापूस पिकाचे फरदड घेणे कटाक्षाने टाळावे. शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावी. कपाशी पिकाचे राहिलेले अवशेष बांधावर जमा करून ठेऊ नये, जमिनीची खोल नांगरट करावी, पीक काढणीनंतर व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व इतर पालापाचोळा नष्ट करावा. ज्यामुळे या अळीचा जीवनक्रम संपुष्टात येऊन पुढील हंगामात याचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही. परिणामी या किडींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून वेळीच बंदोबस्त करावा व नुकसान टाळावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी यावेळी केले. कपाशीच्या खाली झालेल्या शेतात कमी कालावधीची रब्बीची पिके घ्यावीत जेणेकरून पिकबदलही होईल, जमिनीत असलेली ओल तसेच उपलब्ध पाण्यामुळे उत्पादनही मिळेल व गुलाबी बोंडअळीच्या जीवनचक्राची साखळी देखील उध्वस्त करता येईल अशी अशा देखील डॉ. दिवसे यांनी व्यक्त केली.