अलीकडच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरीसाठी धडपड करत असतात. मात्र, पुणे येथील उच्चशिक्षित तरुणाने लहानपणापासून शेती करण्याची आवड जोपासली. हा तरुण शेतकरी पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता.दौंड) येथील असून केशव बबनराव होले असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव. त्यांची वडिलोपार्जित 8 एकर शेतजमीन आहे. यात ते खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडी पिकाची लागवड करून वर्षाला 10 लाख रुपयांचा नफा कमवत आहे.
केशव होले यांच्याकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती ही बागायती आहे. यात ते खरबूज, कलिंगड, काकडी आणि झेंडू या मुख्य पिकांची लागवड करून चांगले उत्पादन घेत आहेत. केशव यांना लहानपणापासून शिक्षणासोबतच शेतीची आवड होती. सुरुवातीला त्यांच्या शेतात ऊस, कांदा, गहू आणि बाजरी अशी पिकांची लागवड केली मात्र, यातून फारसे काही उत्पादन निघत नव्हते. केशव यांनी 2006 मध्ये खरबुजाची लागवड केली. यानंतर वाढत्या तापमानात शेती शाश्वत करण्यासाठी केशव यांनी संरक्षित शेतीचा प्रयोग केला आहे. सव्वा एकर क्षेत्रात त्यांनी काकडी पिकाकरिता बांबू आणि पॉलिस्टर पेपरच्या सहाय्याने कमी खर्चात शेडनेटची उभारणी केली आहे. पॉलिस्टर पेपरमुळे हवामान नियंत्रणात राहते, फुलकळी गळत नाही, कीड आणि रोग नियंत्रणात राहतात, पाण्याची व खताची बचत होते, कृषी निविष्ठांवरील खर्च कमी होतो. बांबू आणि पॉलिस्टर पेपरच्या सहाय्याने तयार केलेल्या शेडनेटमध्ये काकडी पिकाचे उत्पादन घेत चांगले उत्पन्न घेण्याचा केशव होले यांनी प्रयत्न केला. ही संरक्षित पद्धतीची शेती असल्याने खुल्या शेतीतील पिकांपेक्षा एकरी उत्पादन जास्त मिळते.
खरबूज आणि कलिंगडाची केशव यांनी साडेचार एकर क्षेत्रात लागवड केली आहे. तर सव्वा एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली आहे. खरबूज, कलिंगड, झेंडू आणि काकडी पिकाच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रति एकरी उत्पादन खर्च कमी करून जास्त ऊत्पादन वाढविण्यावर केशव यांनी भर दिला आहे. सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर देखील ते त्यांच्या शेतीत करत आहे. साधारणपणे जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने खरबूज लागवड केली जाते. या पिकासाठी केशव यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, क्राॅप कव्हर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या क्राॅप कव्हर तंत्रासाठी एकरी 18 ते 20 हजार रुपये अधिक खर्च होतो. मात्र यामुळे तण नियंत्रण, पीक संरक्षण, पाणी आणि खर्चात बचत होते. या सोबतच ऊत्पादनात 15 ते 20 टक्यापर्यंत वाढ होते.
आव्हानातून शेती यशस्वी
अलीकडील काळात हवामान बदलामुळे सर्वच भाजीपाला उत्पादकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरवर्षी वेगवेगळ्या अडचणी येत असतात. अनेकदा बियाण्यांची उगवण एकसारखी होत नाही त्यावेळी दुबार टोकनही करावी लागते. यामुळे पिकाचा कालावधी कमी जास्त होतो. काही वेळा कीडनाशकांची फवारणी करूनही कीड व रोग आटोक्यात येत नाही अशा कारणामुळे खर्चात मोठी वाढ होते. नैसर्गिक आपत्ती आल्यास व्यवस्थापन खर्च जवळपास दुप्पट होतो. संघर्ष करीत प्रतिकूल परिस्थितीत आपली पिके टिकवून धरण्याचे प्रयत्न व सातत्य केशव होले यांच्यात दिसून येते. शेतीतील विविध ज्ञान मिळविण्यासाठी केशव होले कायम प्रयत्नशील असतात त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठ बारामती कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आधी ठिकाणी अभ्यास दौरा केला आहे. आज ते परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. आपली शेती सांभाळण्यासाठी सहा महिलांना त्यांनी कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, कृषी विभागाद्वारे आयोजित परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण आणि चर्चा यात त्यांचा सहभाग असतो.
वर्षाला 10 लाख रुपयांची कमाई
केशव होले हे आता खरबूज लागवडीतून प्रति एकर 20 टनांपर्यंत तर कलिंगड लागवडीतून प्रति एकर 30 ते 35 टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत. तसेच झेंडूचे 10 टन तर काकडीतून 40 टन उत्पादन ते घेत आहेत. एकंदरीत या सर्व उत्पादनातून केशव होले वर्षाला 10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. तसेच शेतमाल विक्रीसाठी केशव होले यांनी ‘केशव होले डेलीशियस फार्म फ्रेश’ हा ब्रँड तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. रेसिड्यु- फ्री पद्धतीने उत्पादन केलेल्या कलिंगड, खरबूज, काकडी यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मुंबई- पुणे बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून केशव होले डेलीशियस फार्म फ्रेश फ्रुट्स या ब्रँड व लोगोद्वारे प्रतवारी करून क्रेटद्वारे खरबूज व कलिंगडाचे मूल्य संवर्धन करून विक्री केली जाते.
संपर्क :-
श्री. केशव बबनराव होले
बिरोबावाडी, ता.दौंड, जि. पुणे.
मोबाईल नं :- 9975541272