केंद्र सरकारनं सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर शुल्क माफ केला आहे. त्यावरील कृषी उपकरही रद्द केला आहे. त्यामुळं आधीच वांद्यात असलेल्या सोयाबीन व सूर्यफुलाच्या देशांतर्गत किंमतीना फटका बसण्याची शक्यता आहे.
आयात सवलत 11 मे ते 30 जून 2023 पर्यंत लागू होईल. 2022-23 आर्थिक वर्षासाठी टॅरिफ रेट कोटा म्हणजेच TRQ परवाना धारण करणाऱ्या आयातदारांनाच ती लागू होईल. देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यामुळे शेतकऱ्यांना मालाला पडेल भाव आला आहे.
परदेशातून स्वस्त आयातीनं सरकार तेल कंपन्यांचं व व्यापारी, दलाल लॉबीचं भलं करत आहे. शेतकऱ्यांचं मात्र यात नुकसान होत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. सरकारनं आयात सूट मागे घेतल्यानंतर देशांतर्गत बाजारात या उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते.