मुंबई : राज्याच्या बहुतांश भागावरील बाष्प कमी झाल्याचे ताज्या उपग्रह निरिक्षणातून दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांतील हवा कोरडी झाली आहे. नैऋत्य मान्सून राज्यातून माघारी फिरल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर भारत, मध्य भारत, पश्र्चिम भारत, दक्षिण भारत अशा बहुतांश भागात बाष्प घटून हवा कोरडी झाल्याचे दिसत आहे (या बातमीत समाविष्ट छायाचित्रात तांबडा, पिवळसर दिसणारा भाग). देशाच्या पूर्व भागात फक्त आता मान्सून अती सक्रीय झाल्याचे दिसत आहे (नकाशातील निळसर भाग).
राज्यात आता कोणतेही अलर्ट नाहीत!
हवामान खात्याकडून आता राज्याच्या कोणत्याही भागात कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्याच्या बहुतांश भागात हवा कोरडी आणि आकाश निरभ्र राहू शकेल. दरम्यान, राज्याच्या अनेक भागांत उकाडा वाढत असून काही ठिकाणी तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ऑक्टोबर हीट चा कडाका आता अनेक ठिकाणी जाणवू लागला आहे.
रिटर्न मान्सूनचा जोर आता पूर्व भारतात
‘स्कायमेट’ने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर बंगाल, बांगलादेश आणि निम्न आसाममध्ये ईशान्येकडे सरकत आहे. या प्रदेशात 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिकूल हवामान राहील. पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि आसामच्या पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या ढगफुटीनंतर सिक्कीमच्या ल्होनाक तलावाचा सुमारे 65% भाग वाहून गेला, ज्यामुळे तीस्ता नदीत अचानक पूर आला. दरम्यान, आयएमडीने या परिसरात आणखी जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याचे संकेत दिले आहेत.
भारत-चीन सीमा, थायलंड, म्यानमारमध्ये तुफानी पाऊस
पूर्व भारतालगत थायलंड, म्यानमारचे अनेक भाग पुढील 10 दिवस पुराच्या पावसाचा धोका राहण्याची शक्यता आहे. कारण या भागात मान्सून अत्यंत सक्रीय होत आहे. सध्या पूर्व भारतावर दक्षिण आशियाई मान्सून ट्रफ कार्यरत आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेनजीकच्या भागातही मुसळधार पाऊस राहू शकेल. मॉइस्ट-क्रॉस इक्व फ्लोद्वारे पूर्व भारतात भरपूर आर्द्रता येत आहे. यामुळे म्यानमार, थायलंडच्या अनेक भागांमध्येही गेल्या 3-4 आठवड्यांपासून अतिवृष्टी, पूर, भूस्खलन होत आहे. काही ठिकाणी गेल्या एका महिन्यात 1,700 मिमीच्या जवळपास नोंद झाली आहे. हे असेच चालू राहून परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- राज्यात 3 ऑक्टोबरपासून कमी होणार पावसाचा जोर ; तोवर कोकण, महाराष्ट्राच्या घाट भागात धुमशान !
- अतिवृष्टी, पूरामुळे जळगाव जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान