महात्मा फुले कृषी विद्यापीठद्वारा प्रसारित उन्हाळी हंगामासाठी असलेल्या फुले पूर्णा नावाच्या तीळ जातीचे बियाणे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरती या वर्षाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतावर बहारदारपणे फुललेले दिसत आहे. उन्हाळी हंगामात तीळ पिकाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी व तीळ पिकाची लागवड करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठद्वारा विशेष प्रचार व प्रसार मोहीम हाती घेण्यात आली होती, त्याअनुषंगाने प्रसार माध्यमांवरती दिलेल्या लेखाद्वारे, वृत्तपत्राद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली आणि या मोहिमेस शेतकऱ्यांकडून उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
गाजर शेती ही अनेक शेतकऱ्यांसाठी एक यशस्वी आणि फायदेशीर पर्याय ठरली आहे. गाजराची लागवड आणि काढणी या दोन्ही प्रक्रियेत योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पन्न मिळवता येते. अशाच पंजाबमधील फुमन सिंग कौरा यांनी गाजर पिकाची लागवड करून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नशीब बदलले आहे. त्यांनी 30 वर्षांपूर्वी भाताऐवजी गाजरांची लागवड सुरू केली. आज ते दरवर्षी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहे. त्यांच्याकडे बियाणे बँक असून 650 एकरपेक्षा जास्त जमिनीवर लागवड करू शकतो इतके बियाण्यांचा साठाही त्यांनी केला आहे.

संघर्षाने भरलेले बालपण
फुमन सिंग हे कपूरथला जिल्ह्यातील परमजीतपुरा (अल्लूपुर) गावातील रहिवासी आहेत. पूर्वी त्यांचे आजोबा आणि वडील पारंपरिक शेती करायचे, पण उत्पन्न कमी यायचे. यामुळे त्यावेळी घरातील खर्च भागवणे अवघड होते. फुमन सिंग यांचे बालपण संघर्षाने भरलेले होते. त्यांना घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे बी.ए. द्वितीय वर्षाला असताना शिक्षण सोडावे लागले. त्यावेळेस त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यानंतर फुमन सिंग त्यांच्या वडिलांसोबत शेतात जाऊन शेतीत मदत करायला लागले. पुढे त्यांनी गहू, भात शेतीबरोबरच दूध विकण्याचाही व्यवसाय केला. पण, यातून फारसा नफा मिळत नव्हता. फुमन सिंग यांना दुसरा मार्ग सापडत नव्हता.
गाजर शेती करण्याचा निर्णय
परमजीतपुरा गाव गाजर शेतीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात संधी शोधली. त्यांनी गावातील एका अनुभवी शेतकऱ्याची मदत मागितली, पण त्याने मदत करण्याऐवजी टोमणे मारले की “हे तुझ्या बसचं नाही.” या अपमानाने प्रेरित होऊन फुमन सिंग यांनी गाजर शेतीत स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला. त्यांनी कृषी विज्ञान केंद्र (KVK) आणि जवळच्या कृषी विद्यापीठात जाऊन गाजर शेतीची तांत्रिक माहिती घेतली. 1993 मध्ये त्यांनी संपूर्ण 4.5 एकर जमिनीत गाजर पेरण्याचा धाडसी निर्णय घेतला. मेहनतीच्या जोरावर त्यांना पहिल्याच हंगामात चांगले उत्पादन मिळाले. पुढच्या काही वर्षांत उत्पन्न वाढले आणि त्यांनी हळूहळू जमिनीत वाढ केली. आज त्यांच्या मालकीची 80 एकर जमीन आहे, जिथे मुख्यतः गाजर आणि बियाणे उत्पादन घेतले जाते. ते बियाण्यांचीही विक्री करतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
सुरुवातीला हाताने बियाणे पेरावे लागत होते, पण नफ्यात वाढ झाल्यावर त्यांनी आधुनिक मशीन खरेदी केली. उच्च दर्जाची गाजर उत्पादनासाठी त्यांनी वेगवेगळ्या गाजर प्रजाती आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांसोबत नियमित सल्लामसलत करत राहिले. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढली आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून थेट खरेदी सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांना आपली उपज विकण्यासाठी जालंधर, लुधियाना आणि अमृतसरच्या बाजारात जावे लागायचे.
मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यांच्या उत्कृष्ट उत्पादनामुळे व्यापारी थेट त्यांच्या शेतावर येऊन खरेदी करतात. त्यामुळे त्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचतो, आणि दरही अधिक चांगले मिळतात. आज त्यांना कुठेही माल विकायला जाण्याची गरज नाही. “बाजार समिती स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचते.” वार्षिक 1 कोटींहून अधिक नफा गाजर शेती आणि बियाणे विक्रीतून ते दरवर्षी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावतात. त्यांच्या यशस्वी प्रवासामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत बनले आहेत. गावातील इतर शेतकरीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन गाजर शेतीत उतरले आहेत. लहानपणी फुमन सिंग यांना उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक व्हायचे होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण, शेतीतूनच त्यांनी एवढी मोठी प्रगती केली की आज त्यांचे नाव संपूर्ण पंजाबभर गाजत आहे. ते म्हणतात, “जर तुमच्याकडे जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर भारतात राहूनही मोठे यश मिळवता येते.”
गाजरांची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान केली जाते आणि ते 90-100 दिवसांच्या कापणी चक्रानुसार होते. 20 डिसेंबर ते 25 मार्च या कालावधीत ते गाजरांची काढणी करतात. प्रति एकर किमान 110 क्विंटल गाजराचे उत्पादन फुमन सिंग यांना मिळते, पण, गाजर पिकाचे व्यवस्थापन योग्यरीत्या केले तर 250 क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळू शकते. तसेच बाजारात गाजराचे दर चांगले असतील तर चांगला नफा मिळू शकतो, असे फुमन सिंग सांगतात. गाजर पिकाव्यतिरिक्त ते मका पिकाचे देखील उत्पादन घेत आहे. याची कापणी ते सप्टेंबर महिन्यात करतात.
आशा सोडू नका – फुमन सिंग
फुमन सिंग आता गाजर उत्पादनाची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते गाजराचे निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करत आहेत. त्यांचे ध्येय आहे की, पंजाबमधील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळावे आणि चांगला नफा मिळवावा. प्रत्येक महत्त्वाकांक्षी शेतकऱ्याला ते म्हणतात, “आशा सोडू नका. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फक्त दृढनिश्चयाची आवश्यकता आहे. अशक्य काहीही नाही.















