मुंबई – माथेरान (22 सें.मी.) मध्ये गेल्या 24 तासांत भारतातील सर्वाधिक पाऊस झाला. याशिवाय, आज सोमवारपासून 12 जुलैपर्यंत म्हणजे पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD 8 July 2024) ने वर्तविली आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर यलो अलर्ट जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सांगली, लातूर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह या राज्यांना अलर्ट
भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. देशातील डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. आज म्हणजेच 8 जुलै रोजी हवामान खात्याने अरुणाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एकूणच देशभरातही मान्सून सक्रिय झाल्याने देशातील बहुतांश भागात पाणीबाणीची स्थिती असेल, असेही IMD ने सांगितले आहे.
देशभरातील पावसाची स्थिती
IMD नुसार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व राजस्थानमध्ये तुरळक ते व्यापक हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट- बाल्टिस्तान- मुझफ्फराबाद, पंजाब आणि पश्चिम राजस्थानमध्ये पुढील 5 दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये 10 आणि 11 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 08, 10 आणि 11 जुलै रोजी उत्तराखंड, 08 रोजी पंजाब, 11 जुलै रोजी हरियाणा-चंदीगड, 08 आणि 09 जुलै रोजी उत्तर प्रदेश, 08-11 जुलै दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.