खासदार हिनाताई गावित यांनी शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात केली महत्त्वाची घोषणा
शहादा : “नंदुरबार जिल्हा लवकरच 100% सिंचनक्षम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातपुडा पहाडात बोगदा खणून जिल्ह्याशेजारून वाहणाऱ्या नर्मदा नदीचे पाणी जिल्ह्यात आणू,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा नंदुरबारच्या खासदार हिनाताई गावित यांनी शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात केली. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागत केले. या योजनेसाठी दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधीच्या तरतुदीसंदर्भात सकारात्मकता दर्शविली असल्याची माहितीही खासदार गावित यांनी दिली.
प्रदर्शनात खासदार गावित यांच्या हस्ते आदर्श शेतकरी, कृषी केंद्र चालक व शेतकरी गटांना ॲग्रोवर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर भरविण्यात आलेले ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन सोमवार, 26 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून त्यात प्रवेश मोफत आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार गावित भगिनी
खासदार हिनाताई गावित म्हणाल्या, “नंदुरबार जिल्ह्यात वडील विजयकुमार गावित यांनी अनेक विकासकामे केली, या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न केला. त्यांच्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक विकासकामे घडली. आता जिल्ह्यातली प्रत्येक शेतात, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचावे, ही वडिलांची धडपड आहे. त्यासाठी आम्ही वचनबध्द असून आम्ही सारे मिळून प्रयत्न करणार आहोत. नंदुरबार जिल्हा आगामी काळात 100 टक्के सिंचनक्षम होईल, हा विश्वास आहे.”
नर्मदा नदीतील 10.8 टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार
सध्या दिवसेंदिवस पाणी कमी होत चालले आहे, असे सांगून खासदार गावित म्हणाल्या की, परिसरातील सिंचन सुविधा वाढाव्यात म्हणून आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गावित साहेबांचे असे स्वप्न आहे, की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपेक्षा आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळवावे, अधिक सक्षम व्हावे. नंदुरबार जिल्ह्यालगतच नर्मदा नदी वाहते. नर्मदेचे पाणी नंदुरबार जिल्ह्याला मिळवण्याचा करार झालेला असूनही आजवर त्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाही. आता गेल्या अनेक वर्षांचे नंदुरबार जिल्ह्यातील 100% सिंचनाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारच्या मदतीने नर्मदा नदीतील 10.8 टीएमसी पाणी नंदुरबार जिल्ह्याला मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्र देईल नंदुरबार जिल्ह्याचे उदाहरण!
बोगदा करून सातपुड्याच्या पहाडातून नर्मदेचे पाणी नंदुरबार जिल्ह्यात आणणार आहोत, असे हिनाताई यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “शहादा, तळोदा, धडगाव परिसराला त्याचा सर्वाधिक फायदा होईल. हा भाग सुजलाम सुफलाम होईल. या योजनेसाठी अंदाजे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव आल्यास, या आदिवासी भागाच्या विकासासाठी तात्काळ केंद्राकडून निधी देऊन संपूर्ण मदत करू, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा नंदुरबार जिल्ह्याचे, आमच्या भागातील शेती व शेतकऱ्यांचे उदाहरण देईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे!”
तुम्ही शेतीचे तर आम्ही लोकांचे डॉक्टर
शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शनात चांगले काम केलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्याचा योग येणे आनंददायी असल्याचे खासदार हिनाताई गावित यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, “आयोजकांनी अगदी योग्य ठिकाणी प्रदर्शन घेतले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वात चांगली शेती करणारा भाग म्हणून शहादा तालुक्याचा लौकिक आहे. कृषी क्षेत्रात लागणारी वेगवेगळी मशिनरी, बियाणे, अवजारे, यंत्रे, रसायने, नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. इथे तुम्ही सारे शेतीचे आरोग्य बघता, तर आम्ही आम्ही लोकांचे आरोग्य बघतो. तुम्ही शेतीचे तर आम्ही लोकांचे डॉक्टर आहोत. कुणाच्या शरीरात हिमोग्लोबीन कमी असेल तर काय खाऊ घालायचे, याचा सल्ला आम्ही देतो. तुम्ही शेतीत काही घटक कमी असेल, तर त्यात सुधारणा करण्याचा सल्ला देता.”
अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयोग मोदी सरकारच्या योजनेतून यशस्वी
जिल्ह्यातील 280 अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयोग मोदी सरकारच्या योजनेतून यशस्वी केल्याचे उदाहरण याप्रसंगी खासदार हिनाताई गावित यांनी दिले. त्या म्हणाल्या, “व्यवसायाने डॉकटर असल्याने मी फारशी स्वतः शेती केलेली नव्हती; परंतु खासदार झाल्यापासूनच मी सातत्याने शेतीचा आणि शेतीप्रश्नांचा अभ्यास करत आहे. बहुसंख्य लोकांशी निगडित असा हा विषय आहे. त्यातून 1-2 चांगले प्रयोग केले आहेत. मोठ्या शेतकऱ्यांकडे भाग भांडवल असते. मात्र, कमी क्षेत्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने असतात. या कमी क्षेत्रात जास्त खर्च करूनही पुरेसे उत्पन्न त्यांच्या हाती येत नाही, खर्च केलेली भरपाईही होत नाही. अनेकांकडे चांगली उपाजावू जमीन नसते. त्यासाठी केंद्र सरकारच्या फळबाग योजनेतून (एनएचएम) जिल्ह्यातील 280 आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेड-नेट, पॉलीहाऊस योजना राबविली. या योजनेत 50% अनुदान केंद्र सरकार देते, तर 50% शेतकरी हिस्सा असतो. अल्पभूधारक, आदिवासी शेतकरी यांना या योजनेचे लाभ दिले. त्यासाठी निकषानुसार, नवापूर, अक्कलकुवा, साक्री, शिरपूर, तळोदा तालुक्यात प्रत्येकी 10 गुंठा म्हणजे पाव एकर क्षेत्रात पायलट प्रोजेक्ट राबविला.”
महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी या केळी निर्यातक गावाचे उदाहरण देऊन शेतकऱ्यांनी महिला बचत गटांशी टाय-अप केल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकेल, महिला सक्षमीकरण होईल, असा आशावाद खासदार गावित यांनी व्यक्त केला. आंध्रातील शेतकरी केळी कॅन्डी-टॉफी निर्यात करत आहेत. केळी खांबापासून शेतकऱ्यांना नैसर्गिक खते मिळू शकतात. सरकारने त्यास मान्यता दिली आहे. काहीही टाकून न देता केळीचे प्रत्येक अवशेष उपयुक्त ठरतं असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले.
आधुनिक संशोधन, तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेती नफ्यात – सुरेश पाटील
निर्मल सीडसचे संचालक सुरेश पाटील म्हणाले, की हवामान बदल, पर्यावरण आव्हाने यात पारंपारिक पद्धतीने शेती यशस्वी होणार नाही. नवे संशोधन, नवे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ॲग्रोवर्ल्डसारखी कृषी प्रदर्शने उपयुक्त ठरतील. अनेक शेतकरी चांगली शेती करून आदर्श उभे करतात. यातून आदर्श घेऊन त्या पद्धतीने शेती करावी. सर्वांनी शेतीतून प्रगती, उन्नती साधावी. खासदार हिनाताई गावित यांनी सांगितलेले 10 एकर शेड-नेट प्रयोग खरेच उपयुक्त ठरतात. निर्मल सीड त्याहीपुढे जाऊन हायब्रीड बियाणे देऊन आदिवासी शेतकऱ्यांकडून अधिक उत्पादन करून घेते. बीटी कॉटन बियाणे आल्यानंतरच कापूस शेती फायद्याची झाली. शेतीत वाढलेले खर्च, भावाची शाश्वती नाही, त्यामुळे उपजीविका चालविणे, हे आव्हान झाले आहे. आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन नफ्यातील शेती करणे, हेच त्याला उत्तर ठरू शकेल, असा मंत्र सुरेश पाटील यांनी दिला.
ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शेतकरी व ग्रामविकास हितातील कार्याची ओळख करून दिली. निर्मल सीडसचे संचालक डॉ. सुरेश पाटील, मेट्रोजेनचे संचालक प्रियंक शाह, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे, शोभा हेमाडे, धडगाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच एम पाटील, हायकोर्टातील ॲड. विनोद पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ज्योत्स्ना पवार यांनी सूत्रसंचालन केले.
आदर्श शेतकरी, कृषी केंद्र, शेतकरी गट पुरस्कार
यावेळी ॲग्रोवर्ल्ड पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकऱ्यांना हिना गावित यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त सन्मानित आदर्श शेतकरी पुढीलप्रमाणे – रामेश्वर विजय बिरारे (जावदे, ता. शहादा), मनोहर शंकर रोकडे (लोंढरे, ता. शहादा), रवींद्र काशिराम चौधरी (जुनी पिंप्राणे), मालासिंग दामा पावरा (काकत्या पाडा), छगन गोरख गुर्जर (निमझरी), जात्र्या निंबा पावरा (धनाजी खुर्द), लीलाधर मंचाराम सोनार (शिंदखेडा), निलेश रवींद्र चौधरी (बामखेडा), गुंजाऱ्या मेना पाडवी, रतीलाल कामा पावरा (तळोदा), स्वप्नील सुरेश पाटील (सुलवाडे), रमेश अमृतलाल पिंपरे, तुकाराम ताराचंद रझाडे (अकलाडे), कोमलसिंग कुमानसिंग गिरासे (देऊर), प्रवीणकुमार अशोक पाटील (सुजालपूर).
आदर्श कृषी केंद्र चालक : कैलास नामदेव कापडे (राम ॲग्रो, म्हसावद), उमेश भटू पाटील (गुरुकृपा ॲग्रो, म्हसावद), विजय रामजी पाटील (ग्रीन अँड ग्लोबल ॲग्रो, कुडावद), राजेशकुमार रमणलाल वाणी (दिशा ॲग्रो, तळोदा), सागर गोकुळदास पाटील (गोवर्धन सीड्स, नंदुरबार), सुरेश रोहिदास पाटील, अशोक सैंदाणे (पाटील ॲग्रो, शहादा), जगदीश नागो चौधरी (पांडुरंग ॲग्रो). पुरुष गट शेती पुरस्कार : संघर्ष मिरची शेतकरी गट (लोंढरे, शहादा), शिवशक्ती शाश्र्वत कृषक मंडळ (गोताने, नंदुरबार), जय जवान जय किसान शेतकरी गट (मांजरे, नंदुरबार)