पूर्वजा कुमावत
रासायनिक शेती व पारंपरिक पिके घेणाऱ्या जालना जिल्ह्यातील जगदीश दामोदर शेंडगे यांनी अपारंपरिक अशा खजुराच्या रोपांची तीन एकर क्षेत्रात 2020 मध्ये लागवड केली. सुरुवातीपासून सेंद्रिय पद्धतीने जोपासना केलेल्या या खजुराच्या शेतीतून त्यांना यावर्षी सर्व खर्च वजा जाता एकरी बारा लाखांचा निव्वळ नफा मिळाला.

जालना या अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील तानवाडी (ता. घनसांवगी) या गावातील जगदीश दामोदर शेंडगे यांनी तीन एकर शेतात खजूर लागवड केली. खजूर हे विदेशी फळ असून त्यांनी महाराष्ट्रात त्याची लागवड नव्हे तर यशस्वी उत्पादनही घेऊन दाखवले. जगदीश शेंडगे हे 36 वर्षांचे असून त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. तानवाडी येथील जिल्हा परिषदच्या शाळेतच त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्याकडे एकूण 25 एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहेत. त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे.
जगदीश शेंडगे यांच्या घराजवळ साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्यात काही खजुराची झाडे लावलेली होती. सुरुवातीला जगदीश यांना ती झाडे शोभेची वाटली. मात्र, त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांना समजले की हे विदेशी खजुराची झाडे आहेत. त्यांनी त्या झाडाची फळेही चाखली. त्यानंतर सतत त्यांच्या मनात खजुराच्या झाडांच्या लागवडीच्याच विचार सुरू होता. जगदीश यांनी खजूर पिकाची, रोपे मिळण्याबाबत माहिती घेतली. स्वतः गुजरात येथे जाऊन 180 खजूर रोपांची खरेदी केली. 180 रोपांचा खर्च 7 लाख 20 हजार आला. यासाठी त्यांनी समर्थ बँकमधून कर्ज काढले. त्यातून त्यांनी रोपे खरेदी केली. काहीजणांनी या शेतीला विरुद्धही केला. मात्र जगदीश शेंडगे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आणि जगदीश यांनी आपल्या शेतात खजुराची रोपे लावलीत.

लागवड नर – मादी पद्धत
जगदीश सांगतात की या पिकातून मला चांगला नफा मिळाला. या पिकासाठी चांगली पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. खजूर शेतीसाठी सुरुवातीला खर्च जास्त असतो व त्यानंतर या पिकास खर्च कमी येतो. तीन एकर खजुराची बाग ते रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने करत आहेत. जगदीश यांचे म्हणणे आहे की एका झाडाला दीड ते दोन क्विंटल माल निघतो. खजूर पिकामध्ये पंधरा मादी रोपांमागे एका नर रोपाची लागवड करावी लागते. याच प्रमाणात नर-मादीची लागवड होते.
असे करावे परागीभवन
या पिकाला स्वतः हाताने परागीकरण करावे लागते. नर झाडाला फुले येतात. त्या फुलातून परागकण एका बॉटलमध्ये जमा करावी. त्यानंतर बॉटलच्या झाकणला दोन होल करून त्यात बारीक नळी टाकावी. एका होलमधून बॉटलमध्ये हवा फुकायची व त्यानंतर दुसऱ्या होलच्या नळीतून जमा केलेले परागकण मादी झाडावर टाकायचे. परागीकरण करण्यासाठी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा कालावधी उत्तम असतो, असे जगदीश शेंडगे यांनी अॅग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले.
स्वतः विक्री-उत्पन्नात वाढ
जगदीश हे खजूर फळाची विक्री स्वतः करतात. त्यांचे म्हणणे आहे की व्यापाऱ्याला दिले तर तो 100 किंवा 80 रुपये किलोने मागतो. यादराने एका झाडाचा माल फक्त 20 ते 25 हजार रुपये प्रमाणे व्यापारी घेऊन जातो. याचा व्यापारी दृष्टिकोनातून थोडा अभ्यास केल्यानंतर यावर्षी आम्ही स्वतःच खजूर विक्रीचा निर्णय घेतला. शेता जवळील मुख्य रस्त्यावर एक शेड वजा स्टॉल उभा केला. रोज ताजी व रसरशीत फळे बॉक्स पॅक करून 200 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री सुरू केली. यामुळे एका झाडापासून 30 ते 40 हजार रुपये मिळू लागले. थोडक्यात स्वतः विक्री केल्यामुळे सरासरी प्रति झाड 10 हजार रुपयांचे उत्पन्न वाढले.
एकरी अर्थशास्त्र
जगदीश म्हणतात की सुरुवातीला सर्व मिळून खर्च एकरी 9 लाख आला. त्यानंतर शेणखत, पाणी, क्वचित फवारणी, काढणी, पॅकिंग इतकाच काय तो खर्च लागतो. आता एकरी 60 ते 70 हजार रुपयेच फक्त खर्च येतो. आणि निव्वळ नफा 12 ते 13 लाख मिळतो.
संपर्क :
जगदीश शेंडगे – 8381069770
दामोदर शेंडगे – 9075686777













