दीपक देशपांडे, पुणे.
आज आपण अनेक ठिकाणी ड्रॅगन फ्रुटची शेती बघितली आहे. परंतु, शेडनेटमध्ये ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचा यशस्वी प्रयोग हा धाडसाचा म्हणावा लागेल. केल्याने होत आहे रे..आधी केलीची पाहिजे… या वाक्याला साजेल असेच कार्य म्हणजेच शेडनेटमध्ये ड्रॅगन फ्रुट शेतीचा हा यशस्वी प्रयोग महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा असलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका तरुण वकिलाने केला आहे. या तरुण तडफदार शेतकरी वकिलाची यशोगाथा आपण पाहणार आहोत.
अशाच निपाणी जवळकामध्ये अनुरथ लोणकर हे 55 वर्षीय गृहस्थ सहकुटुंब राहतात. अनुरथ लोणकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी विवाहित असा परिवार आहे. अनुरथ लोणकर यांचा मुलगा मुकुंद लोणकर हे 32 वर्षाचे असून त्यांनी शेतीविषयक पदवीधर शिक्षण घेतलेले असून एलएलबीची डिग्री सुद्धा प्राप्त केली आहे. तसेच ते बीडच्या न्यायालयामध्ये पार्ट टाइम प्रॅक्टिस करतात पण, लहानपानापासूनच आई- वडिलांसोबतच त्यांचा कल शेतीत असल्यामुळे त्यांना मूळ शेतीची आवड आहे. अशातच मुकुंद लोणकर यांचे लग्न मनीषा नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलीशी झाले. त्यांनी लग्नातच मी शेतीच करणार असल्याची अट घातली होती. ही अट या सुशिक्षित महिलेने आनंदाने स्वीकारली.
ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा घेतला निर्णय
ॲड. मुकुंद पाटील यांनी 2017- 18 पासून शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यांनी आपल्या शेतात राज्यातील प्रसिद्ध नवनाथ कसपटे (बार्शी) यांच्याकडून एनएमके गोल्डन जातीची सीताफळाची रोपे आणली. आणि चार एकर क्षेत्रात या सीताफळांच्या रोपांची त्यांनी लागवड केली. यातून दोन वर्षातच त्यांना दीड लाख रुपयांचा नफा झाला मात्र, सीताफळ विक्रीसाठी कोणतेही बाजारपेठ उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना त्याची जागेवरच व्यापाऱ्यास विक्री करावी लागत होती. शेती व्यवसाय करत असताना अनेक ठिकाणी त्यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती पहिली. त्यातूनच त्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्याच वर्षी 1 लाख रुपयांचा नफा
पहिल्याच वर्षी म्हणजेच 2022- 23 मध्ये ड्रॅगन फ्रुटचा तीन टन माल निघाला. याची विक्री त्यांनी बीड व छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मार्केटमध्ये 80 ते 180 रुपये किलो या दराने केली. पहिल्या वर्षी निघालेल्या उत्पादनातून खर्च वजा जाता मुकुंद यांना निव्वळ नफा एक लाख रुपये झाला. त्यामुळे त्यांचा आणखी उत्साह वाढला. ॲड. मुकुंद यांनी वकील व्यवसाय पार्ट टाइम सुरु ठेवला आणि शेतीमध्ये स्वतःला झोकून दिले. तसेच मुकुंद यांच्या आई आणि पत्नी सौ. मनीषा यांनी खुरपणीसह झाडांची बांधणी केली. नोव्हेंबर 23 च्या पहिल्या आठवड्यात फळ संपले. थंडीमध्ये फळ लागत नाही झाडाची वाढ थांबलेली असते तर नवीन फुटवे फांद्या साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान फुटतात. याची छाटणी करावी लागते. त्याबरोबरच मुकुंद यांनी शासकीय योजनेतून पॉवर टिलर सुद्धा खरेदी केला. महाबीटीच्या माध्यमातून 50 टक्के सबसिडीवर हा पॉवर टिलर त्यांना मिळाला. या पॉवर टिलरवर अंतरमशागत, फवारणी आणि खत देणे हे सगळे प्रयोग मुकुंद त्यांचे वडील करतात. यानंतर जानेवारी अखेरला फुले लागली आणि त्याचा तयार झालेला माल जुलै अखेरला मार्केटिंगसाठी उपलब्ध झालेला आहे.
10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार
मुकुंद यांनी सांगितले की, सुमारे 12 टन माल यावर्षी पहिल्या तोडमध्ये निघालेला आहे आणि याला किमान 100 ते 110 रुपये किलो यानुसार दर मिळेल तर दुसरा बहार म्हणजे थोडेसे छोटेसे फळ हे एक महिन्यानंतर निघून त्याला मात्र 80 ते 100 रुपयांच्या आसपास दर मिळेल. त्यामुळे जर विचार केला तर दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न यावर्षी नक्कीच मिळणार असून हे लोणकर कुटुंब पूर्णपणे समाधानी आहे. याच वर्षी एप्रिल मे महिन्यामध्ये वादळामुळे शेडनेट फाटले होते. तो दुरुस्त करण्याचा खर्च देखील वेगळा लागला तो सुद्धा यावर्षीच्या उत्पादनामध्ये निघून जात आहे.
तरुणांनी शेती करताना बारकाव्याने अभ्यास करावा – ॲड. मुकुंद लोणकर
नवयुवक शेतकऱ्यांना व अविरत शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना ॲड. मुकुंद लोणकर म्हणतात, शेतामध्ये पैसा कमी जास्त मिळतो पण मानसिक स्वातंत्र्य, मानसिक स्वच्छता, शारीरिक सुदृढता व विविध प्रयोगांसाठी शेती करावी. या शेतीतून समाधान नक्कीच मिळते पैसा देखील मिळतो. तो कमी जास्त असला तरी शेती नुकसानीत जात नसते. सुशिक्षित तरुणांनी शेती करताना सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने अभ्यास करून शेती केली तर मिळणाऱ्या उत्पादनांमधून समाधान तर मिळते पैसाही मिळतो आणि आपल्याला काय करावयाचे याचे स्वातंत्र्य फक्त आणि फक्त शेतीतच असते. त्यामुळे शेती विकू नका शेतीला दिवस चांगले येत आहेत. भविष्यामध्ये शेतकऱ्याला जबरदस्त मागणी राहणार आहे मात्र त्यासाठी शारीरिक व मानसिक कष्ट व जिद्द या दोन्ही गोष्टी बाळगणे व कुटुंबाचे सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण तर आवश्यक आहेच तुम्ही कोणते पदवी पदवीधर आहात हा भाग शेतीमध्ये गौण असतो तुम्हाला शेतीची माहिती किती आहे तुम्हाला माती, वनस्पती, वातावरण आणि पावसाचे ज्ञान किती आहे यानुसार शेती तुम्हाला फळ देत असते.
संपर्क :- ॲड. मुकुंद अनुरथ लोणकर
रा. निपाणी जवळका ता. गेवराई जि. बीड.
मोबाईल नं. 9011713733
केळी, पपई, सोयाबीन पिकातून लाखोंचे उत्पन्न
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇