दसरा सण म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय कृषी संस्कृतीचा सण. शेती आणि शेतकरी यांचा हा सण. श्रावणातला पोळा, त्यानंतर दसरा आणि पुढे कोजागिरी हे सारे शेतकऱ्याचेच सण. दुर्दैवाने सध्याच्या काळात राजकीय विचारधारांच्या चढाओढीत मूळ परपंरा लायास जाऊन भलत्याच भडक व अवास्तव गोष्टींना महत्त्व आले आहे. आज आपण शेतकऱ्याच्या दसरा सणाची खरी परंपरा ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या माध्यमातून जाणून घेऊ. याशिवाय, खेड्यातील जुन्या पिढीला लहानपणीचा ज्वारीच्या कणसाचा बुडुक-बुडुक खेळ आठवत असेल. नव्या पिढीला त्याची कल्पनाही नसेल. आपण तेही जाणून घेऊ.
पावसाळ्यातली रिपरिप कमी झाली आणि आल्हाददायक सूर्याच्या किरणांची पाखरण सुरू झाली म्हणजे शरद ऋतूचा, हिवाळा प्रारंभ झाल्याची जाणीव होते. पूर्वीच्या काळी पावसाळ्यातली ज्वारी, धान्याची कणसे मस्तपैकी शेतात डोलू लागायची. ती कापणीनंतर प्रथम देवाला अर्पण केली जायची.
मारुती मंदिरात अर्पण करायचे ज्वारीचे धांडे
ग्रामीण भागातील अनेक गावात आजही सीमाल्लोंघनाच्या दिवशी ज्वारीचे ताटे/धांडे मारुती मंदिरात आणि घरी आणली जातात. कोकणात हीच पद्धत असते फक्त भाताचा वापर होतो. तोरणाही आंब्याच्या पानांऐवजी भातपिकाचे होते. कोकणात धान्याची कणसे घराच्या प्रवेशद्वारावर तर कधी ढोल-ताशांच्या गजरात अधिष्ठात्री मानल्या जाणाऱ्या ग्रामदेवीच्या मंदिरात गर्भगृहात अर्पण करतात. अन्नदात्या धरित्रीविषयी अंतकरणात असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही एक प्रथा. धरतीचे आभार मानण्यासाठी कृषकसमाजाने अनेक विधी, परंपरा जन्माला घातल्या. त्यात नवरात्र आणि महानवमीच्या रात्रीनंतर येणारा विजयादशमीचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे.
अन्न वस्त्र आणि निवारा या मानवी समाजातील मूलभूत गरजा आहेत. पुराश्मयुगातील आदिमानव जंगली श्वापदांचे मांस, कंदमुळे यांच्या प्राप्तीसाठी सतत चिंतीत असायचा. नवाश्मयुगात स्त्रियांनी, शेतीचा शोध लावला. त्यालाच आपण आदिमाया नारीशक्ती दुर्गा मानतो. शेतीच्या शोधामुळे भटकणाऱ्या आदिमानवाच्या जीवनात स्थैर्य आले. शेतीमुळे उद्याच्या अन्नाची चिंता संपली आणि मानवी जगण्याला संस्कृतीची जोड लाभली. जमिनीत पेरलेल्या बिया उगवतात आणि त्यामुळे अन्नधान्यांची प्राप्ती होते, हे निसर्गातले तत्व मानवाला अचंबित करत होते. मातीतील चैतन्याचे दर्शन कणसांनी युक्त अशा रोपांद्वारे लोकमानसाला झाले. ज्वारीचे ताटावर येणारी कणसे त्याच्या अन्नाच्या भवितव्याची चिंता मिटवत होती. हे सगळे निसर्गातल्या अगम्य शक्तीद्वारे संचालित होते आणि त्यासाठी ज्वारीचे पहिली कणसे परमेश्वर/निसर्ग शक्तीला अर्पण करण्याची परंपरा निर्माण झाली.
दसऱ्याच्या या सणाला नव्वान्नाची अर्थात नव वाण किंवा नवे धान्य यांची पूजा केली जाऊ लागली. सोबतच कृषी निगडीत अवजारे, स्वच्छ करून यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाऊ लागली.
चार महिन्यांच्या मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतल्यावर शरद ऋतुतील सुंदर, शीतल वातावरणात माणसे सीमोल्लंघनास सिद्ध व्हायची. पराक्रमाची शर्थ गाजवून विजय खेचून आणायची. प्रसंगी देव, देश आणि धर्मासाठी हौतात्म्य पत्करायची. त्यासाठी झाडाच्या ढोलीत सुरक्षित ठेवलेल्या शस्त्रांचे पूजन करून त्यांचा उपयोग शौर्य गाजवण्यासाठी केला जायचा. कोकण, गोव्यात व राज्याच्या काही भागात दसऱ्याच्या दिवशी मातृत्वाचे प्रतीक आणि पुरुषत्वाच्या प्रतीक असणारे भूमका, सातेरी, माऊली आणि भूतनाथ, रवळनाथाच्या स्वरुपातील तरंगमेळांचा मिलन सोहळा शिवलग्नाद्वारे संपन्न केला जायचा. कलम वृक्षांची पाने सोने म्हणून एकमेकांना भेट दिली जायची. कुठे कोंबड्या- बकऱ्यांचे रक्त अर्पण केले जायचे. असा हा दसरा वा विजयादशमी हा पवित्र दिवस अश्विनांतल्या शुक्ल पक्षातल्या दहाव्या दिवशी येतो आणि तेव्हा हर्षोल्हासित झालेल्या शेतकरी समाजामार्फत तरंगांच्या मिलनाद्वारे शिवलग्नाचा सोहळा बऱ्याच देवस्थानात साजरा केला जातो.
दसऱ्याचा सण भारतीय कृषी संस्कृतीतून निर्माण झालेला असून त्या दिवशी केले जाणारे सीमोल्लंघन त्याच्या पराक्रमाला नवी दिशा देणारे असायचे. त्याच्या पंखात नवे बळ द्यायचे आणि त्याच्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने सार्थक करायचे.
ज्वारीच्या कणसाचा बुडुक-बुडुक खेळ अन् रुचकर डिंक
ज्वारीच्या बुडुक-बुडुक खेळाचीही पूर्वी गंमत होती. आता ती फारशी दिसत नाही. कापलेल्या कणसाचे वक्र आकडे. एक दुसऱ्यात अडकवून हा खेळ खेळला जायचा. कणसे अडकवण्यापूर्वी वक्र आकडा ओठाला लावून बुडुक-बुडुक
आवाज काढला जायचा. कणसे एकमेकांत अडकवून ताटे विरुद्ध दिशेला ओढायचे. त्यात ज्याचा आकडा कमकुवत, तो तुटून पडायचा. नवीन आकडे घेऊन मग परत हाच खेळ कितीतरी वेळ सुरू राहायचा. ज्वारीतील डिंक खाण्याचीही तेव्हा वेगळीच मजा असायची. ज्वारीच्या कणसाला खाली बुंधाला काळसर चिकट डिंक यायचा. खरेतर, हा एक प्रकारचा रोग असतो. त्याला कावळी लागणे म्हटले जायचे, दाणे खराब होत. मात्र, हा डिंक तेव्हा भारीच रुचकर लागायचा. नवीन पिढीला आता तो खडीसाखरेसारखा डिंक व त्या खेळातील मजा कधीच अनुभवायला मिळणार नाही.
अशा या कृषी संस्कृतीतून जन्माला आलेल्या विजयादशमी
दसऱ्याच्या आपण सर्वांना ॲग्रो-वर्ल्ड परिवाराकडून हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.!!!
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल ‘बायर’ची कमी पाण्यातील तांदळाची डीएसआर प्रणाली
- राज्यातील सकाळच्या तापमानात घट; चक्रीवादळ ‘तेज’चे ओमानजवळ उद्या लँडफॉल, ‘हामन’ही होतेय तीव्र!