मुंबई : राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकणासह राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार कालपासून (रविवार, दि. 23) मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि गोव्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मान्सूनने अर्ध्याहून अधिक भारत व्यापला आहे.
नैऋत्य मौसमी पाऊस अरबी समुद्रात उत्तरेत पुढे सरकला असून राज्यभर मान्सून सक्रिय झाला आहे. येत्या पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह तसेच हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस राज्यभर राहणार आहे. कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार – स्कायमेट
वाऱ्याच्या मध्यम दबावाची रेषा महाराष्ट्र ते कर्नाटक आणि केरळ उत्तरेकडील भागात तयार झाली आहे. मध्यम दबावाची रेषा निर्माण झाल्यामुळे उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज स्कायमेटने (Skymetweather) वर्तविला आहे. पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज देखील स्कायमेटने (Skymetweather) दिला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
कोकणात बहुतेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, नाशिक, नंदुरबार, पालघर, पुणे, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जूनमध्ये कमी झालेल्या पावसाचे जुलैमध्ये भरपाई होईल
गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात लवकर दाखल झाला. मात्र, राज्यातील काही भागात मान्सून पोहोचल्यानंतर त्याचा वेग मंदावला होता. आता तीन जुलैपर्यंत मान्सून देशात पुन्हा आगेकूच करणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा गती प्राप्त करेल तसेच त्यावेळी चांगला पाऊस होईल आणि जून मध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव रविचंद्रन यांनी सांगितले. ला निनाच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा हवामान विभागाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.