मुंबई : मध्य प्रदेशलगत सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळेच राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामानाची स्थिती सध्या आहे. मान्सून टर्फ (आस) बिकानेर ते प्रयागराज पसरला असून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे केंद्र आहे. उद्या, 26 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे नवीन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. कोकणासह राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धडगाव-अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसाने धुमशान माजवले आहे. मोलगी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या भागात दरड कोसळून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये 25 ऑगस्ट रोजी हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनचा जोर कायम राहणार असून, काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. एकूणच, 25 ऑगस्ट रोजी राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर असेल, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 28 आणि 31 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणात येत्या आठवडाभर पावसाचा अंदाज
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आज ताशी सुमारे 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणात 25 ते 31 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी क्षेत्रात 28 ऑगस्ट रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे काही ठिकाणी नद्या-नाले तुडुंब भरू शकतात. त्यामुळे पूरस्थितीचा धोका संभवतो. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ढगाळ वातावरण राहील, तसेच पिकांना अतिरिक्त पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.