सध्याच्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला व फळ पिकांवर रोगराईचा धोकाही वाढला आहे. भुरी, करपा , देवी आणि मर रोगांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ती काळजी घेणे, मशागत आणि फवारणी आवश्यक आहे.
भुरी नियंत्रण
फवारणी प्रतिलिटर पाणी – कार्बेन्डाझिम (70%) + हेक्साकोनॅझोल (5% डब्ल्यूपी) 1.5 ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथिल (38%) + कासुगामायसीन (2.21 एससी) 2.6 मि.लि. याप्रमाणे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
लवकर येणारा करपा व फळसड
लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे. ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. लागवडीवेळी ट्रायकोडर्मा पावडर एकरी 2 किलो प्रमाणे शेणखतात मिसळून द्यावी. पिकाची फेरपालट करावी. झाडांना आधार द्यावा. सडलेली पाने व फळे गोळा करून नष्ट करावीत. पाण्याचा चांगला निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
अझॉक्झिस्ट्रॉबीन (23 एससी) 1 मि.लि. किंवा किंवा पायराक्लॉस्ट्रोबीन (25 डब्ल्यूजी) 0.5 ग्रॅम किंवा थायफ्लूक्झामाइड (24 एससी) 1 मि.लि. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे.
बॅक्टेरियल कॅंकर (देवी रोग)
पिकांची फेरपालट करावी. रोगग्रस्त फांद्या, पाने, फळे तोडून नष्ट करावेत. पेरणीपूर्वी बियाण्यावर जिवाणूनाशकाची बीजप्रक्रिया करावी. नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम याप्रमाणे दोन ते तीनवेळा फवारणी करावी.
मर रोग
पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीला पानाचे देठ गळणे, शिरा रंगहीन होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतर झाडाची जुनी खालच्या बाजूची पाने पिवळी पडतात. नवीन पाने तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे झाडांचा अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते. झाड कोलमडून मरते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो.
रोग व्यवस्थापन
पिकाची फेरपालट करावी.
वांगी, मिरची व बटाटा या पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड करावी.
रोगग्रस्त झाडे, पीक अवशेष गोळा करून नष्ट करावीत.
नत्रयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा.
पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
निचऱ्याची जमीन निवडावी.
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी.
चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करावा.
लागवडीवेळी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक 2 किलो प्रति एकर प्रमाणे शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.
पुनर्लागवड करताना रोपांची मुळे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लावावीत.
रासायनिक नियंत्रण मेटॅलॅक्सिल एम (31.8 ईएस) 2.5 ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथिल (38%) + कासुगामायसिन (2.21% एससी) 2.5 मि.लि. किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (50 डब्ल्यूपी) 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची 50 ते 100 मि.लि. प्रति झाडास ओळीलगत आळवणी करावी.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)