अमेरिकी कृषी विभाग म्हणजेच यूएसडीएने यंदा मक्याचे विक्रमी पीक येण्याचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानंतर अमेरिकी शेतकऱ्यांनी नव्या जागतिक बाजारपेठा शोधून निर्यातीसाठी सरकारवर दबाव वाढवला आहे. देशांतर्गत मक्याच्या कमी किंमतीमुळे अमेरिकी शेतकरी आधीच संकटात असताना आता ही सर्वकालीन विक्रमी मका उत्पादनाची स्थिती अमेरिकन सरकारची डोकेदुखी वाढविणारी आहे. आता त्यादृष्टीने भारत, व्हिएतनाम आणि केनियातील बाजारपेठांमध्ये अमेरिकी सरकार अतिरिक्त मका डम्पिंग करण्याची शक्यता आहे.
अमेरिकी कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार, यावर्षी विक्रमी 16.7 अब्ज बुशेल मक्याचे पीक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर नॅशनल कॉर्न ग्रोअर्स असोसिएशन (एनसीजीए) ने सरकार आणि प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलण्याची मागणी तीव्र केली आहे. अमेरिकेत आधीच मक्याच्या किमती सध्या नीचांकी पातळीवर आहेत. या स्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान विक्रमी उत्पादनाने आणखी धोक्यात येणार आहे.
एनसीजीएचे अध्यक्ष केनेथ हार्टमन ज्युनियर यांनी सांगितले की, “मका उत्पादक आधीच अत्यंत कमी किमतीत त्यांच्या मक्याची विक्री करत आहेत. त्यात बाजार-आधारित मागणी-पुरवठा संतुलन उपायांशिवाय मोठ्या प्रमाणावर अपेक्षित मक्याच्या उत्पादनामुळे मागणीपेक्षा कितीतरी अधिक पुरवठा बाजारात होणार आहे. त्यामुळे आधीच खालावलेल्या मक्याच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता दिसत आहे. सरकारने त्वरित पावले उचलून अतिरिक्त साठा निर्यात करणे गरजेचे आहे. नाहीतर, अमेरिकी मका उत्पादक शेतकरी कंगाल होईल.”
मका उत्पादक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितले की, “अतिरिक्त मका पुरवठ्यासाठी आम्हाला इतर जागतिक बाजारपेठांची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही सरकारला प्रलंबित E15 कायदा मंजूर करण्यासाठी आवाहन करत आहोत. याशिवाय, इंधनात इथेनॉलच्या उच्च मिश्रणाची मंजुरी देणे आवश्यक आहे. ट्रम्प प्रशासनाने मक्यासाठी नवीन परदेशी बाजारपेठा मिळवून दिल्या तरच अमेरिकी शेतकरी जगेल. यासाठी त्वरेने पावले उचलावी लागतील.”
यूएसडीए अहवालानुसार, 2025 साठी सरासरी 188.8 बुशेल प्रति एकर मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे, म्हणजेच एकूण 16.7 अब्ज बुशेल पीक येईल. मक्यासाठी चार बुशेल म्हणजे साधारणतः एक टन होते. जर यूएसडीए अंदाज अचूक ठरले, तर या वर्षीचे मका पीक अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वात विक्रमी असेल. यापूर्वी 2023 मध्ये 15.3 अब्ज बुशेल पीक आले होते. त्यात यंदा 9.1% वाढ होण्याची शक्यता दिसतेय.
मका उत्पादक संघटनेने ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. त्यांची मागणी आहे की, तात्काळ एक कायदा मंजूर केला जावा, जो वर्षभर ग्राहकांना 15% इथेनॉल मिश्रण किंवा E15 वापरण्याची परवानगी देईल. हा उपाय ग्राहकांना कोणत्याही खर्चाशिवाय मिळतो, त्यासाठी सरकारला कोणत्याही अतिरिक्त पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता नाही. NCGA च्या अंदाजानुसार, त्यामुळे देशांतर्गत अतिरिक्त 457 दशलक्ष बुशेल मक्याची मागणी निर्माण होईल. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जाईल.
इतर देशांसोबत अतिरिक्त करार जलदगतीने करण्यासाठी आणि आधीच जाहीर केलेल्या करारांना अंतिम रूप देण्यासाठी अमेरिकी मका उत्पादक शेतकरी संघटनेने सध्या ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढवला आहे. उदाहरणार्थ, भारत, व्हिएतनाम आणि केनिया हे सर्व अमेरिकन मका उत्पादकांसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बाजारपेठ आहेत.
एनसीजीएचे अध्यक्ष केनेथ हार्टमन ज्युनियर यांनी सांगितले की, “माझे कुटुंब 1980 च्या शेती संकटातून कसेबसे वाचले होते. अनेक अमेरिकी शेतकरी कुटुंब त्यावेळी उद्ध्वस्त झाले. आज नेमकी तीच अतिरिक्त उत्पादन आणि खालावलेल्या शेतमाल भावाची स्थिती पुन्हा आली आहे. आम्ही 1980 चे संकट अनुभवले आहे. आता 45 वर्षानंतर माझ्या मुलीला शेती संकटाची झालं पोहोचू नये, असे मला वाटते. परिस्थिती भयानक आहे आणि नवीन जागतिक बाजारपेठेत निर्यात हाच एकमेव मार्ग आहे, ज्याद्वारे अमेरिकी शेतकरी यातून बाहेर पडू शकतो.”