भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या पूर्वानुमानात, आज विदर्भात पावसाचा ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्रासह काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, सध्याच्या उपग्रह स्थितीनुसार, राज्यात ढगाळ वातावरण दिसत असलं तरी मुसळधार पावसाची स्थिती दिसत नाही. याक्षणी संपूर्ण राज्य ग्रीन झोनमध्ये दिसत आहे.
तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असू शकते. अर्थात वाऱ्यांच्या दिशेनुसार ही परिस्थिती बदलू शकते. राज्यात सध्या मराठवाडा ते विदर्भ पट्ट्यामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. छत्तीसगढपासून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे परिणाम दिसत आहेत. त्यामुळं राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांच्या आत आहे.
जेऊरमध्ये काल सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्याखालोखाल परभणी 40.7 आणि नांदेड-सोलापूरमध्ये 40.2 अंश तापमान होतं. देशात सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये 19.2 अंश इतकं नोंदवलं गेलं. याशिवाय, उदगीरमध्ये किमान तापमान 22.3 इतकं होतं.