केंद्रातील सरकारने सर्व राज्यात पीएम किसान ट्रॅक्टर योजना 2023 लागू केली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50 टक्के सबसिडी देणारी ही योजना आहे. काय आहे ही योजना, त्यासाठी पात्रता काय वैगेरे सर्व माहिती आपणास या बातमीतून जाणून घेता येईल.
देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सरकारतर्फे विविध योजना सुरू केल्या जातात. शेतकरी हा भारतीय कृषी क्षेत्राचा कणा असल्याने त्यांची काळजी घेणे आणि त्यांना आधार देणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून ते अर्थव्यवस्थेच्या वाढीस अधिक हातभार लावू शकतील. यामुळेच सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना सुरू करत असते. PM किसान ट्रॅक्टर योजना ही देशातील शेतकऱ्यांना मदत करणारी अशीच एक योजना आहे.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मदतीचा उद्देश
आजकाल शेती सुलभ करण्यासाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. शेतीत ट्रॅक्टर हा सध्या अधिक महत्त्वाचा घटक बनला आहे, ज्यामुळे शेती करणे सोपे होते. ज्या गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हा पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा उद्देश आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजना 2023 काय आहे, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करता येईल, ते आपण पाहूया.
किसान ट्रॅक्टर योजना आहे काय?
नावाप्रमाणेच ही योजना ट्रॅक्टरशी संबंधित आहे. ट्रॅक्टर हा शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु त्याची किंमत जास्त असल्याने सर्वच शेतकऱ्यांना ते परवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो आणि त्यामुळे खर्च वाढतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ट्रॅक्टर योजना सुरू केली, ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहारसह देशातील अनेक राज्यांच्या स्तरावर आधीच लागू केली गेली आहे.
देशातील कोणताही शेतकरी करू शकतो अर्ज
देशातील कोणताही शेतकरी ज्याला शेतीसाठी ट्रॅक्टर घ्यायचा आहे, तो या योजनेद्वारे आपला अर्ज सादर करू शकतो. अर्ज केल्यानंतर, जर पात्रतेचे निकष पूर्ण होत असतील, तर सरकार त्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50 टक्के सबसिडीची (अनुदान) रक्कम देईल. ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला राज्य सरकारकडे अर्ज सादर करावा लागेल. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचे अर्ज काही राज्यांमध्ये ऑनलाइन आणि काही राज्यांमध्ये ऑफलाइन स्वीकारले जातात.
अनुदान रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात
प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेतील लाभ थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर पाठविला जातो, म्हणून अर्ज करताना तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे, तसेच हे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक केले पाहिजे. आधीपासून मिळालेला कोणताही सरकारी योजनेचा लाभ थेट लाभार्थीच्या बँक खात्यात DBT द्वारे हस्तांतरित केला जातो आणि DBT पैसे प्राप्त करण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले पाहिजे.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी प्रयत्न
आपल्या देशातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती इतकी चांगली नाही की ते स्वत:च्या पैशाने ट्रॅक्टर आणि शेतीची उपकरणे खरेदी करू शकतील. देशाच्या अन्नधान्याच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीला चालना द्यावी लागेल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रात अनेक फायदेशीर योजना आणल्या असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.
किसान ट्रॅक्टर योजनेचे मुख्य उद्दिष्ट
अशा परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघेही शेतकऱ्यांना अधिक स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2023 सुरू केली आहे. किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत, नवीन ट्रॅक्टर खरेदीवर सरकार काही राज्यात 20% ते 50% आणि काही ठिकाणी 50% अनुदान देते. हे अनुदान 50% पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून देते. किसान ट्रॅक्टर योजना 2023 लाँच करण्यामागील सरकारचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि भारताच्या आधुनिक शेतीला चालना देणे हा आहे.
काही राज्यात कृषी उपकरण खरेदीसाठी अनुदान
देशातील काही राज्यांत, जसे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा येथे कृषी उपकरणांच्या खरेदीवर अनुदान दिले जात आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक राज्यात शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे काम केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आहेत, ते त्यांच्या राज्यानुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
किसान ट्रॅक्टर योजनेचे फायदे
1. देशातील सर्व पात्र शेतकरी किसान ट्रॅक्टर योजना 2023 चा लाभ घेऊ शकतात.
2. सरकारने सुरू केलेल्या किसान ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत, देशातील शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीवर थेट त्यांच्या बँक खात्यात 20 ते 50% अनुदान दिले जाते.
3. या योजनेंतर्गत शेतकर्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात लाभ दिला जातो, त्यामुळे शेतकर्यांचे बँक खाते असण्यासोबतच या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे देखील आवश्यक आहे.
4. ट्रॅक्टर खरेदी केल्यावर, शेतक-यांनी अर्ज केल्यानंतर आणि योजनेत मंजुरी मिळाल्यानंतर ट्रॅक्टरची 50% रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागेल.
5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने अगोदरच कोणत्याही कृषी अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
6. देशातील पीक कापणी करणाऱ्या महिलांना पीएम किसान ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत अधिक लाभ दिला जाईल.
7. शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या लागवडीयोग्य जमिनीवर शेतकरी ट्रॅक्टर योजनेचा लाभ सहज घेता येऊ शकतो. जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास, शेतकरी त्यांच्या नावावर ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करू शकत नाही.
8. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 50% पर्यंत सबसिडी दिली जाते आणि शेतकरी 50% पर्यंत ट्रॅक्टर कर्ज म्हणून देखील मिळवू शकतात.
किसान ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता
सवलतीच्या दरात ट्रॅक्टर मिळविण्यासाठी, पात्रता निकषांबद्द थोडक्यात माहिती अशी –
1. राष्ट्रीयत्व : अर्जदार शेतकरी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. वय : अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
3. कौटुंबिक उत्पन्न : अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
4. इतर : अल्पभूधारक शेतकरी निकषाखाली असावे.
5. ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची स्वतःची शेती म्हणजेच जमीन त्याच्या नावावर असावी.
6. अर्जदार इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभार्थी नसावा.
7. अर्जदार अर्ज करण्यापूर्वी 7 वर्षे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थी नसावा.
8. प्रति कुटुंब फक्त एक व्यक्ती अनुदानित ट्रॅक्टर खरेदी करण्यास पात्र मानली जाईल.
किसान ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड
2. वैध ओळखपत्र- जसे की मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
3. अर्जदाराकडील जमिनीची कायदेशीर कागदपत्रे.
4. बँक खाते तपशील/बँक पासबुक.
5. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करावा
तुम्हाला प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत अर्ज सबमिट करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पात्रता निकष पूर्ण करावे लागतील. यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी, सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र) आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकता. किसान ट्रॅक्टर योजना 2023 साठी अर्ज जवळच्या लोकसेवा केंद्रातून स्वीकारले जातात.
नाममात्र शुल्क आकारून ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर जनसेवा केंद्रातून तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल, ज्यावरून तुम्ही भविष्यात तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकाल. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2023 अंतर्गत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारले जातात. तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे ऑफलाइन अर्ज करू शकता, परंतु काही राज्यांमध्ये फक्त ऑनलाइन अर्ज घेतले जातात.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आपले सरकार या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकेल. त्याची लिंक –
https://agriwell.mahaonline.gov.in/
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- कपाशीवरील बोंड अळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जपानचे नवे प्रभावी तंत्रज्ञान भारतात ठरेल वरदान
- पुणे विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत सुरू करणार सेंद्रिय शेती अभ्यासक्रम