दिल्लीतील तरुणाची ही अत्यंत प्रेरणादायी यशोगाथा आहे. अडथळ्यांचा बाऊ करत, नशीबाला दोष देत रडणाऱ्यांनी ती नक्की समजून घ्यावी. मार्केटचा अभ्यास केल्यास संधी आणि रस्ता सापडतो. दिल्लीतील 27 वर्षाच्या तरुणाने आईसोबत सुरू केलेला सेमी-फ्री-रेंज चिकन खरेतर गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप आज तब्बल 45 कोटींचा व्यवसाय बनला आहे. ही भरारी आहे उद्योजक दिग्विजय सिंह या धडपड्या तरुणाची. दिग्विजयने कॉलेज संपल्यावर, EY मधील इंटर्नशिपनंतर छोटा उद्योग सुरू करण्याचे ठरवले. त्याने आईलाच सोबत घेतले. स्टार्ट-अप स्थापन केले. त्यातून उभा राहिला एके फूड अँड बेव्हरेजेस हा दिल्लीकरांची मर्जी जिंकणारा ब्रँड!
2018 मध्ये फायनान्स पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच, दिग्विजयने “डिजीज फ्रेश” नावाचे एक स्टार्टअप सुरू केले. त्यातून ग्राहकांना सेंद्रिय किराणा माल विक्री आणि घरपोच पुरवठा केला जायचा. त्यातून दिग्विजयने देशभरातील अनेक शेतकऱ्यांशी संबंध जोडले, त्यांना कंपनीच्या नेटवर्कमध्ये जोडले. देशभरातील सेंद्रिय उत्पादने एकाच ठिकाणी आणल्याने चोखंदळ ग्राहकांजवळ पर्याय उभे राहिल्याने विक्री वाढली. त्यानंतर आर्थिक संपन्न पार्श्वभूमी असलेल्या दिग्विजयने फूड बिझनेसमध्ये उडी घेण्याचे ठरविले. लोकांना त्यांच्या आहाराच्या निवडींबद्दल अधिक जागरूक होण्यास मदत करणारे प्रभावी काहीतरी करावे, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती.
एके फूड अँड बेव्हरेजेस
बेंगळुरूच्या क्राइस्ट युनिव्हर्सिटीमधून पदवी घेत असताना, तरुण दिग्विजय लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत होता. त्याला जाणवले की, जर आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आहार निश्चित केला नाही, तर तो नंतरच्या आयुष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण करेल. निरोगी खाण्याच्या सवयींचा लाईफस्टाईल रूटीनमध्ये समावेश केल्यामुळे, दिग्विजयचे वजन 100 किलोंहून 75 किलोपर्यंत कमी झाले. त्यामुळे इतरांनाही निरोगी खाण्याच्या सवयी लावण्यास तो उत्सुक बनला. दिग्विजयच्या आई, 55 वर्षीय अनुराधा सिंग यांना फूड बिझनेसचा दीर्घ अनुभव आहे. त्यांना विदेशी सेंद्रिय कुक्कुटपालनमध्ये विशेष कौशल्य आहे. त्यामुळेच 2022 मध्ये, आई-मुलाच्या या जोडीने एकत्र येऊन एके फूड अँड बेव्हरेजेस नावाचा एक अनोखा सेमी-फ्री-रेंज चिकन व्यवसाय सुरू केला.
चिकन मांसाचे कस्टमायझेशन एके फूड अँड बेव्हरेजेस, ग्राहकांच्या विनंतीनुसार विशिष्ट वजनांमध्ये, विशिष्ट आकाराचे मांस पुरवून, कस्टमाइज्ड मांस पर्यायांमध्ये विशेषज्ञ आहे. त्यांच्याकडे आघाडीची पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. AK F&B दिल्ली आणि परिसरातील अनेक लहान रेस्टॉरंट्स आणि कॅफेसोबत देखील काम करते. “मोठ्या हॉटेल साखळ्यांसाठी, आम्ही निविदांद्वारे अर्ज करतो, लहान साखळ्यांसाठी आम्ही मालकांशी थेट संपर्क साधतो,” असे स्टार्टअप संस्थापक दिग्विजय सांगतात. आता, 50+ कर्मचाऱ्यांच्या टीमसह, AK F&B ने मटण, कोकरू आणि पीकिंग डक, जपानी लाव, गिनी फाउल, अमेरिकन टर्की इत्यादी विदेशी मांसाचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
चिकन स्टार्टअपसाठी गुंतवणूक अन् सुरुवात
अनुराधा सिंग आणि मुलगा दिग्विजय यांनी सुरुवातीला एके फूड अँड बेव्हरेजेस सुरू करण्यासाठी फक्त आठ लाख रुपये गुंतवले. एक शाश्वत, निरोगी मांस व्यवसाय उभारण्याचे त्यांचे ध्येय होते. त्याच वेळी ते प्रत्यक्षात फायदेशीर व्यवसाय बनवण्याचे त्यांनी ठरवले होते. महाराष्ट्रातील सगुणा आणि बारामती चिकनचा त्यांनी अभ्यास केला. अशी आदर्श, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कार्यपद्धती उत्तरेतील पोल्ट्री आणि हॉटेल पुरवठा व्यवसायात नव्हती. हीच संधी होती. ती पोकळी त्यांनी भरून काढली.
अनुराधा सिंह सांगतात की, “आमचे ऑपरेशनल मॉडेल इतर कोणत्याही गोठवलेल्या मांस व्यवसायापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यापैकी बहुतेक जण आमच्यापेक्षा वेगळे, B2C चालवत आहेत. म्हणून, आम्ही नेटवर्किंगवर खूप अवलंबून होतो.” या आई आणि मुलाने सुरुवातीला त्यांच्या घराशेजारील एका छोट्या खोलीपासून सुरुवात केली, जी प्रक्रिया युनिट म्हणून वापरली जात होती. दिग्विजय सांगतात, ” आम्ही तिथे चांगल्या कोंबड्या गोळा करायचो आणि दुसऱ्या कुठून तरी खाटीकाकडून फक्त कापून आणायचो.” 2024 मध्ये, अनुराधा आणि दिग्विजय यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि सुमारे 50-55 लाख रुपये गुंतवले. ते सांगतात, “आम्ही आतापर्यंत कोणताही निधी उभारलेला नाही आणि सर्व पैसे वैयक्तिकरित्या गुंतवले. पण, आम्ही आता लवकरच निधी उभारणार आहोत.”
संपर्क :-
एके फूड अँड बेव्हरेजेस C-41, तळघर, नांगल देवत, वसंत कुंज, नवी दिल्ली – 110070