जळगाव : रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या प्रमुख पिकांपैकी हरभरा हे देखील एक महत्वाचे पीक आहे. यंदा हरभरा लागवडीत मोठी वाढ झाली आहे. अशातच ऐन हंगामाच्या सुरुवातील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तसेच वातावरणात कधी ढगाळ तर कधी स्वच्छ असा बदल पहावयास मिळत असल्याने या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हरभरा पिकावर रोगाचा तसेच अळींचा प्रादुर्भाव होवू नये, व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकर्यांनी काय उपाययोजना, व्यवस्थापन केले पाहिजे. ते आपण जाणून घेवूया.
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे हरभरा या पिकावर मररोगा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होवून तसेच ढगाळ वातावरणामुळे जमिनीत बुरशी तयार होवून हरभरा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव होत असतो. या मररोगामुळे सुरुवातील पाने व फांद्या व त्यानंतर पूर्ण झाड वाळून नुकसान होते.
या करा उपाययोजना
पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी काही उपाययोजना केल्यास होणार्या नुकसानीला आळा बसू शकतो. त्यासाठी शेतकर्यांनी एकाच शेतात सतत हरभरा पीक घेणे टाळावे, आगोदर लावण्यात आलेल्या पिकावर मरारोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यास अशा जमिनीवर हरभर्याचे पीक घेऊ नये, लागवडीपूर्वी बियाण्यावर 3 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती किलो नंतर 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत, मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माची फवारणी करावी किंवा शेणखतातून पिकांना द्यावे.
घाटेअळीचे असे करा नियंत्रण
हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी पीक तणविरहीत ठेवणे गरजेचे आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच प्रती हेक्टर 20 पक्षीथांबे शेतात उभारावेत. यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खावून फस्त करतात. जास्त प्रादुर्भाव झाल्याचे आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 300 पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती 50 मि.ली. किंवा 1500 अझाडीरेक्टीन प्रती 25 मि.ली. किंवा एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. हे. किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी. 20 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 3 ग्रॅम किंवा क्लोरान्ट्रोनिलीप्रोल 18.5 एस.सी, 2.5 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.