महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारनं गुजरातमधील कांदयाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या दुटप्पी धोरणावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं नोटिफिकेशन जारी करून गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि महाराष्ट्रातल्या नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदरांतून गुजरातचा हा कांदा निर्यात होणार आहे. याच मोदी सरकारनं 8 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील कांद्याला निर्यातबंदी लागू केली आहे.
गुजरातेत महाराष्ट्राच्या 25 टक्के देखील कांदा उत्पादन होत नाही.असं असताना तिथल्या कांद्याला निर्यात परवानगी आणि सर्वाधिक कांदा पिकविणाऱ्या महाराष्ट्रात निर्यातबंदी हे साफ चुकीचं आहे. राज्यातही 50 टक्के कांदा निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.