पुणे – उत्तर – मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागा (IMD) कडून नैऋत्य मान्सूनबाबत देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडासह कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची दमदार वाटचाल सुरू आहे, मान्सूननं सोमवारपर्यंत उत्तर – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. राज्यातील उर्वरीत भागही मान्सून लवकरच व्यापणार असल्याचं हवामान विभागानं (IMD) म्हटलं आहे. जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असेल, असं हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर ढगांच्या गडगडाटासह विजांचे तांडव पहावयास मिळेल. विजा चमकत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बंगालच्या शाखेची प्रगती
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, ईशान्येकडील प्रदेशात, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बऱ्यापैकी पाऊस होईल. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात 11 ते 14 जून दरम्यान मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
माणिकराव खुळे यांचा अंदाज
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनने आगमन केले असून आता मान्सूनची फक्त अरबी समुद्रीय शाखाच कोकण, मध्य महाराष्ट्रातच पुढे सरकत आहे. बं. उपसागरीय शाखा अजूनही जागेवरच रेंगाळत असल्यामुळे मान्सून संपूर्ण विदर्भ व उर्वरित मराठवाड्यात वेगाने झेपावण्यास काहीशी अडचण जाणवत आहे. शिवाय आता मान्सून नाशिकमध्ये पोहचला असल्याची माहिती ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मान्सून नाशिक, संभाजीनगर पर्यंत
मान्सून कोकण व मध्य महाराष्ट्र, नगर, बीडपासून नाशिक, छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचला आहे.
खान्देशात गारपीटीची ही शक्यता
कोकण, म. महाराष्ट्रातील पाऊस मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात १५ जूनपर्यंत अति मुसळधार तर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यात गुरुवार दि.१३ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिवाय, खान्देशात आज वळीव पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यताही श्री. खुळे यांनी वर्तवली आहे.
विदर्भ मराठवाड्यातील पाऊस स्थिती
संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात वळीव पूर्व मोसमी व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जूनपर्यंत मध्यम मोसमी पावसाची शक्यता जाणवते.
मान्सूनसाठी अनुकूल / प्रतिकूल वातावरणीय स्थिती
मराठवाडा परिसरातील 900 मीटर उंचीपर्यंतची चक्रीय वाऱ्याची स्थिती मान्सून व त्याच्या प्रगतीसाठी पूरक जाणवते. खालील स्थिती मान्सून प्रगतीसाठी पूरक नसली तरी पोहचलेल्या ठिकाणी पाऊस पडण्यास पूरक ठरु शकते. मान्सून 21 ते 23 डिग्री अक्षवृत्तापर्यंत पोहोचला. पण अक्षवृत्त समांतर, मध्य तपांबर पातळीतील (3.1 ते 5.8 किमी) उभ्या लंबरेषा उंचीवरील पूर्व- पश्चिम वाऱ्यांचा शिअर झोन 18 डिग्री अक्षवृत्तावरच आहे. शिवाय त्याची जाडी कमी झाली आहे. म्हणजेच हा शिअर झोन मान्सून सीमा रेषेच्या दक्षिणेकडे म्हणजे निलंगा, तुळजापूर, माढा, फलटण, वाई, श्रीवर्धन दरम्यान आहे. तर मान्सून डहाणू नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व- पश्चिम रेषे दरम्यान आहे. त्यामुळे मान्सून पोहोचला तेथे किती पाऊस पडतो, हे देखील बघावे लागेल असेही श्री. खुळे यांनी सांगितले.