नाशिक : धरणं गाळमुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात भन्नाट पॅटर्न राबवला जाणार आहे.
पाण्याची टंचाई कमी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना सुरू करणार आहे. यात सीएसआर अंतर्गत मदत करता येणार असून आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांना कलम 80 जी अन्वये करसवलत मिळणार आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ही शक्कल लढवली आहे. ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियानातून जिल्ह्यातील गावागावात लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या अभियानात सहभागी करून घेतलं जाणार आहे. येत्या सोमवारी गंगापूर धरणाजवळील गंगावरे गाव येथे सकाळी आठ वाजता या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केला.