केळी… भारताच्या शेतीचा कणा ठरलेलं पीक, पण आजही अधिकृतपणे फळांच्या यादीत स्थान न मिळालेलं वास्तव. जगातील एकूण केळी उत्पादनाच्या तब्बल २६ ते ३० टक्के उत्पादन भारतात होतं, ही बाब अभिमानास्पद आहे. आठ कोटी १८ लाख मेट्रिक टन जागतिक उत्पादनात भारताचा वाटा तीन कोटी ३३ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचला आहे. या यशामागे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांची निर्णायक भूमिका आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा तर केळी उत्पादनाचं जागतिक केंद्र म्हणून पुढे आला आहे. ‘जळगाव केळी’ला मिळालेला GI टॅग हा केवळ सन्मान नाही, तर जागतिक ओळखीचा शिक्का आहे. पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या केळीने आज आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. ठिबक सिंचन, ऊतीसंवर्धित रोपे आणि फर्टिगेशनमुळे उत्पादन दुप्पट झालं आहे. बहुमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी नवे मार्गदर्शक ठरत आहेत. मोबाईलमधील ॲप्सपासून सोशल मीडियापर्यंत माहितीचा प्रवाह थेट शेतात पोहोचतो आहे. याचा परिणाम केवळ उत्पादनावर नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनमानावरही दिसतो आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागांतर्गत मी ‘बहुमाध्यमे – शेतीचे नवतंत्र’ वापरामुळे केळीचे उत्पादन व उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे राहणीमान आणि जीवनशैलीत बदल झाल्याविषयी संशोधन केले आहे. माझ्या संशोधनाचा विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ: जळगाव जिल्हा)’ हा आहे. या संशोधनाशी संबंधित प्रबंध विद्यापीठातील संशोधन विभागाने स्वीकारून मला ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ ही पदवी प्रदान केली आहे. त्यामुळे मला माझ्या नावासमोर अधिकृतपणे ‘डॉक्टर’ उपाधी लावण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीत नवतंत्र आणि बहुमाध्यमे वापरामुळे कसा बदल होत गेला, याविषयीचा सविस्तर अभ्यास ८९० पानांच्या प्रदीर्घ शोधप्रबंधात नोंदला आहे. ‘ॲग्रोवर्ल्ड’ मासिकाच्या वाचकांसाठी या संशोधन कार्याचा सारांश देत आहे.

प्रास्ताविक
केळी हे भारतात सर्वाधिक उत्पादन होणारे पीक आहे. केळीला अद्याप फळाचा दर्जा देऊन फळांच्या यादीत समावेश झालेला नाही. जगभरातील केळी उत्पादनाशी भारतातील केळी उत्पादनाची मेट्रिक टनात तुलना केली, तर सरासरी २६ ते ३० टक्के केळी उत्पादन भारतात होते. जगभरात दरवर्षी आठ कोटी १८ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन होते, त्या तुलनेत भारतात तीन कोटी ३३ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन घेतले जाते. भारतात केळी उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व गुजरात ही राज्ये अग्रेसर आहेत. यात महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ३९ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन घेतले जाते. जळगाव जिल्ह्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या केळीला परदेशात ‘जळगाव केळी’ म्हणून निर्यातीसाठी २०१६ मध्ये ‘भौगोलिक मानांकन’ मिळाले आहे. हे मानांकन विशिष्ट वस्तूच्या निर्मितीची जागा व ओळख निश्चित करते. याच सर्टिफिकेटला GI Tag किंवा Geographical Indication Tag असेही म्हणतात. भारतातील केळी अरब राष्ट्रांसोबत इराण, इराक, दुबई, नेपाळ, बांगलादेशमध्ये निर्यात होते. ती युरोपच्या बाजारपेठेत पोहोचावी म्हणून कृषी विभागाने ‘बनाना नेट’ प्रणाली कार्यान्वित केली आहे.
जगभरात ‘जळगाव केळी’ला आज ओळख मिळालेली असली, तरी केळी हे पीक किमान पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. भारत अतिप्राचीन काळापासून केळी उत्पादकांचा देश असून भारतासह आग्नेय आशियामध्ये केळीचे उत्पादन घेतले जात होते, असे संदर्भ काही ग्रंथात व लेखनात आढळतात. पूर्वीच्या पर्सिया (आजचे इराण-इराक) भागातून आक्रमणकर्ता अलेक्झांडर इसवी सन पूर्व ३२७ मध्ये भारतात आला, तेव्हा त्याच्या सोबतच्या सैनिकांनी भारतातील केळीचे वाण मध्यपूर्व भागात आफ्रिकेकडे नेले, असेही संदर्भ आहेत. प्रारंभी या फळाला भारतात ‘कदली फलम्’ असे नाव होते. अरब व्यापाऱ्यांनी या फळाला ‘केळी’ किंवा ‘फिंगर’ असे नाव दिले, असेही संदर्भ समोर येतात. सतराव्या-अठराव्या शतकात केळी लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये पोहोचली. युरोपियन व इंग्लंडच्या बाजारपेठेत केळीला उच्च वर्गात ‘लक्झरी फळ’ म्हणून मान्यता मिळाली. भारतात मात्र केळी प्रारंभापासून सर्वसामान्य वर्गातील नागरिकांचे फळ आहे.

प्राचीन संस्कृतीत केळी
केळीचे प्राचीन भारतीय शास्त्र रुग्वेद, स्कंद-विष्णूसह इतर पुराणे, धार्मिक-पूजा पाठशी संबंधित ग्रंथ यात केळी फळाचा उल्लेख आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील संगम साहित्यात केळी लागवडीची माहिती मिळते. हे साहित्य इसवी सन पूर्व ३०० ते ४०० या काळात तयार झाले आहे. बौद्ध साहित्यात केळीला आंबा आणि जॅकफ्रूटसह ‘मुक्कानी’ फळांमध्ये समाविष्ट केले आहे. तमिळनाडूत मुक्कणी फळे म्हणजे आंबा, केळी आणि फणस यांच्या गरापासून ‘मुक्कणी खीर’ तयार केली जाते. या खीरचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. भारतातील विविध शैलींच्या प्राचीन मंदिरे आणि डोंगर पोखरून केलेल्या लेण्या-गुहांमधील चित्रे वा कोरीव मूर्तीकला यात केळीच्या झाडांसह फळांचा समावेश असल्याचे दिसते. अजिंठा आणि वेरूळ येथे डोंगर पोखरून तयार केलेल्या लेण्यांमध्ये केळीशी संबंधित शिल्पे-भिंतीचित्रे आहेत. काही मंदिरांच्या प्रवेशद्वार व गर्भगृहात केळीची झाडे कोरलेली दिसतात. या संदर्भातील इतर अनेक तपशील आंतरजालावरील ‘गुगल’ शोधात उपलब्ध होतात. केळीचे झाड, पाने आणि फळाला प्राचीन नागरी संस्कृतीत पवित्र फळ म्हणून मान्यता होती, असेही संदर्भ आढळतात.
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादनात वाढ
केळी उत्पादनात भारत २०२२ मध्ये जगात पहिला ठरला. केळीचे सुमारे तीन कोटी टन उत्पादन साध्य झाले. दुसरीकडे जगातला क्रमांक तीनचा निर्यातदार असलेल्या फिलिपीन्समध्ये केळीचे उत्पादन सुमारे २५ टक्क्यांनी घसरले. यामुळे भारतातील केळी निर्यातीला चालना मिळाली आहे. राज्यात निर्यातक्षम केळी रावेर, यावल व मुक्ताईनगर (जि. जळगाव) आणि शहादा (जि. नंदुरबार) येथे सध्या घेतली जाते. महाराष्ट्रातील जळगावसह पुणे व सोलापूर जिल्ह्यांत २०१६ च्या दरम्यान केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफ्याविषयी सर्वेक्षण करण्यात आले. त्याचे निष्कर्ष Economic analysis of banana production from Western Maharashtra या संशोधन अहवालात दिले आहेत. या सर्वेक्षणात शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची आकडेवारीही दिलेली आहे. जळगाव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत कमी जमीनधारण करणारा केळी उत्पादक एका हेक्टरमध्ये १,११५ क्विंटल, मध्यम जमीनधारण करणारा केळी उत्पादक एका हेक्टरमध्ये १,११२ क्विंटल आणि मोठी जमीनधारण करणारा केळी उत्पादक एका हेक्टरमध्ये १,११७ क्विंटल केळीचे उत्पादन काढतो. त्याला या केळीसाठी अनुक्रमे १२ लाख ४९ हजार (कमी जमीनधारण करणारा शेतकरी), १२ लाख ३१ हजार (मध्यम जमीनधारण करणारा शेतकरी) व १२ लाख ६९ हजार रुपये (मोठी जमीनधारण करणारा शेतकरी) एकूण उत्पन्न मिळत आहे. यातून शेतीचा सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांना नफा म्हणून अनुक्रमे ८ लाख ६२ हजार (कमी जमीनधारण करणारा शेतकरी), ८ लाख ६८ हजार (मध्यम जमीनधारण करणारा शेतकरी) आणि ९ लाख ९ हजार रुपये (मोठी जमीनधारण करणारा शेतकरी) मिळत आहेत. या अहवालाचा निष्कर्ष हा केळी उत्पादकांचे उत्पादन व उत्पन्न वाढत आहे, याकडे बोट दाखवतो.

केळी उत्पादकांकडून बहुमाध्यमे – नवतंत्राचा वापर
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी विविध माध्यमांतून केळीच्या नवतंत्राविषयी माहिती मिळवतात. या माहितीचा त्यांना किती उपयोग होतो, याविषयी अभ्यासकांनी सर्वेक्षण केले आहे. Technological gap in banana production technology या विषयावरील अहवालात शेतकऱ्यांची केळीविषयक माहिती मिळविण्याची क्षमता, प्रयत्न आणि नवतंत्र स्वीकारण्याची मानसिकता यांविषयी निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षांसाठी शेतकऱ्यांना एकूण ४९ प्रश्न विचारले होते. त्यानुसार नवतंत्राची सर्वाधिक माहिती असलेले केळी उत्पादक शेतकरी ७१ टक्के, मध्यम माहिती असलेले ५० ते ६९ टक्के आणि खूपच कमी माहिती असलेले ४९ टक्के शेतकरी समोर आले. तंत्रज्ञान स्वीकारणारे सुद्धा त्याच टक्केवारीत म्हणजे ७१, ५० ते ६९ आणि ४९ टक्के आढळून आले.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हेल्पलाइनचा वापर करून कृषी विषयक सल्ला घेतात. त्यानुसार कार्यवाही करून केळीचे उत्पन्न वाढवतात, असे दर्शविणारा अहवाल Impact of Help Lines on Farmers with Respect to Jalgaon District समोर आलेला आहे. हे शेतकरी कॉल करण्यासाठी मोबाईल कॉलचा किंवा मोबाईलमधील ॲण्ड्राॅईड ॲपचा वापर करतात. सरकारकडून उपलब्ध किसान कॉल सेंटर, नॅशनल हेल्पलाइन फॉर फार्मर, किसान विज्ञान केंद्र, आरसीईएफ फार्मर केंद्र, सरकारचे उमंग ॲण्ड्राॅईड ॲप याच्यासह आरएमएल, किसान, फार्म राईज, ॲग्रोस्टार, खेतीबाडी, कृषी किंग, कृषी ज्ञान, कृषी केंद्र, किसान मार्केट, इफको किसान, ॲग्रिकल्चर, क्रॉप इन्शुरन्स या ॲण्ड्राॅईडवरील हेल्पलाइनचा शेतकरी वापर करतात.
जळगाव जिल्हा केळी उत्पादक शेतकरी संघाने त्यांचे फेसबुक पेज तयार केले आहे. त्याचे १८ हजारांवर सदस्य आहेत. या फेसबुक पेजमार्फत केळी उत्पादकांना केळीविषयी सखोल माहिती, शेतकऱ्यांचे अनुभव, नवतंत्रज्ञान, बातम्या, केळीचे बाजारभाव दिले जात आहेत. केळीचे बाजारभाव रोज सकाळी या पानावर टाकले जातात. या पेजवर शेतकरी केळी उत्पादनाचे अनुभव शेअर करीत आहेत. काही शेतकरी अडचणींबाबत प्रश्न विचारत आहेत.
केळी उत्पादकांकडून शेतीच्या नवतंत्राची माहिती घेण्यासाठी नवमाध्यमे किंवा बहुमाध्यमांचा होणारा वापर लक्षात घेता शेतकऱ्यांच्या गेल्या दोन पिढ्यांमधील केळी उत्पादकांचे शेतीतील उत्पादन व उत्पन्न वाढलेले दिसते. त्यामुळे त्यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारून राहणीमान व जीवनशैलीत बदल झाल्याचे दिसून येते. याच विषयाचा अभ्यास केळी उत्पादकांच्या कौटुंबिक व शेत शिवारातील स्थळ भेटी, पाहणी, मुलाखती, प्रश्नावली भरून घेणे यातून केलेला आहे. त्याचे सर्व तपशील, संदर्भ व निष्कर्ष शोधप्रबंधात नोंदले आहेत. ही माहिती संकलित करण्यासाठी अन्वेषणात्मक आराखडा तयार केला होता. त्यानुसार मिळालेली सारंश स्वरूपातील माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल
संशोधन कार्यासाठी प्रारंभी घटक आणि क्षेत्र निश्चित केले होते. संशोधनाच्या विषयात प्रामुख्याने केळीसाठी नवतंत्र वापरणारा आणि माहिती मिळविण्यासाठी बहुमाध्यमे वापरणारा शेतकरी हा प्राथमिक घटक आहे. यानुसार संशोधन कार्याचा थेट संबंध तीन घटकांशी आहे. त्यातील पहिला घटक हा पारंपरिक आणि नवतंत्र वापरणारा केळी उत्पादक आहे. दुसरा घटक हा बहुमाध्यमांमधील आशय तयार करणारा संपादक, पत्रकार व तंत्रज्ञ आहे. तिसरा घटक हा कृषी नवतंत्र निर्मिती करणारा कृषीतज्ज्ञ, कृषी तंत्रज्ञ आणि ते तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आहे. संशोधनाच्या घटकांसोबत कार्यक्षेत्र हे जळगाव जिल्हा निश्चित केलेले आहे. या क्षेत्रात १५ तालुक्यांचा समावेश होतो. जळगाव जिल्ह्यात दर वर्षी किमान ४७ हजार हेक्टर व कमाल ५२ हजार हेक्टर केळी लागवड केली जाते. या क्षेत्रातून सुमारे ३४ ते ४० लाख टन केळीचे उत्पादन घेतले जाते. जळगाव जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. त्यातील सर्वाधिक केळी लागवड करणाऱ्या तालुक्यातील क्षेत्र असे – रावेर १८,५०० हेक्टर, यावल ९,४००, चोपडा ४,८००, मुक्ताईनगर ३,६००, जळगाव २,९००, भडगाव १,८००, जामनेर १,७००, भुसावळ १,७००, पाचोरा १,४००, चाळीसगाव ७०० हेक्टर. याशिवाय इतर तालुक्यांत केळीचे लागवड क्षेत्र ५ हेक्टरच्याही आत येते.
मुलाखती व प्रश्नावली भरून घेण्यासाठी एकूण १५ तालुक्यांपैकी केळी उत्पादन घेणारे रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, जामनेर, भुसावळ, पाचोरा आणि चाळीसगाव असे १० तालुके निश्चित करण्यात आले. या १० तालुक्यांतून रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव या ५ तालुक्यांत किमान ८० ते कमाल २०० एकरवर केळी लागवड करणारे शेतकरी आहेत. तसेच भडगाव, जामनेर, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात किमान १० ते कमाल ९० एकरवर केळी लागवड करणारे शेतकरी आहेत.
यादृच्छिक पद्धतीने प्रश्नावली भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांची एकूण संख्या ५०० घेण्याचे निश्चित केले. प्रश्नावली भरून घेण्याच्या एकूण ५०० या संख्येत २४० शेतकरी जेआयएसएलचे तंत्रज्ञान वापरणारे असावेत हे निश्चित करून त्यांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे ठरली. रावेर – १००, जामनेर – ३०, चोपडा – २५, चाळीसगाव – १५, मुक्ताईनगर – १५, जळगाव – १०, यावल – १०, भडगाव – १०, भुसावळ – १०, पाचोरा – १०, धरणगाव – ५, बोदवड – ५, एरंडोल- ५. जळगाव जिल्ह्यात जेआयएसएलच्या सोबत बाजारपेठेत कृषीतंत्र – ठिबक सिंचन संच विक्रीसाठी किमान इतर २५ उत्पादकांचे (कंपन्यांचे) साहित्य – संच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संशोधकाने निर्णय घेतला की, जेआयएसएलच्या सोबतीने बाजारात असलेल्या इतर पाच कंपन्यांची नावे निश्चित करावीत. ठरल्यानुसार प्रश्नावली भरून घेण्याचा सविस्तर तपशील ठरला असा –
१) जेआयएसएल – जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (२४० शेतकरी)
२) नेटाफिम – नेटाफिम इंडिया लिमिटेड (६० शेतकरी)
३) एफआयएल – फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिटेड (५० शेतकरी)
४) ईपीसी – ईपीसी इंडस्ट्रिज लिमिटेड (५० शेतकरी)
५) श्रीराम प्लास्ट – श्रीराम प्लास्टीक इंडस्ट्रिज लिमिटेड (३० शेतकरी)
६) कोठारी – कोठारी अॅग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड (३० शेतकरी)

जेआयएसएलचे वर्चस्व
गेल्या ५० वर्षांत संपूर्ण भारतासह जगात किमान एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत जेआयएसएलची विविध उत्पादने पोहोचली आहेत. ऊतिसंवर्धित रोपांपासून तर पिकांच्या पेरणी – रोपणपासून वाढ – पोषण – संरक्षण – काढणी – वाहतूक – कराराने खरेदी आणि शेतमालावर प्रक्रिया अशा सर्वच क्षेत्रात विविध तंत्र – यंत्र – सेवा – सुविधा पोहोचविणारा जेआयएसएल हा सुमारे २५ वर विविध कंपन्यांचा समूह आहे. कृषी बाजारपेठेत शेतीचे नवतंत्र घेऊन कितीही कंपन्या आल्या तरी जेआयएसएलचे विक्रीतील स्थान अव्वल आहे. आजही जवळपास ६० ते ६५ टक्के शेतकरी जेआयएसएलचे उत्पादन वापरतात. मात्र उरलेल्या ३५ ते ४० टक्केत इतर कंपन्या आहेत.
प्रश्नावलीतून समोर आलेले निष्कर्ष
प्रश्नावली भरून घेण्यासाठी ४९० केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या निश्चित केलेली होती. त्यानुसार प्रश्नावली भरून घेण्यात आली. यात मुलाखतीसाठी निवडलेल्या ३० शेतकऱ्यांकडून सुद्धा प्रश्नावली भरून घेतली. उर्वरित १० जणांमध्ये बहुमाध्यमांचे ५ संपादक आणि २ कृषीतज्ज्ञ व ३ कृषी क्षेत्रीय संघटक होते.
वयोगट – केळी उत्पादन करणारा शेतकरी हा साधारणतः सर्वच प्रकारच्या वयोगटातला आहे. प्रश्नावली भरून घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये २० वर्षे वयापासून तर ३९ वर्षांपर्यंत वय असलेला युवा वर्गातील २२.६ टक्के शेतकरी (संख्या ११३) केळीची लागवड करतो. ४० वर्षे वयापासून ४९ वर्षे वयोगटातला शेतकरी प्रौढ असून, त्यातील ३९ टक्के शेतकरी (संख्या १९५) केळीचे उत्पादन घेतो. ५० वर्षांच्या वर वय असलेला २४.६ टक्के शेतकरी (संख्या १२३) आणि ६० वर्षांच्या वर वय असलेला ८ टक्के शेतकरी (संख्या ४) आजही मेहनतीने शेती करतो.
शिक्षण – दहावी उत्तीर्ण २१.८० टक्के (संख्या १०९), बारावी उत्तीर्ण १९.४० टक्के (संख्या ९७), पदवीधर ३५.८० टक्के (संख्या १७९), पदव्युत्तर शिक्षण झालेले १२.८ टक्के (संख्या ६४) आहेत. पदवीधरांमधील काही शेतकरी हे पदविका उत्तीर्ण आहेत. मात्र, त्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणजेच आजच्या शेतकऱ्यांमध्ये ९८ टक्के शेतकरी हा घटक शिक्षित आहे.
शेती धारण क्षमता – केळी उत्पादक शेतकरी तीन प्रकारे शेती करताना दिसतात. पहिला प्रकार हा स्वतःच्या मालकीची किंवा कुटुंबाच्या मालकीची शेती करणाऱ्यांचा आहे. दुसरा प्रकार हा इतरांची शेती भाडोत्री पद्धतीने करण्याचा आहे. तिसरा प्रकार बटाई, गवांद किंवा मिळून शेती करण्याचा आहे. काही शेतकऱ्याची स्वतःची शेतजमीन ही केवळ काही गुंठे (५ ते १० गुंठे म्हणजे ५ हजार ते १० हजार चौरस फूट) असूनही इतरांची काही एकर शेती ते करतात. प्रश्नावली भरलेल्या एकूण शेतकऱ्यांमधील दोन केळी उत्पादकांकडे स्वतःची एक गुंठेही शेतजमीन नाही. मात्र, भाडोत्री प्रकाराने ते ५० एकरपेक्षा जास्त शेती करीत आहेत. यात १ ते १० एकर शेती असलेले ४२ टक्के, ११ ते ४० एकर शेती असलेले ४६ टक्के आणि ५१ एकरच्यावर शेती असलेले १२ टक्के आहेत. ७५ एकरवर शेती असलेले ९ तर शंभर एकरवर शेती असलेले ५ शेतकरी आढळले. १०० एकरवर शेती करणारा शेतकरी हा सर्वच बाबतीत सधन असल्याचे लक्षात आले.
नवतंत्र वापर – जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कोणते नवतंत्र वापरतो, या प्रश्नाची उत्तरे समोर आली. सर्व शेतकऱ्यांनी (संख्या ४९०) नवतंत्र वापरतो हे मान्य केले. मात्र यात सर्वाधिक ठिबक सिंचन संच एक नळी आणि दोन नळी वापरणारे होते. ठिबक सिंचन तंत्र वापरणाऱ्यांची टक्केवारी १०० झाली. याशिवाय टिश्यू रोपे, ठिबक आणि फर्टिगेशन हे तंत्रसुद्धा १०० टक्के शेतकरी वापरत आहेत. मात्र, झाडाच्या खोडाजवळ खालच्या बाजूला प्लास्टिक पेपरचा वापर (मल्चिंग पेपर) करणारे केवळ १७.१४ टक्के शेतकरी (संख्या ८४) समोर आले. केळीला खते – पोषके देण्यासाठी फर्टिगेशन वापरणारे ६३.२७ टक्के शेतकरी (संख्या ३१०) आढळले. स्वयंचलित यंत्रणा वापरणारे केवळ ४ शेतकरी (००.८२ टक्के) आढळले. ऊतिसंवर्धित रोपे लागवड, सरीऐवजी गादी पद्धतीचा वापर, ठिबक सिंचन संचाचा वापर, द्रवरूप खते – पोषके देण्याचे तंत्र, घडाला कमी फण्या ठेवणे हे तंत्र शेतकरी स्वीकारू लागले. या नवतंत्रामुळे केळीच्या एका झाडाचे सरासरी उत्पादन २२ ते २५ किलो आणि अपवादाने ३० किलोपर्यंत वाढले. म्हणजेच केळी उत्पादनात दुप्पट वाढ झाली.
याचा अनुभव प्रश्नावली भरून घेताना आला. एकूण ५०० पैकी ४४० शेतकऱ्यांपैकी (मुलाखतीचे ३० शेतकरी वगळून) काही केळी उत्पादकांनी पूर्वीचे केळी उत्पादन प्रतिझाड सरासरी १२ ते १५ किलो (शेतकरी संख्या २१०) आणि काहींनी पूर्वीचे केळी उत्पादन अपवादाने १६ ते १७ किलो (शेतकरी संख्या १६०) असल्याचे सांगितले. मात्र आता जेआयएसएलचे नवतंत्रामुळे वापरामुळे केळीचे उत्पादन प्रतिझाड सरासरी २२ ते २५ किलो (शेतकरी संख्या १८२) असल्याचे आणि काही शेतकऱ्यांनी प्रती झाड केळी उत्पादन २५ किलोवर अगदी ३२ किलो पर्यंत (शेतकरी संख्या ६८) असल्याचे सांगितले. नवतंत्रामुळे केळी उत्पादनात जवळपास ३५ ते ४० टक्के वाढ झालेली दिसते.
जळगाव जिल्ह्यात जेआयएसएलच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांत केळी उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारचे नवतंत्र विकसित झाले, त्यामुळे केळीचे उत्पादन वाढले. शेतकऱ्यांच्या हातात येणारे उत्पन्न वाढले. हातात वाढीव पैसा आल्यानंतर शेतकऱ्यांचे कौटुंबिक व सामाजिक राहणीमान, जीवनशैली बदलली. याच अनुषंगाने प्रश्नावलीत शेतकऱ्यांच्या राहणीमानाशी संबंधित विविध १७ प्रश्न होते. त्यात घर दुरुस्ती, नवे घर बांधले, शेती वाढविली, शेतीसाठी यंत्रे (ट्रॅक्टरसह इतर यंत्रे) घेतली, मालमत्ता (शेत, घर, भूखंड) खरेदी केले, सोने खरेदी केले, दुचाकी वाहने घेतली, चारचाकी वाहने घेतली, घरात उपकरणे (एलईडी, संगणक, टॅब, लॅपटॉप, मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी आदी) घेतली, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, मुला-मुलींच्या विवाहावर खर्च केला, मुदत ठेवीत रक्कम ठेवली, स्वतःवर पैसा खर्च केला, पत्नीच्या हौसमौजेवर खर्च केला, देवदर्शन केले, पर्यटन केले, असे प्रश्न होते. त्याची उत्तरे शेतकऱ्यांनी दिली.

जेआयएसएलचे नवतंत्र वापरणाऱ्या २४० पैकी २१.४७ टक्के शेतकऱ्यांनी (संख्या ५२) शेतीत वाढ (म्हणजे नवे शेत खरेदी करणे) केल्याचे म्हटले. २७.५ टक्के शेतकऱ्यांनी (संख्या ६६) घराची दुरुस्ती केल्याचे सांगितले. ८२.९२ टक्के शेतकऱ्यांनी (संख्या १९९) नवे घर आरसीसी प्रकारात बांधले. यात काहींनी शेतात बंगला बांधला किंवा फार्म हाऊस बांधल्याचे सांगितले. ९८.३३ टक्के (संख्या २३६) शेतकऱ्यांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली. घरात लागणारी गरजेची उपकरणे घेणारे शेतकरी ९२.५० टक्के (संख्या २२२) आहेत. यासोबत मालमत्ता (भूखंड किंवा फ्लॅट – रो हाऊस – दुकान वगैरे) खरेदी करणारे शेतकरी ३५. ४८ टक्के (संख्या ८३) आहेत.
जेआयएसएल आणि इतर पाच कंपन्या मिळून एकूण ४९० पैकी २५.६५ टक्के शेतकऱ्यांनी (संख्या १९१) शेतीत वाढ केल्याचे म्हटले. २२.२४ टक्के शेतकऱ्यांनी (संख्या १०९) घराची दुरुस्ती केल्याचे सांगितले. २४.१ टक्के शेतकऱ्यांनी (संख्या २४१) नवे घर आरसीसी प्रकारात बांधले. यात काहींनी शेतात बंगला बांधला किंवा फार्म हाऊस बांधल्याचे सांगितले. ६४.४९ टक्के (संख्या ३१६) शेतकऱ्यांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली. घरात लागणारी गरजेची उपकरणे घेणारे शेतकरी ५३.४७ टक्के (संख्या २६२) आहेत. यासोबत मालमत्ता (भूखंड किंवा फ्लॅट – रो हाऊस – दुकान वगैरे) खरेदी करणारे शेतकरी ३३.२७ टक्के (संख्या १६३) आहेत.
जेआयएसएलचे नवतंत्र वापरून जादा केळी उत्पादन घेणारे शेतकरी इतर कंपन्यांच्या नवतंत्राचा वापर करणाऱ्यांपेक्षा जास्त देवदर्शन, देशात आणि विदेशात पर्यटन करतात, असे दिसते. जेआयएसएलचे नवतंत्र वापरणाऱ्या एकूण २९० पैकी ६२.७ टक्के शेतकरी (संख्या १८०) देवदर्शनाला जातात. यात शिर्डी, शेगाव, तुळजापूर, सप्तशृंगगड, अक्कलकोट व तिरुपती बालाजीला जाणारे शेतकरी जास्त आहेत. काही शेतकऱ्यांनी संपूर्ण भारत दर्शन केले आहे. हौस-मौज खातर इतर ठिकाणी पर्यटन करणारेही शेतकरी आहेत. हौशी पर्यटक ३०.६९ टक्के (संख्या ८९) आहेत. फारच कमी म्हणजे ४.१४ टक्के (संख्या १२) शेतकऱ्यांनी परदेश दौरा केला आहे. जेआयएसएल सोबत इतर पाच कंपन्यांची उत्पादने वापरणारे ४९० पैकी काही शेतकरीही देवदर्शन-पर्यटन आणि विदेश दौरा करतात. त्याची एकत्रित टक्केवारी व संख्या अशी: देवदर्शन करणारे ५९.३९ टक्के (संख्या २९१), पर्यटन करणारे २७.५३ टक्के (संख्या १७८), विदेशात जाणारे १०.२ टक्के (संख्या ५१). याचा एकत्रित आलेख दिला आहे. लक्षवेधी निष्कर्ष म्हणजे जवळपास ९९ टक्के शेतकरी त्यांच्या पाल्यांचे शिक्षण तालुका, जिल्हासह मुंबई, पुणे वा इतर महानगरांमध्ये करीत आहेत. मोजक्या शेतकऱ्यांचे पाल्य शिक्षणासाठी विदेशात गेले आहेत, त्यांची संख्या २७ (टक्के ५.५) आहे. पाल्यांना शालेय शिक्षणापासून तर पदवी, कौशल्याधारित उत्तम-चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न ७८.७८ टक्के (संख्या ३८६) शेतकऱ्यांनी केला आहे. याबरोबरच हातातील पैसा वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी घरातील विवाह कार्य आणि हौसमौजेवर सढळ खर्च केल्याचे मान्य केले, असे शेतकरी ६२.८६ टक्के (संख्या ३०८) आहेत.
केळी उत्पादकांचा नव-बहुमाध्यम वापर
केळी उत्पादक शेतकरी जवळपास ९९ टक्के साक्षर आहेत. त्यामुळे केळी लागवडीविषयी नवतंत्राची माहिती मिळविण्यासाठी हे शेतकरी वृत्तपत्रे, रेडिओ आणि टीव्ही या पारंपरिक माध्यमांचा कसा आणि किती प्रमाणात वापर करतात, याची माहिती घेण्यात आली. एकूण ४९० पैकी ७६.५३ टक्के (संख्या ३७५) केळी उत्पादक शेतकरी आजही वृत्तपत्र वाचतात. अर्थात, कोरोना महामारीनंतर वृत्तपत्र वाचकांची संख्या कमी झाली हे वास्तव प्रश्नावलीतील माहितीतून समोर येते. रेडिओ ऐकणारे सुद्धा २०.२० टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या १०४) आहेत. आकाशवाणी किंवा एफएम बॅण्डही शेतकरी फारसे ऐकत नाहीत. आकाशवाणीवरील कृषी कार्यक्रम ऐकणारे शेतकरी नगण्य आहेत. टीव्हीवरून प्रसारित होणारे कृषी विषयक कार्यक्रम पाहणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही अवघी २१.२२ टक्के (संख्या १०७) आहे.
केळी उत्पादक शेतकरी १०० टक्के स्मार्ट मोबाईल वापरतात. त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे अंक-अक्षर-शब्द-चित्र-छायाचित्र-आलेख-ध्वनी-चलचित्र अशा कोणत्याही प्रकारात उपलब्ध होणारा कृषी विषयक आशय शेतकरी मोबाईलवर पाहू शकतो. पारंपरिक माध्यमांचा फारच कमी वापर करणारा शेतकरी मोबाईलवर बहुमाध्यमे वा सोशल मीडियाशी संबंधित सर्व माध्यमे पाहून घेतो. केळी उत्पादकाला बहुमाध्यमांशी संबंधित विचारलेल्या १६ प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळाली आहेत. एकूण ४९० केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बहुमाध्यमांच्या वापराविषयी दिलेली सविस्तर आकडेवारी बहुमाध्यमांचा प्रचंड प्रभाव दर्शविते. जवळपास ९५ टक्के शेतकरी कृषी क्षेत्राशी संबंधित विविध ॲप मोबाईलवर वापरतात.
४९० पैकी १०० टक्के शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा आहे. अगदीच नगण्य शेतकरी इंटरनेट वापरत नाहीत. केळी उत्पादक शेतकरी समाज माध्यमांमधील विविध पर्याय हाताळताना त्यात सर्वाधिक मोबाईल ॲप्सचा वापर करतात. जवळपास ९७.३४ टक्के (संख्या ४७७) केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये केळी संदर्भातील माहिती घेण्यासाठी विविध ॲप वापरतात. व्हाट्सॲपचा वापर ८२.६५ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या ४०५) करतात. व्हॉट्सॲप ग्रुप हे गाव, तालुका, शहर, विक्रेते, तज्ज्ञ, अभ्यासक अशा प्रकारे रचना केलेले असतात. जवळपास ५२.४५ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या २५७) यू ट्यूबचा वापर करतात. काही केळी उत्पादक शेतकरी नवतंत्राची माहिती घेण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. त्यांची टक्केवारी ७४.२८ असून संख्या ३६४ आहे.
केळी उत्पादक कोणती माहिती मिळवितात?
केळी उत्पादक शेतकरी नवतंत्राची माहिती घेण्यासाठी बहुमाध्यमांचा पुरेपूर वापर करतात. बहुमाध्यमातील ॲप, वेबसाईट यावरून हवामानाचा अंदाज घेणारे ५४.९ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या २६९) आहेत. केळीच्या लागवड तंत्राची माहिती घेणारे ६८.३७ टक्के शेतकरी (संख्या ३३५) आहेत. ऊती संवर्धित रोपांविषयी माहिती घेणारे ७४.८ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या ३६३) आहेत. मशागत तंत्राची माहिती घेणारे ७४.२९ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या ३६४) आहेत. फळ काढणीविषयी माहिती घेणारे ५९.१४ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या २८९) आहेत. बाजारपेठेची माहिती घेणारे ४४.९ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या २२०) आहेत. सिंचन विषयक माहिती घेणारे ९६.६ टक्के केळी उत्पादक शेतकरी (संख्या ४५५) आहेत. अशा प्रकारे केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमातून केळी लागवडीपासून तर केळी विक्रीसाठी बाजारपेठेची माहिती घेताना दिसतात.
बहुमाध्यमांचे संपादक, पत्रकार, केळी नवतंत्राशी संबंधित संशोधक, अभ्यासक व क्षेत्रीय कृषितज्ज्ञ, नवतंत्र वापरणारे शेतकरी यांच्या प्रश्नावली भरून घेणे व मुलाखतीतून तीन मुख्य तथ्ये समोर आलेली आहेत. त्यातील पहिले म्हणजे छापील माध्यमे आणि इंटरनेटवर उपलब्ध इतर बहुमाध्यमे केळी लागवडीशी संबंधित नवतंत्राची माहिती सतत प्रसारित करतात. केळी उत्पादक शेतकरी त्या माहितीचा वापर शेतीतंत्र सुधारण्यासाठी करीत असतो. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी नवतंत्राचा वापर करून केळी लागवड व उत्पादनाचे उद्दिष्ट सतत साध्य करीत आहे.बहुमाध्यमांच्या वापरात शेतकरी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करत आहेत.
समारोप
नवतंत्रामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे उत्पादन वाढले आहे. वाढीव उत्पादनातून केळी विक्रीचे उत्पन्न वाढलेले आहे. त्यामुळे केळी लागवड करणारा शेतकरी स्वतःच्या जीवनशैलीत गरजेनुसार बदल करत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे राहणीमान हे आरामदायी, गुणवत्तापूर्ण सुधारत आहे. केळी उत्पादक शेतकरी शेती वाढवण्यापासून घर – बंगला – भूखंड – फ्लॅट – सोने अशा मालमत्तेत गुंतवणूक वाढवत आहे. त्याच्या निवासात सर्व प्रकारची आधुनिक घरगुती उपकरणे, साहित्य वापरात आहे. केळी उत्पादक शेतकरी त्याचे छंद, आवड पूर्ण करत आहे. त्याची नवी पिढीही त्यांचे शिक्षण भारतातील महानगरात किंवा विदेशात घेत आहे. बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञानविषयक माहितीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर सकारात्मक आणि अत्यंत उपयुक्त असा परिणाम झालेला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांची जीवनशैली बदललेली आहे, हे आता सर्वजण मान्य करतात. केळी उत्पादकांचा व्यक्तिगत व कौटुंबिक राहणीमानाचा दर्जा नक्कीच उंचावलेला आहे. त्याला इतर क्षेत्रात मान – सन्मान – प्रतिष्ठा मिळत आहे. शेतीच्या नवतंत्र प्रचार – प्रसारात बहुमाध्यमांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असून शेतकरी त्याचा गरजेनुसार वापर करत स्वतःचे राहणीमान – जीवनमान – जीवनशैली सुधारत आहे.
डॉ. दिलीप तिवारी (पत्रकार, जळगाव)
9552585088















