दीपक खेडेकर, मुंबई.
शेती करून आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हायचे असेल तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये बदलत्या वातावरण / हवामानाच्या बेभरवशाच्या काळात पावसावर अवलंबून असणाऱ्या फक्त पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता त्याचबरोबर एखाद्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक असते. पण, त्याचबरोबर एखाद्या पूरक व्यवसायाला एकापेक्षा अनेक पूरक व्यवसायाची जोड दिली तर सोन्याहून पिवळे असे म्हणणे वावगे ठरू शकणार नाही.
या विधानाला अनुसरूनच आपण या यशोगाथेमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर मेंगाळवाडी येथील शांताराम वारे या प्रयोगशील शेतकरी यांच्याबद्दल.. ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित व स्वकर्तुत्वाने खरेदी केलेल्या शेत जमिनीवर कांदा, टोमॅटो, सोयाबीन इत्यादी पिके घेतली आहे. एवढेच नाहीतर त्याचबरोबर शेतीला अनेक व्यवसायांची जोड दिली आहे. आपल्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे स्त्रोत, अभ्यास, अनुभव, कष्ट करण्याची तयारी व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शेतीपूरक व्यवसाय करून हळूहळू त्यांचा विस्तार करून शेतीमधून आर्थिक प्रगतीत ते यशस्वी झाले आहेत
शेतीला पूरक व्यवसायाची जोड
वडीलोपार्जित पारंपारिक शेती बरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून शांताराम वारे यांनी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, गावरान कोंबडीपालन व्यवसाय करण्यास सुरुवात केली. पण याही पलीकडे जाऊन एखादा कोणता तरी नवीन जोडधंदा आपण सुरू शकतो का ?, असा विचार शांताराम वारे यांच्या डोक्यात आला. बाजारपेठेमध्ये मागणी असणारा पण बाजारपेठेत विक्रीसाठी सहसा न मिळणारा असा कमी गुंतवणूक, कमी देखभालीचे असणारे गोड्या पाण्यातील खेकडापालन करण्याचे वारे यांनी ठरवले.
पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवली खेकडा टॅंक
सुरुवातीला शांताराम वारे यांनी ५० ते ६० हजार रुपयांची गुंतवणूक करून आधीच्याच असणाऱ्या खड्ड्यामध्ये खडकापर्यंत काँक्रीट करून चारी बाजूने टाईल्स लावून खेकड्यासाठी टॅंक बांधली. पण ती पूर्णपणे काँक्रीटची असल्यामुळे तिथे खेकड्यांना नैसर्गिकपणा मिळत नव्हता. त्यामध्ये खेकड्यांची मर होत होऊन त्यांची वाढ सुद्धा होत नव्हती. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होत होता. त्यामुळे वारे यांनी बाजूच्या ठिकाणीच दुसरी खेकडापालनासाठी टॅंक बनवली ती पूर्णपणे नैसर्गिकरित्या असून फक्त चारी बाजूने प्लास्टर करून टाईल्स लावून घेतल्या आहेत. टाईल्स लावायचे मुख्य कारण हेच आहे की, जर खेकडे टाकीच्या बाहेर जायचा जाण्याचा प्रयत्न करू लागले तर ते टाइल्स वरून घसरून पुन्हा टाकीतच राहतील. काही काळाने खेकडा पालनाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने वारे यांनी तिसरी टाकीही नैसर्गिक पद्धतीने बनवली आहे.
जागेवरच खेकड्यांची विक्री
खेकड्यांची विक्री करायला कोणत्याही मार्केटला किंवा इतर ठिकाणी जायची गरज लागत नाही. सुरुवातीला फेसबुक युट्युब यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीशी जाहिरात करावी लागली. त्यानंतर मात्र स्थानिक लोक, जुन्नर, ओतूर आणि आजूबाजूचा परिसर पर्यटनासाठी अनुकूल असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातूनही खेकडा खरेदी केली जाते. आम्हाला खेकडे बनवता येत नाहीत तर आम्ही ते कसे घेणार! अशा काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, काही ग्राहकांच्या मागणीनुसार वारे यांनी घराच्या बाजूलाच छोटेसे हॉटेल उभारले आहे. ज्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून खेकड्यांपासून वेगवेगळे पदार्थ (खेकडा रस्सा, खेकडा फ्राय, सूप इत्यादी) बनवून ग्राहकांना विक्री केली जाते.
खेकडापालन करत तेल निर्मितीही केली सुरु
महाराष्ट्रातील पहिले गोड्या पाण्यातील खेकडापालन व्यवसाय उभारणारे प्रयोगशील शेतकरी अशी विशेष ओळख निर्माण करून गेल्या सात वर्षापासून यशस्वी खेकडापालन करत आता शांताराम वारे यांनी तेल निर्मिती (क्रॅपऑइल) सुरू केली आहे. त्याची १०० मिलीसाठी रुपये ५०० एवढ्या दराने विक्री केली जाते. हे तेल मसाज, त्वचा विकार, हाडांचे विकार, सांधेदुखी, भाजलेल्या जखमा भरण्यासाठी इत्यादी विविध आजारांमध्ये वापरण्यात येते. पण हे तेल वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच वापरात आणावे असे वारे सांगतात. सध्या वारे आपल्या शेतीमध्ये कांदा, टोमॅटो, आंबा, सोयाबीन, मिरची इत्यादी पिके घेत असून शेतीला जोडधंदा म्हणून गावरान कुक्कुटपालन, खेकडापालन व मधमाशीपालन करत आहेत. खेकडापालन हा पूरक व्यवसाय सुरू करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याचे शांताराम वारे सांगतात.
वर्षाला 6 लाख रुपये आर्थिक उत्पन्न
शेती व शेतीपूरक व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती करत वारे यांनी ९४ गुंठे जमीन स्वकर्तृत्वावर खरेदी करून त्यावर आता सोयाबीन व ज्वारीचे शेती उत्पन्न घेणे सुरू आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करून आपली, आपल्या कुटुंबाची, सोबत समाज बंधू-भगिनींची प्रगती साधत असताना वारे यांनी आपली आर्थिक प्रगती सुद्धा साधली आहे. अंदाजे रुपये 6 लाख प्रति वर्ष एवढे वारे यांचे व्यक्तिगत आर्थिक उत्पन्न आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. या मिळालेल्या यशामध्ये कुटुंबाची साथ वेळोवेळी मिळतेच. पण बंधू सतीश हे पूर्ण वेळ या खेकडा पालनाकडे लक्ष देतात असे वारे आवर्जून सांगतात.
संपर्क :-
शांताराम वारे
मु. ओतूर (मेंगाळवाडी)
ता. जुन्नर, जि. पुणे
मो. नं. :- 9890078993