उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस.. होय, शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून शेतीत उत्पादकता वाढवलेली असते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना गौरवून प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या इच्छाशक्तीला आणि मनोबलाला चालना मिळते. याच उद्देशाने दरवर्षी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवली जाते. सन 2025-26 या वर्षासाठी राज्यात अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांवर आधारित पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल ही एकूण 11 पीके व रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस ही 5 पीके निवडण्यात आली आहेत.
या स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर घेतल्या जाणार असून सर्वसामान्य व आदिवासी गटासाठी वेगवेगळ्या बक्षिसांची रचना करण्यात आली आहे. तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक ₹5,000, जिल्हा स्तरावर ₹10,000 आणि राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक म्हणून ₹50,000 दिले जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठीही रोख बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी निश्चित वेळेत आपले अर्ज http://www.krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर करावेत.
खरीप हंगामासाठी मूग व उडीद पिकांसाठी अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2025 असून उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत आहे. रब्बी हंगामातील स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही सुवर्णसंधी साधून मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
पिकस्पर्धा विजेते – बक्षिसाचे स्वरूप (सर्वसामान्य व आदिवासी गटासाठी समान)
तालुका पातळी
▸ प्रथम क्रमांक: ₹5,000
▸ द्वितीय क्रमांक: ₹3,000
▸ तृतीय क्रमांक: ₹2,000
जिल्हा पातळी
▸ प्रथम क्रमांक: ₹10,000
▸ द्वितीय क्रमांक: ₹7,000
▸ तृतीय क्रमांक: ₹5,000
राज्य पातळी
▸ प्रथम क्रमांक: ₹50,000
▸ द्वितीय क्रमांक: ₹40,000
▸ तृतीय क्रमांक: ₹30,000