पुणे : Monsoon 2024 भारतीय हवामान विभाग दरवर्षी दीर्घकालीन मान्सूनचा (Long Range Forecast) अंदाज तयार करून तो जाहीर करतो. यावर्षी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जो अंदाज दिला आहे त्यानुसार, सरासरीच्या 106 % पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभाग अंदाज प्रमुख पुणे वेधशाळेच्या डॉ. मेधा खोले यांनी “ॲग्रोवर्ल्ड”शी बोलताना वर्तविला. तसेच प्राथमिक अंदाजही असाच होता, जो 15 मे रोजी जाहीर केला गेला होता. तसेच 27 मे रोजी देखील सुधारित अंदाज वर्तविण्यात आला असून त्यानुसार सरासरीच्या 106 % पाऊस यावर्षी होईल, असा अंदाज आहे. हा अंदाज संपूर्ण चार महिन्यांसाठी म्हणजेच 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत असल्याचे डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
ब्रेक मान्सून…?
या अंदाजात प्रादेशिक फरक असू शकतात. चार महिन्यांमध्ये असा कालावधी असतो ज्यात मान्सून (Monsoon 2024) खूप सक्रिय असतो. तसेच त्याची तीव्रताही जास्त असते. या कालावधीत पावसामध्ये आपल्याला खंड दिसून येतात. यात बराचसा कालावधी हा 5 ते 6 दिवस किंवा 8 ते 10 दिवस किंवा कधी कधी हा कालावधी लांबून दोन आठवड्यांपर्यंत असू शकतो. एकूणच पावसाची सक्रियता कमी झालेली असते. यालाच ब्रेक मान्सून म्हणतात. त्यानंतर मान्सूनची सक्रिय परिस्थितीत सर्वदूर चांगला पाऊस होतो. अशा पद्धतीने मान्सूनमध्ये बदल असू शकतात, असं डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
मान्सूनवर प्रभाव टाकणारे घटक
मागच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. याचं मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक समुद्रात तयार झालेलं एल निनो (EL Nino). साधारण डिसेंबर महिन्यात असं दिसून येत की, पॅसिफिक समुद्रामध्ये उष्ण पाण्याचे प्रवाह तयार होतात. याचा भारताच्या मान्सूनवर विपरीत परिणाम होतो. भारताचा मान्सून हा अनेक घटकांशी निगडित आहे. जेव्हा एल निनो (EL Nino) सक्रिय असतो तेव्हा भारतामध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते. यामुळे मान्सूनचा पाऊस कमी पडतो. एल निनोचा विरोधी पार्ट ला निनो (La Nino) आहे. जर पॅसिफिक समुद्रामध्ये थंड पाण्याचे प्रवाह तयार झाले तर ते भारतीय मान्सूनसाठी चांगला आहे, असं डॉ. मेधा खोले म्हणाल्या.
एल निनो (EL Nino) च्या सक्रियेमुळे मागील वर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाला. त्याचा प्रवाह हळूहळू ओसरतो आहे, अशा पद्धतीच्या अनेक परिस्थिती निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे मान्सूनचा प्रवाह हा दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असतो. सर्वात प्रथम मान्सून हा अंदमान – निकोबार बेटांमध्ये येतो. आणि केरळमध्ये 1 जूनला येतो. त्यानंतर त्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवेश होतो. दक्षिण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मान्सून 5 जूनला येण्याची अपेक्षा असते. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा 15 जून रोजी व्यापतो. या सर्वसाधारण तारखा आहेत. दरवर्षी यात आपल्याला बदल दिसून येत असल्याचं डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
मान्सून उद्या केरळात दाखल होणार – डॉ. मेधा खोले
एकदा मान्सून केरळला आल्यानंतर पुढील मान्सूनची स्थिती कशी आहे ?, पावसाचं प्रमाण कसं आहे ?, किंवा कुठे कमी दाबाच क्षेत्र तयार झालं आहे, तापमान कसं आहे, वाऱ्यांची दिशा आणि वेग कसा आहे, उष्ण वारे वाहत आहेत का ?, ज्याला आम्ही डेप्थ म्हणतो. या सर्व घटकांवरती मान्सून अवलंबवून आहे. त्याच्यामुळे मान्सून पुढे कसा सरकेल, याची वाटचाल कशी असेल, याबाबतीत अंदाज देणं शक्य असतं. मात्र, दीर्घकालीन अंदाज देणं शक्य होत नाही. यावर्षी अंदमान – निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्याच बरोबर बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग मान्सूनने व्यापला आहे. दक्षिण अरबी समुद्रात देखील मान्सूनने प्रवेश केला असल्याचे डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. आताच्या अंदाजानुसार, मान्सून हा 31 मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचं देखील त्यांनी “ॲग्रोवर्ल्ड”शी बोलताना सांगितले. तसेच मान्सून केरळला पोहचल्यानंतर त्याची पुढील वाटचाल निश्चित करता येईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.