मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरु असून पुढील काही दिवस वारा, वावधनासहित जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. आजही राज्यातील काही भागात यलो आणि ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रसह कोकण, मराठवाड्यात 19 ते 25 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. 22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

जळगावसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज या भागात ऑरेंज अलर्ट
पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या आठवड्यात पावसाचा जोर का वाढतोय ?
अरबी समुद्र, बंगाल उपसागर व प्रशांत महासागर या तिन्ही समुद्रात एकाच वेळी 17 ते 20 डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान कमी दाबाचे क्षेत्रातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. तसेच याचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे या आठवड्यात वाऱ्याच्या गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
