भूषण वडनेरे, धुळे
शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त मानला जाणारा डांगी हा देशी गोवंश सध्या नाममात्र शिल्लक आहे. प्रतिकुल परिस्थितीतही या गायी टिकून राहतात. शिवाय डांगी जातीचे बैल शेती कामासाठी सर्वोत्तम समजले जातात. त्यामुळे डांगी गोवंशाचे संगोपन करुन ते वाढविण्याचे काम पिंपळनेर (ता. साक्री, जि.धुळे) येथील युवा शेतकरी पशुपालक धीरजकुमार राजमल सोनवणे हे उत्तमरित्या करीत आहेत. त्यांनी जैवतंत्रज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने शेतीसोबतच गायींचे संवर्धन करताना त्यांना याचा मोठा उपयोग होत आहे. गेल्या वर्षी वासरे व बैलांच्या विक्रीतून त्यांना साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. शेतीला त्यांनी डांगी गोवंश संवर्धनाची जोड दिल्याने त्यांचा नाशिक येथे सन्मानही झाला. चला तर मग जाणून घेऊया धीरजकुमार यांची ही प्रेरणादायी यशोगाथा…
ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 5 एप्रिल (शुक्रवारी) रोजी उपलब्ध
पिंपळनेर येथील युवा शेतकरी पशुपालक धीरजकुमार राजमल सोनवणे यांच्याकडे वडिलोपार्जित कोरडवाहू (मुरमाड) १६ एकर शेती आहे. त्यांना लहानपणापासूनच पशुपालनाची आवड असल्याने आई-वडिलांच्या मार्गदर्शनात त्यांनी ती जोपासण्यास सुरवात केली. त्यानुसार ते शेतीपूरक व्यवसाय म्हणून गाई, बैल, शेळ्या, कुक्कुटपालन करीत आहेत. पशुपालन करतानाच त्यांनी पदवीचे शिक्षण कृषी जैवतंत्रज्ञान आणि पदव्युत्तर शिक्षण जैव माहिती शास्त्रातून घेतले. आपल्या शिक्षणाचा उपयोग पशुपालनात काहीतरी वेगळे करण्यासाठी व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. यातूनच त्यांनी ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून पशुपालन आणि पैदास या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. हे काम करत असताना त्यांना बायफचे पशु पैदास तज्ञ डॉ. सुरेश गोखले यांचे मार्गदर्शन मिळाले. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या भागातीलच स्थानिक असलेल्या डांगी गोवंशावर काम करण्याचे ठरविले.
अशी केली संवर्धनाला सुखात
धीरजकुमार सोनवणे यांनी सुरवातीला डांगी जातीचा अभ्यास केला. यावेळी त्यांना असे दिसले की डांगी गायीवर मुळातच शास्त्रोक्त पध्दतीने कमी झालेले आहे. आणि या क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप किंवा स्पर्धाही नाही. मार्केटसुध्दा स्थानिक असल्याने व ही गाय देशी व संकरीत गायीपेक्षा सरस वाटल्याने त्यांनी या गायीची निवड केली. कारण जास्त पावसाच्या आणि डोंगराळ भागातील जास्त आद्रतेच्या वातावरणात तग धरण्याची क्षमता या जातीमध्ये असते. आणि ती अशा परिस्थितीत सुद्धा आजारी पडत नाही. दर १४ ते १५ महिन्याला एक असे अनेक वेत ती देते. बैल डोंगराळ भागात शेतीची कामे, ओढ कामे अतिशय उत्तमरीत्या करतात. म्हणून बैलाला सुद्धा मागणी असते. डांगी देशी गोसंवर्धन करण्याअगोदर धीरजकुमार यांनी जुन्या डांगी पशुपालकांशी संवाद साधत व मुलाखती घेत माहिती जाणून घेतली. डांगी गाईचे पारंपरिक व्यवस्थापन आणि संगोपन यातील बारकावे त्यांनी समजून घेतले. विविध प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती गोळा केली. त्याचबरोबर त्याचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून त्याचे डॉक्युमेंटेशन तयार केले आणि नंतर डांगी संवर्धनाला सुरुवात केली.
दुध वाढविण्यासाठी प्रयत्न
डांगी हा देशी गोवंश शेती आणि ओढ कामासाठी प्रामुख्याने वापरली जाणारी जात असली तरी त्यातील काही गाई ह्या जास्त दूध देण्याच्या क्षमता असणाऱ्या आहे असे धीरजकुमार यांना निरीक्षणावेळी दिसून आले. त्याचबरोबर येणाऱ्या काळात बैलाची शेतीतील महत्त्व कमी होत असले तरी मनुष्याला जगाला दुधाची आवश्यकता भासणार आहेच. पारंपरिक पद्धतीने डांगी गाईच्या पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची निवड ही शेती आणि ओढ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलाची शारीरिक ठेवणेनुसार केली जाते. परंतु, गाईचे दूध उत्पादन हे दुय्यम गोष्ट आहे हे लक्षात आले. त्यानुसार जास्त दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाईच्या शारीरिक ठेवण नुसार असलेले वळू कसा असावा हे निश्चित केले. कारण आता डांगी गाय जगवायची म्हणजे त्यातून दूध निर्मिती वाढली पाहिजे आणि शेतीतील व ओढ कामातील बैलाचे महत्त्व आधुनिकीकरणानुसार जवळपास संपलेले किंवा कमी झालेले आहे. तसेच जास्त पाऊस पडत असलेल्या डोंगराळ भागात, जास्त आद्रतेच्या भागात, मुबलक प्रमाणात दूध देणारी गाय तयार होऊ शकते हे जाणले. दूध देणाऱ्या गाई आणि जास्त दूध देणाऱ्या गाईच्या शरीर रचनेत बदल आत्मसात करत त्याचे निरीक्षण काटेकोर केल्यानंतर असे अनेक गुण जे बाहेरून दिसतात, त्याचा दूध उत्पादन क्षमतेशी संबंध कसा व का आहे, हे गणित पक्के झाले. आणि त्या गुणवैशिष्ट्यांची यादी केली. यामध्ये प्रामुख्याने नाकपुड्यांची ठेवण, चेहऱ्याची लांबी निंबोळी, शिंगाचे प्रकार, शिंगाचा आकार, शिंगाच्या टोकांची दिशा, डोळ्यांची ठेवण, कपाळाची ठेवण, मानेची लांबी, त्वचा रंग, व वंशिड, शरीराचा आकार, शेपटी, कमरेचा चौक, मागील पायांची ठेवण, अंगावरील केस, भवरे, गळवंट, कासेची ठेवण, सडांचे प्रकार, सडांची ठेवण, दुधाची शीर इत्यादी प्रत्येक बाह्यगुणाचे वेगवेगळे उपप्रकार आणि त्याची जास्त दूध देणाऱ्या आणि कमी दूध देणाऱ्या गाईमध्ये आढळण्यानुसार वर्गवारी केली. त्यानुसार गाईंची निवड करून वंशवळीनुसार त्यांच्या पैदाशीची शास्त्रशुद्ध आखणी केली आणि सुरुवातीलाच 20 गाई आणि 02 वळू यांच्यापासून पुढे जाण्याचे ठरवले आणि स्थानिक मार्केट असल्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचले.
दुग्धक्षमता वाढविण्यात यश
धीरजकुमार यांनी सुरुवातीला ज्या गायींची निवड केली होती, ती बाह्यरूपा नुसारच होती. या गायींच्या रक्ताचे नमुने एनआयएबी, पशु जैविक संस्था, हैदराबाद यांना दिले. त्यांनी त्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून काही निष्कर्ष काढले आणि काही बदल करण्यास सांगितले. त्या बदलानुसार पहिल्या गायीची पहिली पिढी जन्माला आली. सुरुवातीच्या गायीमध्ये जी दिवसभरात साडेपाच ते सहा लिटर एवढी दूध उत्पादन क्षमता होती ती त्यांनी सुचवलेल्या बदलानुसार किती वाढली, हे पडताळण्यासाठी एनआयएबी, हैदराबाद यांनी धीरजकुमार यांच्याकडून सुधारित दहा कालवडी आणि दोन वळू हैदराबाद येथे नेऊन त्यांचे शास्त्रोक्त संगोपन केले. आणि तेथे त्या कालवडींनी उत्तम व्यवस्थापनाखाली दिवसभरात पहिल्याच वेतात आठ ते साडेआठ लिटर एवढे दूध वासरे पाजून दिले. हेच मोठे यश यामध्ये होते. त्याच कालवडीपासून जन्माला आलेली उच्च दूध उत्पादन क्षमता असलेली नर वासरे पुन्हा त्यांनी (एनआयएबीने) धीरजकुमार यांना विकत घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार धीरजकुमार यांनी पुन्हा डांगी गायीच्या दूध उत्पादन वाढीसाठी परत महाराष्ट्रात आणून डांगी गोपालकांना वळू म्हणून विक्री केली.
32 गोवंशांचे संवर्धन
धीरजकुमार यांना सुरवातीला काम करताना इतरांप्रमाणे अडचणीही आल्या. त्यावर मात करत ते आता गाई मुक्त संचार गोठा पद्धत व राखीव कुरणात चारणे अशा पद्धतीने नियोजन करत आहेत. दूध काढले तर खाद्य आणि मजुरीचा आर्थिक ताण वाढतो तसेच वासरांना दूध कमी पडते. म्हणून चांगल्या प्रतीची वासरे सरसकट दूध पाजूनच वाढवावी लागतात. डांगी ही दुधासाठी प्रसिद्ध जात नाही. म्हणून या गायींना कमी किमतीत मागणारेच अधिक दिसून येतात. जी वासरे दुय्यम दर्जाचे असतात त्यांना कमी किमतीत शेतकऱ्यांनाच विकावे लागते. काही लोक तर ‘आम्ही देशी गायीवर काम करतोय’ म्हणून फुकट गायी मागतात. अशा अडचणी असतानाही धीरजकुमार हे गेल्या बारा वर्षांपासून डांगी गायींचे संवर्धन करीत आहेत. या कालावधीत त्यांनी 25 गायी आणि कालवडी व बारा वळू विक्री केले आहेत. तर आता त्यांच्याकडे एकूण लहान- मोठे 32 असे जातीवंत डांगी गोधन आहे. त्यातील काहींनी दिवसभरात सरासरी सव्वा बारा लिटर इतके दूध उत्कृष्ट व्यवस्थापनानंतर एका दिवसात दिले. पुढील वाटचालीमध्ये दुधातील वसा आणि स्निग्धांश वाढवण्याचे काम चालू आहे आणि तशा वळूची मागणी एनआयएबी, हैदराबाद येथून केलेली आहे. ज्या गाईंनी सरासरी 12 लिटर प्रति दिवस इतके दूध दिले, त्या जुन्या गाईंच्या चौथ्या सुधारित पिढीतील आहेत. सुरुवातीची वंशावळ प्रजनन, लसीकरण, खाद्य, दूध उत्पादन आणि व्यवस्थापनाची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन केलेली आहे.
वर्षाला साडेचार लाखांचे उत्पन्न
धीरजकुमार यांना गेल्या वर्षी उत्पन्न वासरे आणि बैल विक्री मधून सुमारे ४.५ लाख रुपयांचा उत्पन्न मिळाले. तसेच कोरडवाहू शेतीमधून (सोयबिन, मका, बाजरी, चवळी, मुग, उडीद, हरभरा आदि पीक उत्पादन घेतले जाते) जवळपास ४.५ लाखाचे उत्पन्न मिळाले. त्याच बरोबर शेती उत्पादनामधील वाळलेला कडबा, काड, भुसा याचा वापर चाऱ्या मध्ये केला जातो. शिवाय एक वासरु एक वर्षाचे होईपर्यंत दररोज सरासरी १.५ लिटर गोमूत्र देते आणि मोठ्या गाई सरासरी २.५ लिटर (बाहेर चरायला जातात ते सोडून) गोमुत्र देते. त्याची २० रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री केली जाते. दैनंदिन खर्च त्यातून सहज भागतो. तसेच स्वतंत्र चार एकर मध्ये हंगामी व बहुवार्षिक चारा पिकांची लागवड देखील केलेली आहे.
कुटुंबियांसह तज्ञांचे मार्गदर्शन
धीरजकुमार यांना शेती व पशुपालनाच्या कामात कुटुंबियांची मोलाची साथ मिळत आहे. त्यांचे आई-वडील प्रमिला सोनवणे, राजमल सोनवणे तसेच बायफ मधील मार्गदर्शक सुरेश गोखले, डॉ. रामचंद्र भगत, नारायण फडके, तसेच डॉ. मंगेश विकास हेमाडे, बीजदान तंत्रज्ञ डॉ. शंकर नारायण अस्वार आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. या जोरावरच आपण या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असल्याचे धीरजकुमार सांगतात.
कृषि विज्ञान केंद्राचे मोलाचे योगदान
कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक उपयुक्त डॉ. मिलिंद भनगे यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. या मार्गदर्शनाचा मी तंतोतंत वापर करून प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे. धुळे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार गेल्यावर्षी मला नाशिक येथौल भरलेल्या कृषीधन शेतकरी प्रदर्शन मेळाव्यामध्ये मोठा सन्मान मिळाला. ज्यातून मला प्रसिद्धी मिळण्यास मोठा हातभार लागला. त्याचा लाभ मला विक्री, विपणन यामध्ये होत आहे. तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील मिळणाऱ्या सन्मानात भाग घेण्याचे प्रोत्साहन मला वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथून सतत मिळत असते. त्याचबरोबर प्रक्षेत्र भेटीतूनही मार्गदर्शन मिळते.
-धीरजकुमार सोनवणे
पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे. संपर्क क्र. ९४२१४६३६४४
पशुपालकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा !
शाश्वत शेती उत्पादनामध्ये पशुसंवर्धनाला खूप महत्व आहे. शिवाय नैसर्गिक / सेंद्रिय शेती पद्धतीला राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच गो आधारित उत्पादनाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. ही बाब लक्षात घेत जास्तीत जास्त युवकानी श्री. सोनवणे यांचा आदर्श घेत शाश्वत उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच पीक पद्धतीत बदल करुन मार्गक्रमण करणे आवश्यक वाटते. या करिता कृषि विज्ञान केंद्र, धुळेच्या माध्यमातून विविध उपक्रम जिल्हाभरात यशस्वीपणे राबविले जातात. जास्तीत जास्त युवक, शेतकरी, पशुपालक यांनी कृषि विज्ञान केंद्राशी संपर्कात येत शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करावी.
-डॉ. दिनेश नांद्रे
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, धुळे
जनावरांची निवडही महत्वाची !
देशी गोवंश संवर्धन व उत्पादन घेण्यासाठी उत्तमप्रतीचे गोवंश नियोजन व उच्च वंशावळीचे नियोजन आवश्यक आहेच. पण सर्वात महत्वाचे म्हणजे पशुपालन करतांना स्थानिक भागातीलच जनावरांची निवड केली पहिजे. पशुपालानामध्ये गाय, घेतांना सर्वसाधारणपने तिचा बांधा, शरीराचा आकार ठेवण, कासेची सडांची रचना, दूध वाहिनी स्पष्ट व झिकझाक वळणा वळणाची हवी. जनावर सशक्त असावे. जनावरांच्या आरोग्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकाच्या संपर्कात राहिले पहिजे. लसीकरणचे नियोजन केले पहिजे. जनावरांची नोंद वही ठेवत, जनावरांना सर्वसमवेशक आहार दिला पहिजे. गोठा, जनावरे व दुधाची भांडी वेळोवेळी स्वच्छ / निर्जन्तुकीकरण केले पाहिजे. या क्षेत्रात नविन येणाऱ्या शेतकरी, युवा वर्ग यांनी अगोदर वर्षभर उपलब्ध होईल असे हिरवा चारा नियोजन केले पहिजे. तरच पशु पालनातून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढविता येऊ शकते.
– डॉ. धनराज चौधरी,
विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, धुळे
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- आजचे कापूस बाजारभावासह पहा इतरही शेतमालाचे बाजारभाव
- मान्सून गुड न्यूज : यंदा भारतात मुबलक पाऊस पण कसा..?