स्टोरी आउट लुक
‘फ्रूटकेअर’ तंत्राचा वापर करून निर्यात वाढविली
संपूर्ण परिसरात 12 लाख ऊतिसंवर्धित रोपे लागवड
संपूर्ण तंत्रशुद्ध असे फिलिपाइन्सच्या धर्तीवर अत्याधुनिक असे पॅकहाऊस
स्थानिक व्यापार्यांपेक्षा मालाला 100 रु जास्त दर
संख्यात्मक (क्वांटिटी) उत्पादन वाढविण्यापेक्षा, गुणात्मक (क्वालिटी) उत्पादन वाढविण्यावर भर.
आज जगात 123 देशात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी हे जगात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी लक्षात घेता तांदलवाडीता . रावेर, जि .जळगांव या तापी नदीकाठावरील 5000 हजार लोकसंख्या असलेल्या गावाने निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी अशी ओळख गावातील महाजन बंधूच्या महाजन बनाना एक्स्पोर्ट या पॅकहाऊसच्या माध्यमातून तयार केली आहे. गावातील प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन यांनी परिसरात 12 लाख केळी झाडांचे व्यवस्थापन परिसरात करून हि ओळख तयार केळी आहे. केळी हे उष्ण कटीबंधीय फळ असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते. हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्त उष्ण हवामान असल्यास पिकावर अनिष्ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्यास पिवळी पडतात आणि 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्त झाल्यास केळीची वाढ खुंटते. उन्हाळयातील उष्ण वारे व हिवाळयातील कडाक्याची थंडी या पिकाला हानीकारक असते. जळगांव जिल्हयातील हवा दमट नसली तरी केळी खाली जास्त क्षेत्र असण्याचे कारण म्हणजे तेथील काळी कसदार जमिन, पाणी पुरवठयाची चांगली सोय. केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवते . क्षारयुक्त जमिन मात्र केळी लागवडीस उपयुक्त नाहीत. ही आहे केळी पीक लागवडसाठी आवश्यक असलेली प्राथमिक वातावरण मर्यादा यातील बर्याच निकषामध्ये जळगांव जिल्हा बसत नाही. तरीही 41-45 तापमान असणार्या जिल्ह्यात केळी निर्यात करणे हा प्रकार म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे आहे. परंतु ही किमया साधली आहे. तांदलवाडी ता.रावेर जि. जळगाव येथील येथील श्री प्रशांत महाजन व श्री प्रेमानंद महाजन यांनी केळी उत्पादक असणार्या महाजन बंधु यांनी केळी भावाची अनिश्चितता व केळीचा उत्तर भरताकडे झालेला लागवडीचा प्रसार यामुळे जिल्ह्याची केळी पीक उत्पादक म्हणून संपलेली मक्तेदारी व व्यापारी चक्रूव्यह यातून बाहेर पाडण्यासाठी केळी निर्यात करता येईल का या दृष्टीने संपूर्ण भारतातील अत्याधुनिक पॅक हाऊस व विविध निर्यातदार यांच्याशी संपर्क केला ,परंतु जळगांवची केळी ही निर्यातक्षम नाही अशीच अवहेलना त्यांच्या वाट्याला आली. अमेरिका ,जर्मनी,रशिया, युके,जपान, इराण,चीन आणि युएई आणि केळीची प्रमुख बाजारपेठ आहे. इतकी मोठी बाजारपेठ असूनही पुरवठादार कमी आहे म्हणून हे सर्व बरे वाईट अनुभव घेऊन त्यांनी 2014-15 साली प्रत्येकी 150 एकर केळीची जमीन असणार्या महाजन बंधूंना परिसरातील शेतकर्यांना केळी निर्यात करता येईल या दृष्टीने दीड कोटी रुपये खर्च करून 16 हजार चौरस फूटाचे संपूर्ण तंत्रशुद्ध असे अत्याधुनिक पॅक हाऊस उभारले. यासाठी त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या शासकीय योजनेमधून निधि उभारला. या प्रकल्पामधून मार्च ते जून या कलावधीत दररोज साधारणत: 40-42 मे. टन क्लिनिंग, ग्रेडिंग व पॅकिंग करून केळी निर्यात केली जाते.
कार्यपद्धती
निर्यातक्षम केळी तयार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर व महाजन बंधूचा केळी उत्पादनाचा अनुभव, मेहनत व चिकाटी याला जैन ग्रुप चे जागतिक केळीतज्ज्ञ श्री के. बी. पाटील सर यांचे अनमोल मार्गदर्शन व त्यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी या भागातील शेतकरी समूहाला दिलेला ‘फ्रूटकेअर’ तंत्राचा मंत्र याची जोड लाभली आहे. फ्रूटकेअर तंत्राचा वापर केल्याने आज तांदलवाडी येथील शेतकरी उच्च गुणवत्तेची केळी निर्यात करतात. फ्रूटकेअर तंत्र खालीलप्रमाणे वापरले जाते. यासाठी शेतकर्यांना लागवड पासून ते पूर्ण हंगाम येईपर्यंत सर्व मार्गदर्शन व सहकार्य महाजन बंधु कडून केले जाते. बाजारपेठेतील अंदाज घेऊन साधारणपणे फेब्रुवारी पासून लागवडीसाठी सुरुवात केली जाते. संपूर्ण परिसरात ऊतिसंवर्धित रोपे, 5.5 द 6 , 5 द 6 किंवा जमीनीचा पोत बघून अंतर ठरवून ठराविक फुटांवर मल्चिंग पेपर किंवा बेडवर लागवड केली जाते. प्रतिकूल हवामान स्थिति असतांनाही ती अनुकल करण्यासाठी शेतकरी झाडाजवळ सन गवताची लागवड करतात. शेताच्या बांधावर शेवरी लागवड करून उष्ण वार्याना नियंत्रित केले जाते. केळीच्या घडाना आच्छादन (स्कर्टींग बॅग) वापरून तापमान नियंत्रित करतात. टिबक सिंचनामार्फत गरजे प्रमाणे पाणी व विद्राव्य खते उपलब्ध करून योग्य संतुलित मात्रेत पिकासाठी आवश्यक ते घटक पुरविले जतात. केळी फुलाला योग्य वेळी रसायनिक औषधे पुरविली जातात. घडाची काळी फुले (फ्लोरेट) तोडून त्यात फक्त आठ ते नऊ फण्या ठेवल्या जातात. केळी निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेली फळांची लांबी, गोलाई (7 ते 8 इंच लांबी व 42 ते 45 कॅलिपर घेर) या गोष्टी काळजी पूर्वक शेतकर्याच्या शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी करून योग्य वेळी घड कापणी केली जाते. कापणी व पॅकहाऊस मध्ये काम करताना मजुरांना हँड ग्लोज वापर आवश्यक केला आहे जेणेकरून फळाला नख लागून फळ फक्व झाल्यानंतर त्यावर काळा डाग पडू नये. यामध्ये निर्यांतक्षम केळी वेगळी करून त्यांना स्थानिक बाजारपेक्षा 100 रु जास्त भाव दिला जातो. मागील हंगामात कमाल 1450 रुपये प्रतिक्विंटल दर शेतकर्यांना दिला आहे आज तांदलवाडीजवळील बलवाडी, हतनूर, सुनोदा, मांगलवाडी, उदळी येथील येथील सर्व शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादित करत आहेत.
पॅकहाऊस प्रक्रिया
केळी पॅकहाऊसमध्ये आल्यानंतर त्याची प्रतवारी केली जाते नंतर पाण्याच्या मोठ्या हौदात स्वच्छता. करून दर्जेदार फण्या दुसर्या हौदात टाकण्यात येतात. पॅकहाऊसची यंत्रणा स्वयं चलित कन्व्हेअरवर आहे त्यात मजुरांना दर्जेदार केळी निवडून दुसर्या प्रतीची केळी हि स्वयं चलित कन्व्हेअर वर दुसर्या भागात टाकली जातात. स्वच्छता झाल्यानंतर वजन करून त्यांना पंख्याच्या हवेत सुकवून त्यांना लेबल लावले जाते. नंतर स्वच्छ व सुकलेली केळी प्लास्टिक पिशवीत भरून त्यातील हवा मशीन द्वारे काढली जाते. हा सर्व माल एक्स्पोर्ट कंपनीच्या नावाने तयार बॉक्समध्ये ठेऊन त्याला त्याला प्री कूलिंग चेंबरमध्ये एका विशिष्ट तापमान येपर्यंत ठेऊन त्याच समक्ष वातावरणात 20 टन क्षमतेच्या रेफर व्हॅन कंटेनरमधून (गछझढ) बंदरात व तेथून जहाजाने विविध देशांमध्ये निर्याती साठी पाठविले जातात. ही संपूर्ण कार्यसाखळी कोणत्याही ठिकाणी कुठलीही तडजोड न करता अतिशय काटेकोरपणे राबविली. अश्या प्रकारे महाजन बंधू यांनी मागील हंगामात 20 टन क्षमतेच्या 200 कंटेनर केळी मालाची निर्यात केली आहे. या वर्षी त्यांना हा आकडा 250 पर्यंत जाईल हा विश्वास आहे. या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाजन यांच्याकडे स्थानिक व राज्यबाहेरील असे मिळून 100 कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या मार्फत हार्वेस्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग व माल पुरवठ्याची सेवा देण्यात येत आहे. दिवसाला 40 टन केळीवर या केंद्रात प्रक्रिया होते. महाराष्ट्रातील एकमेव असे संपूर्ण फिलिपिन्स धर्तीवरचे अत्याधुनिक असे पॅकहाऊस आज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. ज्या ठिकाणी वरील सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी होतात असे पॅक हाऊस दक्षिण भारतात सहज दिसतील पण महाराष्ट्र राज्यात दुसरीकडे असा प्रकल्प नाही असा महाजन बंधूंचा दावा आहे.
आज तांदलवाडी व परीसरातील संपूर्ण शेतकरी हे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध झाले आहे. येथील एकूण लागवडपैकी 80 % माल हा निर्यात व राहिलेला 20 % हा स्थानिक बाजारपेठ मध्ये पाठविला जातो. पुढील वर्षापासून महाजन बंधूनी राहिलेल्या मालापासून केळी चिप्स बनविण्याचा प्रकल्प सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. आज त्यांच्या या प्रकल्पामुळे स्थानिकांना एकरी लाखो रुपयाचे उत्पन्न या माध्यमातून मिळत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाजन बंधू यांनी शेतकर्यांना संख्यात्मक (क्वांटिटी) उत्पादन वाढविण्यापेक्षा, गुणात्मक(क्वालिटी) उत्पादन वाढविण्याच्या मानसिकतेत प्रवर्तित केले आहे. याच त्यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून आज महाजन बंधू त्या निर्यातदारांना केळी पुरवठा करीत आहे. ज्यांनी कधीकाळी त्यांना जळगांव मधील केळी निर्यातक्षम नाही असे सांगितले होते .
प्रतिक्रिया :
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘फ्रूटकेअर’ केलेल्या मालाच चागली मागणी असल्याने भविष्यात स्वतःच्या महाजन बनाना एक्स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही हा निकष पूर्ण केला आहे आता जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘ब्रँड’ बनवून त्याद्वारे जळगाव जिल्ह्याला संपूर्ण जगभर नवीन ओळख करून द्यायची आहे.
प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन – 9890810357
जळगांव मध्ये निर्यातक्षम दर्जाची केळी उत्पादित होत आहे.यामुळे पद्मश्री भवरलाल जैन यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येला फळ आले आहे.तंत्रज्ञानामुळे केळीची गुणवत्ता सुधारली असून येत्या पाच वर्षात जिल्हा केळीचे हब व भारताचे फिलिपाइन्स म्हणून ओळखला जाईल
डॉ.के.बी.पाटील आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ,जळगांव