मुंबई – भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आज, 9 ऑक्टोबर रोजी राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. “आयएमडी”ने आज काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील हवामानाची स्थिती आज कशी राहील, ते जाणून घेऊया.

(सकाळी दहा वाजताचे छायाचित्र)
काल सायंकाळी जोरदार पावसाने पुण्याला तडाखा दिला होता. आता आयएमडीने 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान देशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. ईशान्य आणि उत्तर भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असून दक्षिणेतील राज्यांसाठीही येथे 5 दिवस मुसळधार अलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पावसामुळे हवामान आल्हाददायक झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात थंडीने दस्तक दिली आहे.
महाराष्ट्रात आज कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात ढगाळ आकाशाने तापमान कमी
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगाळ राहून तापमानात किंचित घट जाणवण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, मात्र दुपारनंतर वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात पावसाची शक्यता नाही
विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मात्र हवामान कोरडे राहणार आहे. या भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही. नागपूरमधील तापमान 23 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
“या” जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि घाटमाथा भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
सातारा आणि सातारा घाटमाथा परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चारही ठिकाणांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.