अपुऱ्या पावसामुळे सध्या देशातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. शेतकरी आपली पिके वाचविण्यासाठी धडपडत आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके मान टाकू लागली आहेत. अगदी अशीच स्थिती आंध्र प्रदेशातही आहे. मात्र, अनंतपूरस्थित अॅक्शिअन फ्रेटेर्ना (एएफ) इकॉलॉजी सेंटरने दुष्काळात उभी पिके वाचवण्याची एक प्रभावी पद्धत दाखवली आहे. सिंचनाच्या “या” पद्धतीमुळे आंध्र प्रदेशातील पिके दुष्काळापासून वाचली आहेत.
अनंतपूरच्या जिल्हाधिकारी एम. गौथमी यांनी कृषी अधिकार्यांसह जिल्ह्यातील कुडैर मंडलातील जल्लीपल्ली गावात पिकांच्या तीन वेगवेगळ्या प्लॉटना भेट दिली. या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी पेरलेल्या लाल हरभरा, एरंड आणि फॉक्सटेल बाजरीला (कोरा) याच सिंचन पद्धतीने पाणी दिले जात होते. ही सिंचन पद्धत पाहून जिल्हाधिकारी चांगल्याच प्रभावित झाल्या.
अनंतपूर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांमधील 5,000 एकर जमिनीला संरक्षणात्मक सिंचन उपलब्ध करून देण्याच्या एएफ इकॉलॉजी सेंटरच्या प्रयत्नांचे जिल्हाधिकारी गौथमी यांनी कौतुक केले आहे. पिके वाचवण्याच्या या प्रभावी पद्धतीचा अहवाल त्या राज्य सरकारला पाठवणार आहेत.
मोबाईल प्रोटेक्टिव्ह इरिगेशन अर्थात संरक्षक सिंचन प्रणाली असे या सिंचन पद्धतीचे नाव आहे. एएफ इकोलॉजी सेंटरचे संचालक वाय.व्ही. मल्ला रेड्डी यांनी सांगितले की, एनजीओशी संबंधित 1,500 शेतकरी खर्च कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याने टँकर, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन पद्धती आणि पूर सिंचन वापरून उभ्या पिकाचे यशस्वीपणे संरक्षण करत आहेत.
काय आहे मोबाईल प्रोटेक्टिव्ह इरिगेशन?
संरक्षक सिंचनाचा हा स्थलांतर करण्याजोगा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वापरता येण्याजोगा मार्ग आहे. शेतीला लवचिक बनवण्याचा हा सर्वात प्रभावी आणि कमी खर्चातला सामूहिक मार्ग आहे. एएफ इकॉलॉजी सेंटरने (AFEC) अनंतपूर जिल्ह्यातील आठ मंडळांमधील 230 प्रकल्प गावांमध्ये क्लायमेट फार्म स्कूल स्थापन केले आहे. प्रात्यक्षिक आणि हवामान प्रशिक्षणाद्वारे मोबाईल प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजेच संरक्षक सिंचन प्रणाली म्हणून मोबाईल ठिबक, स्प्रिंकलर सिंचन प्रणालीबद्दल शेतकर्यांना ज्ञान आणि जागरूकता निर्माण केली आहे. इथे मोबाईल म्हणजे आपला स्मार्ट फोन नव्हे तर चालती-फिरती पद्धत या अर्थाने आहे.
संरक्षणात्मक सिंचनासाठी पाण्याची गरज एकतर शेततळ्यांमधून भागवली जाते किंवा सामुदायिक आधारावर वाटून घेतली जाते. यात जवळपास 3-5 शेतकरी ट्रॅक्टर बसवलेल्या पाण्याच्या टँकरचा वापर करून जवळच्या उपलब्ध जलस्रोतातून (तलाव/तळे) पाणी वाहून नेतात. या व्यतिरिक्त, AFEC च्या आर्थिक प्रोत्साहनामुळे सुमारे फक्त पावसावर अवलंबून असलेल्या सुमारे 250 छोट्या कोरडवाहू शेतकर्यांना शेतातच सिमेंटचा कोबा (अस्तर) मारलेल्या शेततळ्यांचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे पाणी जमिनीत वाहून न जाता शेतातच साचून राहते. सिमेंटच्या अस्तरवाल्या शेततळ्यांमध्ये असे सिमेंट अस्तर नसलेल्या शेततळ्यांपेक्षा किमान 45 जास्तीचे दिवस पाणी टिकून राहू शकते. ट्रॅक्टर-माऊंट केलेल्या पाण्याचे टँकर आणि सिमेंटच्या अस्तराने बांधलेल्या शेततळ्यांमुळे 6,035 एकर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाद्वारे 5,028 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेतकरी समुदायाचा सहभाग हा प्रमुख घटक होता.
शिवाय, AFEC ने 230 प्रकल्प गावांमध्ये 856 समुदाय आधारित संस्थांना (CBOs) प्रोत्साहन दिले आहे आणि या CBOsना विविध संरक्षणात्मक सिंचन तंत्रांवर तळागाळात कार्यरत तज्ञ किंवा STOs द्वारे प्रशिक्षित केले जाते. या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना त्यांची पिके हवामान बदलाच्या असुरक्षिततेपासून वाचवण्यास आणि पिकांपासून योग्य उत्पन्न मिळविण्यात मदत झाली आहे. समुदायाच्या नेतृत्वाखालील फिरत्या पाण्याने पीक प्रणाली टिकवून ठेवण्यासाठी मोठा अनुकूल बदल निर्माण केला आहे. संरक्षणात्मक सिंचन व्यवस्थेत जेव्हा शेत कोरडे पडते तेव्हा उपलब्ध साठ्यातून कमीत-कमी प्रमाणात आवश्यक ते पाणी दिले जाते. गंभीर परिस्थितीत दुष्काळापासून पिकाचे किमान संरक्षण करण्यासाठी, पाऊस येईपर्यंत ती जगवत ठेवण्यासाठी ही सिंचन पद्धती अतिशय उपयुक्त ठरते.
संरक्षणात्मक सिंचन कशासाठी?
संरक्षणात्मक सिंचनाचा उद्देश दुष्काळी स्थितीत, जमिनीतील ओलाव्याच्या कमतरतेच्या प्रतिकूल परिणामांपासून पिकांचे संरक्षण करणे हा आहे. संरक्षणात्मक सिंचन हे पर्जन्यमानावर आणि त्याहून अधिक, विपरीत स्थितीत पाण्याचा पूरक स्त्रोत म्हणून कार्य करते. अगदी थोडक्यात सांगायचे तर, संरक्षणात्मक सिंचन म्हणजे मर्यादित प्रमाणात पाणी असलेले सिंचन! कमी पाण्याने पिकांचे नुकसान होते तसेच जास्त पाण्याने, जमिनीतील अधिक ओलाव्यानेही पिकांचे नुकसान होते. पिकांचे संपूर्ण नुकसान होण्यापासून संरक्षण देणारे सिंचन म्हणजे “संरक्षणात्मक सिंचन”. जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वापरले जाते तेव्हा त्याला मोबाईल संरक्षण सिंचन म्हटले जाते. या प्रणालीत नद्या, तलाव, तळे किंवा कोणत्याही जलाशयांमध्ये उपलब्ध पाण्याचा लागवडीखालील शेतीत योग्य प्रमाणात वापर, प्रसार केला जातो. आपल्याकडे मुख्यत: कोरड्या हंगामात पिकांना वाचविण्यासाठी संरक्षणात्मक सिंचन वापरले जाऊ शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- किसान क्रेडिट कार्ड : वार्षिक 4% व्याजाने आता सहज मिळणार शेतकरी कर्ज
- AgroWorld अॅग्रोवर्ल्ड मासिक सप्टेंबर 2023 Great Positive Stories