शेतीतील नवे ज्ञान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेरगावी जावे लागण्यापेक्षा, जर कृषी प्रदर्शन ग्रामीण भागात भरविली गेली, तर नवे हायटेक तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यादृष्टीने ‘ॲग्रोवर्ल्ड’चे पिंपळगाव बसवंतमधील कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे, असे मत आदर्श गाव पाटोदाचे शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. ॲग्रोवर्ल्ड परिवाराकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या मोफत उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
भास्करराव पेरे पाटील यांच्यासह पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या हस्ते आज प्रमिला लॉन्स येथे ‘ॲग्रोवर्ल्ड’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश आहे. याशिवाय, पार्किंगचीही निःशुल्क व्यवस्था आहे.
उद्या शनिवारी द्राक्ष उत्पादक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य गुरु अनिल म्हेत्रे यांचे “निर्यातक्षम द्राक्ष पीक व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.
ॲग्रोवर्ल्डच्या या कृषी प्रदर्शनास मुख्य प्रायोजक जैन इरिगेशन तर प्लॅटो कृषीतंत्र, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पारस त्याचप्रमाणे द्राक्ष विज्ञान मंडळ व एलआयसी यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. सोमवार पर्यंत सुरू असणाऱ्या या प्रदर्शनास सर्वांना प्रवेश मोफत असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्ड तर्फे करण्यात आले आहे.
खान्देशी लज्जतदार पदार्थांच्या स्टॉलवर गर्दी
प्रदर्शनात उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असूनही सिन्नर, नाशिक, दिंडोरी, निफाड, येवला, लासलगाव, चांदवड, पिंपळगावसह परिसरातून अनेक शेतकऱ्यांनी गटाने प्रदर्शनाला भेट दिली. बदलत्या हवामानात शेतीचे झालेले नुकसान, कांदा साठवणुकीसाठी भाभा अणू संशोधन केंद्राचे उपयुक्त तंत्रज्ञान व इतर हाय टेक शेतीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी होती. खापरावरील पुरणपोळी, भरीत-भाकरी या खान्देशी लज्जतदार पदार्थांच्या स्टॉलवरही अनेक जण आस्वाद घेताना दिसत होते.
ग्रामपंचायत कायद्यात बदलाची गरज – भास्करराव बनकर
सहाव्या वेळी पिंपळगावचे सरपंच बनलेले भास्करराव बनकर यांनी अध्यक्षीय भाषणात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता असल्याचा अभिमानाने उल्लेख केला. ब्रिटिशकालीन ग्रामपंचायत कायद्यात बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अनेक सरपंच आमदार झाले, मंत्री झाले; पण कुणीही इंग्रजांच्या काळातील ग्राम पंचायत कायद्याच्या घटनेत बदल करायला तयार नाही. राज्यातील मोठ्या गावातील सरपंचाची एक समिती नेमून सरकारने त्याबाबत आढावा घेऊन मार्ग काढायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, 5 वा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात बंदीत, अबंदीत अशा अनेक क्लिष्ट तरतुदींच्या अडचणी आहेत. त्याबाबत शासनाने सरपंच, ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करायला हवे, असेही ते म्हणाले. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायीतर्फे केल्या जाणाऱ्या अभिनव उपक्रम व उल्लेखनीय कामांची त्यांनी माहिती दिली. दहा वर्षांपूर्वी राज्यातले पाहिले ज्येष्ठ नागरिक भवन उभारणारी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका आता दिव्यांग भवन उभारणार असल्याची माहितीही बनकर यांनी दिली. एनएमआरडीए आल्यामुळे गावाचे नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत ‘एनएमआरडीए’कडे
13 कोटी रुपये थकीत असून त्यासाठी आता कोर्टात जाण्याची वेळ आली आहे, असे सरपंच बनकर यांनी सांगितले.
बनकर यांच्यासह जिल्ह्यातील आदर्श सरपंचांचा सत्कार
भास्करराव बनकर हे 12 जानेवारी 1987 रोजी पहिल्यांदा पिंपळगावचे सरपंच झाले. तत्कालीन गुरू आमदार मालोजीराव मोगल यांच्या काळात 37 वर्षांपूर्वी त्यांनी सरपंच पदाची धुरा हाती घेतली. त्याच दिवशी ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते गावात उद्घाटन करण्यात आले. हा योगायोगाचा मुहूर्त साधून भास्करराव पेरे पाटील यांच्यासह ॲग्रोवर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील सरपंच महिलांच्या हस्ते बनकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, पिंपळगाव ग्रामपंचायतीलाही पेरे पाटील यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बनकर यांच्यासह ग्रा.पं. सहकाऱ्यांनी तो पुरस्कार स्वीकारला. थेरगाव, बोपेगाव, लोखंडेवाडी, आव्हानखेड, करंजवन, सय्यद पिंपरी, शिंदे, ओढा, नानेगाव, जापोरी, वडनेर भैरव, वडाळीभोई, उर्धुळ, राजदरेवाडी, दूधखेड, पाचोरेवणी या ग्रामपंचायतींनाही ॲग्रोवर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चांदवडचे विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. युवा महिला उद्योजक आणि राज्यातल्या आघाडीच्या ॲग्री युट्यूबर कविता (काव्या) ढोबळे दातखिळे यांना यावेळी पेरे पाटील व भास्करराव बनकर यांचा हस्ते कृषी विस्तारातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पती राजेश दातखिळे यांच्यासह त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला. मुंबईतील स्थिर आयुष्य सोडून या दांपत्याने काळ्या आईच्या सेवेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे कृषी काव्या गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण, दिलीपराव मोरे, सुरेशदादा खोडे, राहुल बनकर, राजेश पाटील हेही उपस्थित होते. वसंत ढिकले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिकच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.