मुंबई –पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. कोणतेही निकष न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय चर्चा करावी, त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
पंजाब जे करू शकतो, ते फडणवीस यांना का जमत नाही?
पंजाबमधील आप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजारांची मदत केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्वरित तेवढी मदत करावी. निवडणुका नाहीत म्हणून महाराष्ट्राशी दुजाभाव करू नका, असे आवाहन त्यांनी केले. ही वेळ उणीदूनी काढून राजकारण करण्याची नसून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे, असेही ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी न्यायाची मागणी करणे राजकारण कसे?
शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी करणे जर राजकारण असेल तर हो ते राजकारण आम्ही करतो. आम्ही पंचाग काढून नाही बसलो. तुम्हाला शेतकऱ्यांना मदतीसाठी मुहूर्त का पाहावा लागतोय? पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रस्ताव हवा आहे. जे नुकसान समोर दिसत आहे, त्यासाठी कशाला कुठला प्रस्ताव हवा? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देऊन मुक्त करा आणि तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्यासाठी पंतप्रधान केअर फंडातून पैसे द्या, अशी मागणी त्यांनी केली.
अस्मानी संकटात सरकारची मदत तुटपूंजी
सरकारने आता जी मदत देऊ केली आहे. ती अगदीच तुटपूंजी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडायला 2-3 वर्षे लागतील. विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तकेही वाहून गेली आहेत. मराठवाड्यात आकाश फाटले आहे. अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे. पीक अन् शेतकरीही उद्धवस्त झाले आहेत. पीके सडली आहेत, शेतात पाणीच पाणी आहे. शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. राजकारण बाजूला सारून शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.